Loksabha 2019 : भाजपने आठवले, जानकरांपुढे ठेवला 'हा' प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 मार्च 2019

मतपेढी कमी झाल्यानेच दुर्लक्ष
धनगर आणि मागासवर्गीय समाजाची मतपेढी भाजपच्या पाठिशी कायम राहावी, या उद्देशाने राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना राज्यात, तर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना केंद्रात मंत्रिपद देण्यात आले. मात्र, अद्यापही भाजपने त्यांच्या उर्वरित मागण्या पूर्ण केल्या नाहीत. मंत्रिपदावर असताना या नेत्यांनी पक्षातील व समाजातील लोकांच्या अपेक्षाही पूर्ण न केल्याने आता त्यांच्याविषयी नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजपने अंतर्गत सर्व्हे केला असून, दोघांच्या जनाधाराचा अभ्यास केला. त्यानुसार भाजपने जानकर व आठवले यांच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे.

सोलापूर - ‘तुम्हाला पाहिजे त्या मतदारसंघात तुमच्या पक्षाचे स्वत:चे मेळावे घ्या, लाखोंची गर्दी जमवून दाखवा, मगच तुम्हाला ते मतदारसंघ सोडण्याचा विचार केला जाईल,’ असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी महादेव जानकर व रामदास आठवले यांच्यापुढे ठेवल्याची चर्चा आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप-शिवसेना आणि आता वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांसह अन्य पक्ष, संघटनांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. कार्यकर्त्यांच्या संघटनासाठी नेत्यांनी गावोगावी बैठका घेण्यात सुरवात केली आहे. या पार्श्‍वभूमीवर आता लाखोंची गर्दी जमवायची कशी, असा पेच जानकर आणि आठवले यांच्यापुढे निर्माण झाल्याची चर्चा आहे. मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने रिपब्लिकन पक्षाला दिलेली आश्‍वासने न पाळल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. 

जानकर यांनी धनगर आरक्षणासाठी सरकार दरबारी काहीच हालचाली केल्या नसल्याची भावना समाजात आहे. त्यामुळे बहुतांशी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी त्यांची साथ सोडण्याचा निर्धार करत अन्य पक्षांची वाट धरल्याची चर्चा आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत आता या दोन्ही नेत्यांचा जनाधार घटल्याने दोन्ही नेत्यांची भूमिका अद्यापही तळ्यात-मळ्यातच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मतपेढी कमी झाल्यानेच दुर्लक्ष
धनगर आणि मागासवर्गीय समाजाची मतपेढी भाजपच्या पाठिशी कायम राहावी, या उद्देशाने राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना राज्यात, तर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना केंद्रात मंत्रिपद देण्यात आले. मात्र, अद्यापही भाजपने त्यांच्या उर्वरित मागण्या पूर्ण केल्या नाहीत. मंत्रिपदावर असताना या नेत्यांनी पक्षातील व समाजातील लोकांच्या अपेक्षाही पूर्ण न केल्याने आता त्यांच्याविषयी नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजपने अंतर्गत सर्व्हे केला असून, दोघांच्या जनाधाराचा अभ्यास केला. त्यानुसार भाजपने जानकर व आठवले यांच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Fadnavis Jankar Athawale Politics