Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघांत सोमवारी मतदान पार पडले. काही ठिकाणी मतदारांमध्ये निरुत्साह होता तर काही ठिकाणी मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र होते.
Voting Line
Voting Linesakal

राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघांत सोमवारी मतदान पार पडले. काही ठिकाणी मतदारांमध्ये निरुत्साह होता तर काही ठिकाणी मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र होते. मतदारयादीत नाव नसल्याचा परिणामही मतदानावर झाला. पाचव्या टप्प्यासोबतच राज्यातील सर्व ४८ मतदारसंघांतील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

ठाणे - ईव्हीएम मशीन बंद

ठाणे मतदारसंघात सकाळच्या सत्रात काही मतदान केंद्रांवर ईव्‍हीएम मशिन काही वेळ बंद पडल्याने मतदान दोन ते तीन तास खोळंबले होते. त्यामुळे मतदारांत निरुत्साह दिसत होता. ठाणे येथील नौपाड्यातील दिव्‍यांग कला केंद्रातून ईव्‍हीएम बंद पडल्याची पहिली तक्रार आली. त्यानंतर आनंदनगर कामगार कल्याण केंद्र, लोकमान्यनगरमध्ये राजा शिवाजी विद्यालय, बाराबंगला येथील मतदान केंद्रांवरील ईव्‍हीएम बिघाडामुळे गोंधळाचे वातावरण होते. ठाण्यातील सेंट जॉन शाळेतील मतदान केंद्रात भरत बैवा यांच्या नावावर आधीच मतदान झाल्याचे उघड झाले. अखेर त्यांना बॅलेट पेपरवर मतदान करण्यास परवानगी आली. या प्रकारामुळे बोगस मतदानाबाबत संशय व्‍यक्त करण्यात येत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार राजन विचारे आणि आमदार जितेंद्र आव्‍हाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे कारवाईची मागणी केली. यावरून काहीवेळ संतापाचे वातावरण होते. अनेक ठिकाणी मतदार याद्यांतून नावे गायब झाल्याचेही उघड झाले. हाणामारी किंवा कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही.

कल्याण - वीस टक्के मतदार वंचित

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार खासदार श्रीकांत शिंदे आणि ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यात मुख्य लढत होत आहे. या मतदारसंघातील काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे अत्यंत संथ गतीने मतदान प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे तासन्‌तास रांगेत खोळंबून राहावे लागल्यामुळे मतदारांनी नाराजी व्‍यक्त केली. अनेकांची मतदार यादीतून नावे गायब झाल्याचेही समोर आले. त्यामुळे सुमारे २० टक्के मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आलेला नाही. काही ठिकाणी मतदारांना १७ नंबरचा फॉर्म भरून मतदान करता येईल, असे सांगितले जात होते. मात्र, कर्मचारी असा कोणताही फॉर्म नसल्याचे सांगत होते. मतदार यादीत नाव असेल तर मतदान करता येईल, असे सांगितल्यामुळे कल्याण आणि डोंबिवलीत मतदारांत काही वेळ गोंधळाचे वातावरण होते. उन्हामुळे सकाळी ११ वाजेपर्यंतच मतदार घराच्या बाहेर पडले होते. दुपारी मतदान केंद्रांवर शुकशुकाट होता. सायंकाळीही हे चित्र फारसे बदलल्याचे दिसत नव्‍हते.

भिवंडी - मतदारांच्या लांब रांगा

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. सोमवारी या मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली. सकाळपासून मतदान केंद्रांवर मतदारांनी लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या. या वेळी भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील सारंगगाव मतदान केंद्रावर पारंपरिक कोळी आगरी संस्कृतीचे दर्शन घडले. या मतदान केंद्रावर मतदान केंद्रप्रमुखापासून येथे काम करणारे कर्मचारी हे कोळी आगरी पेहराव केल्याचे दिसून आले. सर्वत्र शांततेत व उत्साहात मतदान प्रक्रिया सुरू असताना सायंकाळी गालबोट लागल्याची घटना घडली. बोगस मतदान होत असल्याचा आरोप करून भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांनी खंडू पाडा येथील मतदान केंद्राकडे धाव घेतली होती. तर कपिल पाटील यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच खोटे आरोप करून मतदान बंद पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सुरेश म्हात्रे यांनी केला.

दिंडोरी - कांदाप्रश्न मतदान केंद्रावर

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सरासरी ६७ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. पाचव्या टप्यातील १३ मतदारसंघात झालेल्या मतदानात हे सर्वाधिक मतदान ठरले आहे. प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून कांदा प्रश्नाभोवती केंद्रित झालेल्या या निवडणुकीत कांदा प्रश्नाचा असलेला रोष मतदान केंद्रांपर्यंत पोचला. मतदारसंघातील चांदवड येथील वडगाव पंगु, येवला तालुक्यातील निमगाव वाकडा, निफाड तालुक्यातील नैताळे येथील मतदान केंद्रावर शेतकरी मतदारांनी कांद्याच्या माळा घालत मतदानाचा हक्क बजावण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांना त्यांना अडविले. यात काहींनी मतदान केंद्राबाहेर घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला.

पालघर - दोन लाख मतदार ‘डिलीट’

पालघर लोकसभा मतदारसंघात काही तुरळक घटना वगळता मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली; मात्र नालासोपारा व बोईसर विधानसभेतील दोन लाख मतदारांच्या नावावर ‘डिलीट’ असा शिक्का असल्याने अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले. मतदारांना यादीत नावे शोधण्यासाठीदेखील मतदान केंद्रावर विलंब होत होता. वसई, नालासोपाऱ्यात काही ठिकाणी ठाकरे गट व भाजप कार्यकर्ते एकमेकांसमोर आले. शाब्दिक बाचाबाची झाली; मात्र लगेच वातावरण शांतदेखील झाले. दुसरीकडे सुविधांचे तीनतेरा वाजले होते. ज्येष्ठ नागरिक, महिलांना आसनांची व्यवस्था नव्हती. पाण्याची व्यवस्था अपुरी होती. मतदान करण्यासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दातीवरे, सावरेसह काही भागांत ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याने ती बंद झाली. त्यामुळे अर्धा तास मतदान प्रक्रिया खोळंबली.

नाशिक - शहरात उदासीनता

लोकसभेच्या नाशिक मतदारसंघामध्ये चौरंगी लढतीमध्ये महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशीच लढत दिसून आली. जुने नाशिकमध्ये वादावादीचे किरकोळ प्रकार वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. मतदार यादीत नाव नसणे, ईव्हीएम मशिन बंद पडण्याचे प्रकार घडले. सकाळच्या सत्रात मतदानाचा टक्का चांगला होता. दुपारनंतर ऊन असल्याने टक्का घसरला. सिन्नर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले. शहरी भागात मतदानाचा उत्साह दिसला नाही. त्या तुलनेत ग्रामीण भागात मतदानाचा टक्का वाढला. जुने नाशिक भागातील चार केंद्रांवर संध्याकाळी सहा वाजेनंतर मतदारांची संख्या वाढल्याने रात्री उशिरापर्यंत मतदान सुरु होते.

मुंबई उत्तर पश्चिम - नावे नसल्याने नाराजी

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील गोरेगाव पश्चिमेला असलेल्या सिद्धार्थ नगर परिसरातील स्थानिकांची नावे मतदार यादीतून गायब असल्याने २९८ या मतदान केंद्रावर काहीवेळ गोंधळ निर्माण झाला होता. या वेळी यंत्रणेकडे नावांची चौकशी केली. कुठेच नाव सापडले नसल्याने २७ हून अधिक कुटुंबांतील मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. अनेकांना मतदान न करताच घरची वाट धरावी लागली. त्यामुळे त्यांनी मतदार यादीतील घोळाबाबत तीव्र नाराजी व्‍यक्त केली. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील आरे दुग्धशाळा मतदान केंद्रावर शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांना मतदान केंद्रामध्ये पाहणी करण्यासाठी जाण्यापासून रोखण्यात आले. यामुळे स्थानिक अधिकारी विनोद शेगावकर आणि उमेदवार वायकर यांच्यात बाचाबाची झाली.

धुळे - मतदानाचा टक्का घसरला

लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील भाजप विरूद्ध काँग्रेसमधील निवडणूक अत्यंत चुरशीची असल्याचे सोमवारी मतदानाच्या प्रक्रियेनंतर स्पष्ट झाले. गेल्या निवडणुकीत सरासरी ६० टक्के मतदान झाले. तुलनेत यंदा टक्का घसरून सरासरी ५५ टक्क्यांवर आल्याचा अंदाज आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघात सायंकाळी पाचपर्यंत अंदाजे सरासरी ४८.८१ टक्के मतदान झाले. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात ५०.३१ टक्के, धुळे शहर ४६.१६ टक्के, शिंदखेडा ४५.८४ टक्के, मालेगाव मध्य ५७.०२ टक्के, मालेगाव बाह्य ४७ टक्के, तर बागलाण विधानसभा मतदारसंघात ४७.०१ टक्के मतदानाची नोंद झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com