Loksabha Election 2024 : मतदानात फेरफाराची भीती अनाठायी; विलंबामुळे वाढतोय गोंधळ

प्रत्येक मतदान केंद्रावर झालेल्या मतदानाची नेमकी आकडेवारी मतदान केंद्राध्यक्षाकडे, तसेच संबंधित केंद्रावरील मतदान प्रतिनिधींकडेही (पोलिंग एजंट) असते.
Loksabha Election Voting
Loksabha Election Votingsakal

- विजय चोरमारे

मुंबई - प्रत्येक मतदान केंद्रावर झालेल्या मतदानाची नेमकी आकडेवारी मतदान केंद्राध्यक्षाकडे, तसेच संबंधित केंद्रावरील मतदान प्रतिनिधींकडेही (पोलिंग एजंट) असते. मतमोजणीच्या वेळी संबंधितांना त्याची पडताळणी करणे शक्य आहे. त्यामुळे मतदानाच्या आकडेवारीमध्ये फेरफार होण्याची भीती अनाठायी असल्याचे मत मतदान प्रक्रियेशी संबंधित विविध घटकांनी व्यक्त केले. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ढिसाळपणामुळे होणारा विलंब मतदान प्रक्रियेबाबत गोंधळ वाढवण्यास कारणीभूत असल्याचे संबंधितांचे म्हणणे आहे.

निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान आकडेवारी अनुक्रमे ११ आणि ५ दिवसांनी जाहीर केली. त्यातही अनुक्रमे ७ आणि ५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. आकडेवारी जाहीर करण्यास लावलेला विलंब आणि आकडेवारीतील मोठी तफावत यामुळे आधीच संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या निवडणूक आयोगाबाबतचा संशय बळावला.

यावर आक्षेप घेत असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म (एडीआर) या स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मतदानानंतर ४८ तासांच्या आत मतदानाची अंतिम आकडेवारी निवडणूक आयोगाने संकेतस्थळावर जाहीर करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनीही त्यासंदर्भात आक्षेप घेतला आहे. चार टप्प्यांतील ३८० मतदारसंघांमध्ये एक कोटी सात लाख मतदान वाढल्यामुळे मतदान प्रक्रियेत फेरफार झाल्याच्या आरोपाला पुष्टी मिळते, असे त्यांनी म्हटले आहे. हा राष्ट्रीय मुद्दा बनल्यामुळे प्रक्रियेशी संबंधित घटकांशी बोलून वस्तुस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न ‘सकाळ’ च्या माध्यमातून करण्यात आला.

राज्याच्या वेगवेगळ्या भागातील दोन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर त्यांनी प्रक्रिया उलगडून सांगितली. दोघांकडून मिळालेल्या माहितीमध्ये कोणतीही तफावत आढळली नाही. त्यांच्याकडून मिळालेली माहिती अशी -

केंद्रीय निवडणूक आयोगाला दर दोन तासांनी मतदानाची आकडेवारी कळवावी लागते. या आकडेवारीमध्ये वाढ करता येते, परंतु कमी करायची असेल तर आयोगाची परवानगी घ्यावी लागते. काही मतदान केंद्रांवरून संपर्क यंत्रणेतील त्रुटींमुळे वेळेत माहिती येत नाही, तेथील माहिती अंदाजित येत असते. अंदाजे माहिती देताना आकडा थोडा कमी सांगितला जातो.

माहिती लवकर मिळवण्याच्या नादात केंद्राध्यक्ष एखादा टक्का कमी कळवतो. झोनल ऑफिसर एखादा टक्का कमी सांगतो. अशा रीतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपर्यंत कमी मतदान येत असते. सायंकाळी सहा वाजेपर्यंत आलेली आकडेवारीही झालेल्या मतदानापेक्षा कमी असते.

सर्व ठिकाणची अंतिम आकडेवारी प्राप्त होण्यास रात्री बराच उशीर होतो, काहीवेळा ती दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत येत असते. ही सर्व आकडेवारी एकत्र करून तिला अंतिम स्वरूप देण्याचे काम दुसऱ्या दिवशी सायंकाळी चार वाजेपर्यंत पूर्ण करावयाचे असते. त्यानंतर ती निवडणूक आयोगाला सादर केली जाते.

प्रत्येक मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी आकडेवारी जाहीर करीत असतात. मतदान होत जाईल तशी त्यांच्याकडून आकडेवारी जाहीर केली जाते. मात्र, दुसऱ्या दिवशी सायंकाळी जाहीर केलेली आकडेवारी अधिकृत आणि अंतिम असते.

दुसऱ्या दिवशीच अंतिम आकडेवारी

प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष, मतदान प्रतिनिधींकडे झालेल्या मतदानाची आकडेवारी असते. त्यानंतर कोणत्याही पातळीवर फेरफार करणे शक्य नसते, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. जिल्हा पातळीवर ही आकडेवारी दुसऱ्या दिवशीच अंतिम होत असते. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पातळीवर विलंब का केला जातो, यासंदर्भात काही कल्पना नसल्याचेही संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

मतदान केंद्रावर अशी होते प्रक्रिया

  • मतदान केंद्राध्यक्ष म्हणून काम केलेल्या एका प्राध्यापकांशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेली माहिती अशीः

  • मतदान सुरू होण्याआधी दीड तास मतदान प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान यंत्रांची चाचणी घेतली जाते. ईव्हीएममध्ये आधी मतदान नसल्याची त्यांना खात्री पटवून दिली जाते. त्यानंतर उपस्थितांकडून मतदान करून घेतले जाते. नोटाच्या पर्यायासह सर्व चिन्हांवर किमान पन्नास मतदान करून घेतले जाते. व्हीव्हीपॅटवर मतदान केलेलीच चिठ्ठी दिसते का याचीही खात्री करून घेतली जाते. त्यानंतर संबंधित पन्नास मतांची मोजणी सर्वांसमक्ष केली जाते.

  • त्यानंतर इव्हीएममधील सर्व मते काढून टाकली जातात आणि त्यात एकही मत शिल्लक नसल्याची खात्री करून दिली जाते. तसे घोषणापत्र तयार करून संबंधितांच्या सह्या घेतल्या जातात. त्यानंतर सकाळी सात वाजता प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरुवात होते.

  • मतदान सुरू झाल्यानंतर दर दोन तासांनी मतदानाची आकडेवारी स्त्री-पुरुषांच्या संख्येसह झोनल ऑफिसरला कळवली जाते.

  • सायंकाळी सहा वाजता जे लोक रांगेत असतील त्या सर्वांचे मतदान झाल्यानंतर मतदान प्रतिनिधींच्या समोर मशिन बंद करण्याचे बटण दाबले जाते. केंद्रावर किती मतदान झाले आहे, याचा आकडा त्याचवेळी संबंधितांना सांगितला जातो. ते एका फॉर्मवर नोंदवून त्यावर सगळ्यांच्या सह्या घेऊन त्याची प्रत त्यांना केंद्राध्यक्षांच्या सहीने दिली जाते. त्याच्या दोन प्रती ईव्हीएम मशिनसोबत जमा केल्या जातात, एक झोनल ऑफिसरकडे दिली जाते.

  • टपालाने आलेले मतदान, तसेच एखाद्याच्या नावावर कुणी दुसऱ्याने मतदान केले असेल तर संबंधितांची ओळख पटवून घेऊन झालेले टेंडर मतदान अशी किरकोळ स्वरुपातील अधिकची मते असतात.

  • मतदान केंद्राध्यक्षाला दिवसभरात आलेल्या अडचणी, मतदान प्रक्रियेत काही अडथळे आले असतील तर त्याच्या नोंदी एका डायरीत कराव्या लागतात आणि ती डायरीही ईव्हीएमसोबत जमा करावी लागते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com