Loksabha Election : भाजप कार्यकर्ते ३३ जागांसाठी आग्रही; गृहमंत्री शहा साधणार राज्यातील नेत्यांशी संवाद

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आज रात्री दोन दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर आगमन झाल्यामुळे भाजपची महाराष्ट्रातील निवडणूक व्यूहरचना आकार घेऊ लागली आहे.
Amit Shah
Amit Shahsakal

मुंबई - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आज रात्री दोन दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर आगमन झाल्यामुळे भाजपची महाराष्ट्रातील निवडणूक व्यूहरचना आकार घेऊ लागली आहे.

राज्यातील ४८ पैकी तब्बल ३३ जागा लढण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून केली जाऊ लागली आहे. राज्यातील ७० टक्क्यांपेक्षा जास्त मतदारसंघांत भाजपचे उमेदवार रिंगणात उतरले तर निकाल अनुकूल लागतील, असा पक्षातील चाणक्यांचा अहवाल आहे. उद्या (ता.५) आणि परवा (ता.६) शहा हे राज्यातील नेत्यांशी संवाद साधणार आहेत.

भाजपने गेल्या वेळी लढलेल्या सर्व जागांसह या वेळी रत्नागिरी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, ठाणे आणि मुंबईतील दक्षिण आणि उत्तर पश्चिम हे मतदारसंघ लढावेत अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

आकडेवारी अन् परिस्थिती लक्षात घेता मतदारसंघांचा आकडा हा प्रतिष्ठेचा मुद्दा न करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या नेतृत्वात चारशेपार जाण्यासाठी मदत करतील असा विश्वास भाजपचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. माढाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) आणि अमरावतीची जागा शिवसेनेला (शिंदे गट) देण्याबाबत विचार सुरू आहे.

तावडे चर्चेत असणार?

संघटनेत वाद असलेल्या जागा या मित्रपक्षांकडे चांगले उमेदवार असल्याने त्यांना सोपवाव्यात. लोकसभेत जास्तीतजास्त जागा जिंकणे हे सध्याचे एकमेव ध्येय असावे, असे ठरविण्याची विनंती केली जाणार आहे. गृहमंत्री शहा हे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार तसेच माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करणार आहेत असे समजते. विनोद तावडे यांचाही या चर्चेत सहभाग असू शकतो.

बैठकीतच अंतिम निर्णय

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री गृहमंत्री शहांसोबत उपस्थित राहतील. मित्रपक्षांशी शहा आणि फडणवीस यांची अनौपचारिक चर्चा होईल मात्र जागावाटपाबाबतचे अंतिम निर्णय घेण्यापूर्वी पक्षाची बैठक होईल. ही बैठक प्रदीर्घ असेल असे मानले जाते. बावनकुळे यांच्याशी संपर्क साधला असता अद्याप काही ठरले नसल्याचे त्यांनी नमूद केले.

मित्रपक्षांना त्यांच्या समांतर पक्षांशी लढण्यावर भर द्यावा लागणार असल्याने आता त्यांना जास्त जागा देण्याऐवजी वेळ द्यावा. लोकसभेचे निकाल मोदींना अपेक्षित असे लागल्यानंतर या दोन्ही पक्षांना विधानसभेच्या जागावाटपात सध्याच्या त्यागाचे बक्षिस दिले जावे, असाही मतप्रवाह आहे.

शहा छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल

भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या (ता. ५) राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. सायंकाळी ६.३० वाजता सांस्कृतिक मैदानावर त्यांची सभा होणार आहे. सोमवारी रात्री दहा वाजता त्यांचे शहरात आगमन झाले आहे. अमित शहा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ही पहिलीच सभा असून मराठवाड्यासाठी ते काय घोषणा करणार? याची उत्सुकता आहे.

सायंकाळी होणाऱ्या या सभेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com