काँग्रेस-राष्ट्रवादीचे २६-२२ चे सूत्र

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019

‘स्वाभिमानी’ला दोन जागा देणार; अधिकृत घोषणा लवकरच
मुंबई - ‘काँग्रेस-राष्ट्रवादीचे जागावाटप निश्‍चित झाले असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात दिल्लीत झालेल्या बैठकीत त्यावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले आहे. आता काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे व माझ्यात अखेरची बैठक होणार आहे. त्यानंतर जागावाटपाचे सूत्र जाहीर केले जाईल,’’ अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आज दिली.

‘स्वाभिमानी’ला दोन जागा देणार; अधिकृत घोषणा लवकरच
मुंबई - ‘काँग्रेस-राष्ट्रवादीचे जागावाटप निश्‍चित झाले असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात दिल्लीत झालेल्या बैठकीत त्यावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले आहे. आता काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे व माझ्यात अखेरची बैठक होणार आहे. त्यानंतर जागावाटपाचे सूत्र जाहीर केले जाईल,’’ अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आज दिली.

काँग्रेस २६, तर राष्ट्रवादी २२ लोकसभेच्या जागा लढवणार आहे. दोन्ही पक्षांनी आपल्या कोट्यातून घटक पक्षांना जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. राजू शेट्‌टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन जागा देण्याचे संकेत आहेत. 

शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आज पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक घेतली. यामध्ये आघाडीचे जागावाटप, घटकपक्षांच्या जागा, मनसेसोबत युतीचा निर्णय, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. शरद पवार यांनी स्वत: माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा आग्रह या वेळी सर्वच नेत्यांनी केला. पवार यांनीही नेत्याची भूमिका जाणून घेत दोन दिवसांत निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले. मात्र, शरद पवार माढा लोकसभेत उमेदवार राहतील, यावर या बैठकीत शिक्‍कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांची यादी पूर्ण झाली असून, आजच्या बैठकीत त्यावर शिक्‍कामोर्तब झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या उमेदवारांची घोषणा २० फेब्रुवारीपर्यंत केली जाईल, असे प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले. 

आंबेडकर प्रतिसाद देतील
बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी महाआघाडीत सहभागी होण्याची चर्चा सुरू आहे. त्यांना चार जागा सोडण्यास दोन्ही काँग्रेसची तयारीही आहे. मात्र, अद्याप आंबेडकर यांनी प्रतिसाद दिलेला नाही. त्यांनी तो द्यावा, असे आवाहन प्रफुल्ल पटेल यांनी या वेळी केले. 

पहिली सभा २० रोजी
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची पहिली संयुक्‍त सभा २० फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. त्यानंतर दुसरी संयुक्‍त सभा २३ फेब्रुवारी रोजी बीडला परळी येथे होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मनसे आघाडीत येणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाआघाडीत सहभागी व्हावे, अशी राष्ट्रवादीची इच्छा आहे. त्यासाठीच राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती अजित पवार यांनी या बैठकीत दिली. मनसेला कल्याण-डोंबिवली हा लोकसभा मतदारसंघ सोडण्यास राष्ट्रवादीची तयारीही असल्याची चर्चा झाली. मात्र, काँग्रेससोबत चर्चा करूनच निर्णय जाहीर केला जावा, अशी भूमिका काही नेत्यांनी बैठकीत मांडली. मनसेला आघाडीत घेण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, लवकर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व मी स्वत: राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election Congress NCP Seat Distribution MNS Mahaaghadi Politics