esakal | अण्णा भाऊ साठे प्रकाशन समिती कागदावरच; शासनस्तरावर उदासीनता
sakal

बोलून बातमी शोधा

अण्णा भाऊ साठे प्रकाशन समिती कागदावरच; शासनस्तरावर उदासीनता

अण्णा भाऊ साठे प्रकाशन समिती कागदावरच; शासनस्तरावर उदासीनता

sakal_logo
By
डॉ. प्रमोद फरांदे

कोल्हापूर : सर्वसामान्य व्यक्तीला नायक करून लोकांना जगण्याचे बळ देणाऱ्या व समता, स्वातंत्र्य, बंधुता, मानवतेचे संस्कार करणाऱ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे(lokshahir anna bhau sathe) यांच्या साहित्याबाबत शासनस्तरावर आजही उदासीनता आहे. मागणी असूनही अण्णा भाऊंचे साहित्य तीन वर्षांपासून छापलेले नाही. चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन होऊन सहा महिने झाले; मात्र या समितीतील सदस्यांची एकही बैठक झालेली नाही. अन्य समितीची कामे सुरू झाली; मात्र ही समिती अद्याप कागदावरच आहे.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हा मोठा ठेवा आहे. पीडित, शोषित, उपेक्षित वर्ग, जातीवाद, अंधश्रद्धेचे प्रश्‍न त्यांनी साहित्यातून मांडले. कथा, कादंबरी, पोवाडे, शाहिरी, कविता, छक्कड, लावणीच्या माध्यमातून प्रबोधन केले. त्यांच्या साहित्यातून लोकांना जगण्याचे बळ मिळते, शिवाय मानवतावादी विचारांचे संस्कार होतात. त्यामुळे समाजातील जातीयता, अंधश्रद्धा यांसारखे सामाजिक प्रश्‍न सोडविण्यासाठी मानवतावादी साहित्यात उपयुक्त ठरतात. त्यामुळे महापुरुषांच्या विचार आणि कार्यावर प्रकाश टाकणारे साहित्य शासनातर्फे प्रकाशित केले जाते. त्यासाठी अभ्यासकांची प्रकाशन समिती स्थापन केली जाते.

अण्णा भाऊ साठे यांचे साहित्याचे दोन खंड यापूर्वी प्रकाशित झाले होते; मात्र ते तीन वर्षांपूर्वीच संपले आहेत. अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन नसल्याने खंड संपादनाचे काम थाबले होते. सात महिन्यांपूर्वी राज्य शासनाकडून अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन करण्यात आली. त्यानंतर साहित्य संस्कृती मंडळासह अन्य प्रकाशन समित्याही स्थापन करण्यात आल्या; मात्र अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीचे काम सुरू झालेले नाही. या समितीतील सदस्य नियुक्तींचा अध्यादेश निघाला, नियुक्तीचे पत्र मेलद्वारे पाठविले; मात्र शासनस्तरावरून पुढे हालचाल झाली नाही.

समितीतील सदस्य सचिवांसह अनेक सदस्य शासनाकडे पत्रव्यवहार करून कामकाज सुरू करण्यासाठी पाठपुरावा करत आहेत; मात्र त्यावर कार्यवाही होत नसल्याची खंत सदस्य व्यक्त करतात. अण्णा भाऊंचे साहित्य विपुल आहे. ते केवळ दोन खंडांत बसणारे नाही. त्यासाठी किमान पाच ते सहा खंड प्रकाशित करावे लागतील; मात्र त्यासाठी बैठक घेऊन पहिल्या दोन खंडांचे पुनर्प्रकाशन, तसेच नव्या खंडाच्या संपादनाचे नियोजन करण्याची मागणी होत आहे.

साहित्यातून शासनाला महसूल

शासनातर्फे अनेक साहित्य प्रकाशित केले जाते. महापुरुषांचे विचार व कार्यांचा प्रचार व प्रसार होऊन निकोप समाज निर्माण व्हावा, हा उद्देश यामागे असला तरी शासनास या वैचारिक साहित्यातून महसूल मिळतो. ग्रंथ व इतर साहित्याची विक्री करताना नफ्याचा विचार करूनच किंमत ठरविली जाते. असे असतानाही महापुरुषांचे साहित्य प्रकाशित करण्यास शासनस्तरावर उदासीनता दाखविली जात आहे.

कोरोनामुळे शासनस्तरावर सदस्यांची एकही बैठक झालेली नाही. समितीचे अध्यक्ष मंत्री उदय सामंत यांच्यासोबत सदस्यांची लवकर बैठक होऊन कामास प्रारंभ व्हावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

- मल्लिका अमर शेख, सदस्य सचिव, अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती, मुंबई.

loading image