परतीचा फटकारा सुरूच; मराठवाड्यात सोयाबीनसह विविध पिकांवर पाणी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 12 October 2020

राज्यभरात सोयाबीन, तूर, कांदा, टोमॅटो, ऊस, मका आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले. सप्टेंबर महिन्यात पावसाच्या कहरातून वाचलेली पिके आता नुकसानीच्या कचाट्यात सापडली आहेत.

पुणे- राज्यातील अनेक भागांना शनिवारी (१०) आणि रविवारी (ता.११) परतीच्या पावसाने अक्षरश- झोडपून काढले. कोकणात शेतात काढून ठेवलेले भात पीक पाण्यावर तरंगत होते, तर, मराठवाड्यात वेचणीला आलेला कापूस पाण्यात भिजला आणि गळून पडला. राज्यभरात सोयाबीन, तूर, कांदा, टोमॅटो, ऊस, मका आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले. सप्टेंबर महिन्यात पावसाच्या कहरातून वाचलेली पिके आता नुकसानीच्या कचाट्यात सापडली आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मराठवाड्यात ठिकठिकाणी सलग दुसऱ्या दिवशी, रविवारी (ता. ११) परतीच्या पावसाने तडाखा दिला. काही ठिकाणी रिपरिप तर काही भागात मुसळधार पाऊस कोसळला. काढणीला आलेल्या पिकांत पाणी तुंबले. 

‘जायकवाडी‘सह तीन धरणांतून पुन्हा विसर्ग
यंदा जायकवाडी धरणातून पाच सप्टेंबरपासून ३१ दिवस पाण्याचा विसर्ग सुरु होता. या धरणाचे दरवाजे सहा ऑक्टोबरला बंद केल्यानंतर पाणलोट क्षेत्रात परतीचा पाऊस झाल्याने आज पुन्हा १८ दरवाजे उघडून २८ हजार २९६ क्युसेकने गोदावरीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. परभणी जिल्ह्यातील लोअर दुधना धरणाचे आठ दरवाजे ०.२० मीटरने उचलून दूधना नदीपात्रात चौदा हजार ४८८ क्युसेसकने तर कळमनुरी तालुक्यातील (जि. हिंगोली) इसापुर धरणाचे पाच दरवाजे ५० सेंटिमीटर उघडून २४१. ८५९ क्युमेक्सने पैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पावसाने दाणादाण
कापूस गळून पडला
सोंगूण ठेवलेले सोयाबीन भिजले
कापणी केलेला भात पाण्यावर तरंगला
टोमॅटो, दोडक्याच्या वेली जमीनदोस्त
ऊस, मका पीक आडवे
कांदा रोपे सडू लागली

परभणी जिल्ह्यात धो-धो
परभणी - जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज पहाटे सहा ते दहाच्या दरम्यान धो-धो पाऊस झाला. त्यानंतर बराचवेळ रिमझिम सुरू होती. नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहले. शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीनला फटका बसला. कापसाचेही नुकसान झाले. जिंतूर शहरात चार तास झालेल्या मुसळधारेने जनजीवन विस्कळीत झाले. या तालुक्यातील सावळी नदीला पूर आला.  सेलू तालुक्यात सोयाबीनला फटका बसला. चारठाणा, ताडकळस, पूर्णा, मानवत येथेही पाऊस झाला.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हिंगोलीत मेघगर्जनेसह पाऊस
हिंगोली : हिंगोली शहरासह औंढा, वसमत, कळमनुरी, सेनगाव तालुक्यात आज सकाळी आठ ते दहाच्या दरम्यान मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. नदी, नाल्यांना पाणी आले. सोयाबीन झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली. साखरा (ता. सेनगाव) परिसरात वादळी पावसाने तुरीचे पिक आडवे झाले. 

बेन्नतुरा प्रकल्प भरला
उस्मानाबाद - जिल्ह्यात पहाटे, दुपारी जोरदार पाऊस झाला. शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले. उमरगा तालुक्यातही चांगला पाऊस झाला असून बेन्नतुरा प्रकल्प पूर्णपणे भरला आहे. तुळजापूर, लोहारा, भूम, कळंब, वाशी, परंडा तालुक्यातही पावसाने दमदार हजेरी लावली. सोयाबीनचे नुकसान झाले आहे.

बीडमध्ये जोरदार हजेरी
बीड - पंधरा दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाची जिल्ह्यात शनिवारपासून जोरदार हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असून ऊस लोळला आहे. काही शेतातील कापसाच्या वाती झाल्या. शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीनला फटका बसला.

नांदेडमध्ये हलक्या सरी
नांदेड - जिल्ह्यात पहाटेपासूनच ढगाळ वातावरण आहे. दुपारच्या सुमारास काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. सोयाबीन काढणीत व्यस्त असलेल्या शेतकऱ्यांची धांदल उडाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loss of soybean crop in Marathwada due to return rains