‘रासप’ला १४ जागा हव्यात - जानकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

लोकसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नसतानाही आम्ही युतीसोबत राहिलो. मात्र आता विधानसभेसाठी १४ जागा हव्या आहेत. या जागा मिळाल्या; तरच पक्षाला मान्यता मिळणार आहे. रासप भाजपच्या नव्हे; तर पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढविणार असल्याचे ‘रासप’चे अध्यक्ष महादेव जानकर यांनी स्पष्ट केले. 

मुंबई - लोकसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नसतानाही आम्ही युतीसोबत राहिलो. मात्र आता विधानसभेसाठी १४ जागा हव्या आहेत. या जागा मिळाल्या; तरच पक्षाला मान्यता मिळणार आहे. रासप भाजपच्या नव्हे; तर पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढविणार असल्याचे ‘रासप’चे अध्यक्ष महादेव जानकर यांनी स्पष्ट केले. 

राष्ट्रीय समाज पक्षाचा १६वा वर्धापन दिन दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर आज झाला. व्यासपीठावर महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार राहुल कुल उपस्थित होते. कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये ‘रासप’ला पक्ष म्हणून मान्यता असल्याचं सांगतानाच ‘रासप’ला दौंडची जागा सोडण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. रासप भाजपच्या चिन्हावर लढणार नाही, आम्ही आमच्याच चिन्हावर निवडणूक लढवू, असं सांगतानाच पंकजा मुंडे यांनी आमची मागणी पूर्ण करावी, असा आग्रहही त्यांनी धरला. दरम्यान, धनगर समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय भाजप सरकारच घेईल. त्यामुळे आम्ही भाजपला साथ देत असल्याचे त्यांनी या वेळी जाहीर केले. पंकजा मुंडे म्हणाल्या की, रासपची राज्यात ताकद वाढली आहे. रासपचे ९८ जिल्हा परिषद सदस्य आहेत. नगरपालिका, बाजार समित्यांवर रासपचे वर्चस्व असल्याने निवडणुकीत रासपचा योग्य जागा देऊन सन्मान केला जाईल.  दरम्यान, राष्ट्रीय समाज पक्षाच्या वर्धापन दिनाला अभिनेता संजय दत्त यांनी व्हिडिओवरून शुभेच्छा दिल्या; तसेच रासपच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे सांगितले.

रासपची ताकद वाढत असून त्याचा वटवृक्ष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे जानकर यांची ताकद चौकात नसून शिवाजी पार्कापर्यंत पोचली आहे.  
पंकजा मुंडे, ग्रामविकास,  महिला व बालकल्याणमंत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahadev Jankar demand fourteen seat