विठ्ठला आजपासूनच जगावरील कोरोनाचे संकट नष्ट कर : मुख्यमंत्री

Mahapuja of Shri Vitthal Rukmini at the hands of Chief Minister Uddhav Thackeray
Mahapuja of Shri Vitthal Rukmini at the hands of Chief Minister Uddhav Thackeray

पंढरपूर (सोलापूर) : विठूमाऊली, आज आषाढी एकादशी पासूनच संपूर्ण जगावरील कोरोनाचे संकट नष्ट कर.  जगाला पुन्हा एकदा मोकळे, निरोगी आणि आनंदी जीवन जगण्याचे भाग्य लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल- रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पहाटे करण्यात आली.  पूजेनंतर श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीच्या वतीने ठाकरे दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे पहाटे दोन वाजून दहा मिनिटांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आगमन झाले. दोन वाजून वीस मिनिटांनी श्री विठ्ठलाच्या पूजेला प्रारंभ झाला.
श्री विठ्ठलाची परंपरेप्रमाणे भक्तीभावाने पूजा करण्यात आली. विठ्ठलाला मोरपंखी रंगाचे मलमली वस्त्र परिधान करण्यात आले. फुलांचा आणि तुळशीचा हार घालण्यात आला तेव्हा सावळ्या विठुरायाचे रूप अधिकच खुलून दिसू लागले. विठ्ठलाची आरती करण्यात आली. तेव्हा उपस्थित सर्वांनी पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय असा जयघोष केला. त्यानंतर श्री रुक्मिणी मातेची देखील परंपरेप्रमाणे पूजा करण्यात आली. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना श्री. ठाकरे म्हणाले, विठू माऊली समोर कोणी मुख्यमंत्री नाही, मंत्री नाही अथवा अधिकारी देखील नाही. माऊली पुढे सर्वजण सारखेच. आषाढी एकादशीच्या पूजेचा मान कधी मिळेल असा विचार स्वप्नातही केला नव्हता. आज हा मान जरूर मिळाला परंतु अशा परिस्थितीत, मास्क बांधून पूजा करावी लागेल, असेही कधी वाटले नव्हते. आज आपण केवळ महाराष्ट्राच्या वतीने नव्हे तर संपूर्ण विश्वाच्या वतीने विठू माऊलीच्या चरणी कोरोनाचे संकट दूर कर असे साकडे घातले आहे.आत्तापर्यंत माऊलीचे चमत्कार आपण सर्वजण ऐकत आलो आहोत. कोरोनापुढे मानवाने हात टेकले आहेत. 
कोणतेही औषध आपल्याकडे नाही. असे तोंडाला पट्टी बांधून किती दिवस जगायचे. आज आषाढी आहे. विठुराया आजपासूनच जगावरील कोरोनाचे संकट दूर कर असे साकडे आपण घातले आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या प्रस्तावित कामांना तत्वतः मान्यता मिळावी, त्याचबरोबर या ठिकाणच्या पोलिसांच्या व्यथा दूर कराव्यात अशा मागण्या आपल्याकडे करण्यात आल्या आहेत असे सांगून श्री. ठाकरे म्हणाले या ठिकाणी जे जे करणे गरजेचे आहे ते निश्चितपणे केले जाईल. सर्व मागण्या आपण पूर्ण करून दिल्याशिवाय राहणार नाही. प्रारंभी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले कोरोनाचा इतका मोठा प्रादुर्भाव असताना देखील श्री. ठाकरे ही वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून सहकुटुंब श्री विठ्ठल रुक्मिणी च्या पूजेसाठी आले आहेत. भारतातील मुख्यमंत्र्यांमध्ये टॉप फाइव्हमध्ये श्री. ठाकरे आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांनी आपणास मंदिर समितीच्या कामाविषयी माहिती दिलेली आहे. दर्शनाच्या रांगेसाठी स्काय वॉक आणि दर्शनमंडप या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी सुमारे चाळीस कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यास आवश्यक मान्यता द्यावी अशा मागण्या श्री. औसेकर महाराज यांनी मांडल्या.
श्री. औसेकर यांच्या हस्ते ठाकरे दांपत्याचा तर मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते वारकरी प्रतिनिधी म्हणून मान मिळालेल्या बडे दाम्पत्याचा श्री विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. शासनाच्या वतीने दरवर्षी पंढरपूर नगरपालिकेला पाच कोटी रुपये यात्रा अनुदान दिले जाते. त्याचा धनादेश श्री. ठाकरे यांच्या हस्ते नगराध्यक्ष साधना भोसले आणि मंदिर समितीच्या सदस्य, नगरसेविका शकुंतला नडगिरे यांच्याकडे देण्यात आला. कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी पालकमंत्री दत्ता भरणे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, मंदिर समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. मानाचे वारकरी म्हणून श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरातील विणेकरी अहमदनगर जिल्ह्यातील विठ्ठल ज्ञानदेव बढे आणि सौ. अनुसया बढे (मु. चिंचपूर- पांगुळ, ता. पाथर्डी) यांना मान देण्यात आला. या दाम्पत्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी पूजा केली.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पुणे येथील भारत भुजबळ यांच्या वतीने देण्यात आलेल्या सतरा प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. त्यासाठी सुमारे दोन टन फुलांचा वापर करण्यात आला होता. फुलांची मनमोहक सजावट सर्वांचे लक्ष वेधत होती. महापूजेच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. मंदिरात उपस्थित असलेल्या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. सोशल डिस्टंसिंग चे पालन करत मंदिरातील पुजारी यांच्यासह सर्वांनी मास्कचा वापर केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com