राज्यात सर्वाधिक कोरोना रूग्ण मुंबईत; 24 तासात 1,036 बाधित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 maharashtra 1036 new corona cases recorded in last 24 hours

राज्यात सर्वाधिक कोरोना रूग्ण मुंबईत; 24 तासात 1,036 बाधित

मुंबई : गेल्या चार ते पाच दिवासांपासून राज्यातील कोरोना (Maharashtra Corona News) बाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसून येत असून, सातत्याने नव्या बाधितांच्या संख्येने हजारांपुढील आकडा नोंदवला आहे. त्यामुळे प्रशासनासह आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. गेल्या 24 तासात राज्यात 1036 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर, 374 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर देशात गेल्या 24 तासांत 4 हजार 518 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (Maharashtra Corona Update)

दरम्यान, आज नोंदवण्यात आलेल्या रूग्णांपैकी सर्वाधिक रूग्णांची नोंद मुंबईत करण्यात आली असून, 24 तासात मुंबईमध्ये 676 रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, वाढत्या कोरोना रूग्णांमध्ये दिलासादायकबाब म्हणजे राज्यात आज कोरोनाच्या शून्य मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राज्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.03 टक्क्यांवर पोहोचले असून, मृत्यूदर 1.87 टक्के इतका नोंदवण्यात आला असून, राज्यातील आज घडीला 7,429 सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यातील सर्वाधिक 5,238 रूग्ण हे एकट्या मुंबईत असून, या खालोखाल ठाण्याचा क्रमांक असून ठाण्यामध्ये 1,172 इतके सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढताना दिसून येत आहे.

आषाढी वारीबाबत आरोग्य मंत्र्यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...

आगामी काळात पालखी सोहळा निघणार असून, यामध्ये साधारण 10 ते 15 लाख नागरिक एकत्र येतात. यामुळे अधिक कोरोनाचा प्रसार होण्याची भीती आहे. त्यामुळे कोरोना नियमांचे योग्य पालन करूनच हा सोहळा साजरा करण्याचे आता सध्या तरी ठरवण्यात आले आहे. बैठकीमध्ये वारीमध्ये सविस्तर चर्चा पार पडल्याचे टोपे म्हणाले. वारीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. या उत्सवामागे लोकांच्या भावना आहेत. त्यामुळे आगामी काळाती होऊ घातलेला वारी उत्सव नक्कीच होईल त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या निर्बंघ लावण्याचा विचार राज्य सरकारचा नसेल, असे आपले मत असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले आहे. ते मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मास्क वापरण्याचे पुन्हा आवाहन

राज्यातील वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येनंतर टोपेंनी नागरिकांना पुन्हा एकदा मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. जरी राज्यात मास्क सक्ती नसली तरी, आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांनी स्वतःहून मास्क वापरावा असे टोपे म्हणाले. सध्या तरी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्याचा कोणताही विचार नसल्याचेही टोपे यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र, नागरिकांनी स्वतःच्या आरोग्यासाठी मास्कचा वापर करावा असे आवाहन केले आहे.