महाराष्ट्रात 292 हेल्थ केअर वर्करचा कोरोनाने मृत्यू; देशापेक्षा राज्यात कोरोना पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण अधिक

भाग्यश्री भुवड
Sunday, 30 August 2020

राज्यातील एकूण 1 लाख 58 हजार 878 हेल्थ वर्करची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी एकूण 24 हजार 484 हेल्थ केअर वर्कर बाधित आढळून आले. त्यानुसार, राज्यात हेल्थ केअर वर्कर बाधित होण्याचे प्रमाण 15 टक्के एवढे आहे.

मुंबई : कोरोना रुग्णसेवा बजावणाऱ्या हेल्थ वर्कर्स सध्या कोरोनाच्या रडारवर आहेत. राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. अश्यातच राज्यातील रुग्णांना अखंडपणे सेवा देणारे ही मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या विळख्यात येत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील 292 हेल्थ केअर वर्कर्सचा आता पर्यंत मृत्यू झाला आहे. 

देशातील एकूण हेल्थ केअर वर्करच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक असून कोरोना रुग्णसेवा करणाऱ्या हेल्थ वर्कर कोरोनाच्या रडारवर आहेत. राज्यातील हे प्रमाण 15 टक्के असून देशात हे फक्त 9 टक्के आहे. दरम्यान, देशात 28 ऑगस्टपर्यंत 573 हेल्थ वर्कर्सच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या हेल्थ वर्करची त्यांच्या तक्रारीनुसार कोरोना चाचणी करण्यात येते. राज्यातील एकूण 1 लाख 58 हजार 878 हेल्थ वर्करची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी एकूण 24 हजार 484 हेल्थ केअर वर्कर बाधित आढळून आले. त्यानुसार, राज्यात हेल्थ केअर वर्कर बाधित होण्याचे प्रमाण 15 टक्के एवढे आहे. त्यामुळे, डॉक्टरांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. देशाच्या तुलनेने पाहिल्यास राज्यात हेल्थ केअर वर्कर बाधितांची संख्या सर्वाधिक आहे. 

देशात 9 लाख 95 हजार 922 हेल्थ केअर वर्करची कोरोना चाचणी करण्यात आली. यात 87 हजार 176 जण बाधित आढळून आले. देशातील हेल्थ केअर वर्करमध्ये बाधित होण्याचे प्रमाण 9 टक्के आहे. तर देशात 573 हेल्थ केअर वर्करचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच राज्यातील बाधित होण्याचे प्रमाण दुप्पट आहे.

चाचण्या आणि कोरोनाबाधितांमध्ये महाराष्ट्र पहिला... 

दरम्यान, देशात करण्यात आलेल्या एकूण चाचण्यांपैकी सर्वाधिक चाचण्या हे राज्यात (1,58,878) करण्यात आल्या आहेत. त्यापाठोपाठ, तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यात अनुक्रमे 1,53,727 आणि 1,07,100 एवढ्या चाचण्या केल्या गेल्या आहेत. देशात आतापर्यंत 87,176 हेल्थ वर्कर्स कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. या वाढत्या संख्येमुळे तद्य डॉक्टर्स भीती व्यक्त करत आहेत.
 
संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Maharashtra 292 health care workers died due to corona