
अनलॉकची नवी नियमावली जाहीर; हॉटेल चालकांना दिलासा नाहीच!
मॉल्स, गार्डन्स उघडणार पण सिनेमागृह बंदच
मुंबई : राज्यात अनलॉकची नवी नियमावली जाहीर झाली आहे. या नव्या नियमावलीनुसार, व्यापारी आणि मॉल्स चालकांना दिलासा देण्यात आला आहे. पण हॉटेलचालकांची मात्र घोर निराशा झाली आहे. तसेच मॉल्स, गार्डन उघडणार आहेत. पण सिनेमागृहे आणि नाट्यगृहे अद्याप बंदच राहणार आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाकडून ही नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, पुढील ११ जिल्ह्यांसाठी जुनीच नियमावली कायम राहणार आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांचा समावेश आहे. हे सर्व जिल्ह्ये अद्याप कोरोना नियमावलीच्या लेवल तीनमध्येच कायम असणार आहेत. मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्याला जुन्या नियमवालीतून वगळण्याबाबतचा निर्णय आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत घेण्यात येणार आहे.
वरील १४ जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर उर्वरित जिल्ह्यांमध्ये नवी नियमावली लागू होणार आहे. ती अशी...
सर्व अत्यावश्यक आणि इतर दुकानं (शॉपिंग मॉल्ससह) आठवड्यातील सर्व दिवस रात्री ८ वाजेपर्यंत खुले राहणार आहेत. तर शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत खुली राहतील. तर रविवारी अत्यावश्यक सेवांशिवाय सर्व दुकानं आणि मॉल्स बंद राहतील.
सर्व सार्वजनिक उद्यानं आणि खेळाची मैदानं व्यायामासाठी, चालण्यासाठी, जॉगिंगसाठी आणि सायकलिंगसाठी खुली राहतील.
सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेनं सुरु राहतील. पण प्रवासादरम्यान गर्दी टाळण्यासाठी त्याप्रमाणं कामाच्या वेळेमध्ये बदल करणं गरजेचं आहे.
ज्या कार्यालयांना वर्क फ्रॉम सुविधा सुरु ठेवणं शक्य असेल त्यांना ती चालू ठेवता येईल.
सर्व प्रकारची शेतीसंबंधीची काम, बांधकामाची कामं, व्यावसायिक कामं, मालाची वाहतुक पूर्ण क्षमतेनं सुरु ठेवण्यास परवानगी.
जीम, योगा सेंटर्स, कटिंगची दुकानं, ब्युटी पार्लर्स आणि स्पा ची दुकानं ५० टक्के क्षमतेनं रात्री ८ वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. शनिवारी ही दुकानं दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु राहतील. तर रविवारी पूर्णपणे बंद राहतील. पण यामध्ये एसीचा वापर करता येणार नाही.
सर्व प्रकारची चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि मल्टिप्लेक्स (स्वतंत्र आणि मॉल्स असलेली) पुढील आदेश येईपर्यंत बंदच राहतील.
सर्व धार्मिकस्थळं पुढील आदेश येईपर्यंत बंदच राहतील.
शाळा आणि कॉलेजेससाठी राज्याच्या शिक्षण विभागाचे आणि उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे आदेश लागू राहतील.
सर्व प्रकारची रेस्तराँ ५० टक्के क्षमतेसह दुपारी ४ वाजेपर्यंत खुली राहतील. याकाळात कोविडची सर्व प्रोटोकॉल्स पाळणं बंधनकारक राहिल. सध्या ज्या प्रकारे पार्सल सेवा सुरु आहे ती कायम राहिल.
त्याचबरोबर रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत घराबाहेर पडण्यावरील निर्बंध कायम असतील.
गर्दी टाळण्यासाठी बर्थडे सेलिब्रेशन, राजकीय, समाजिक आणि सांस्कृतीक कार्यक्रम, निवडणुका, निवडणूक प्रचार, प्रचार यात्रा, निषेध मोर्चे यांच्यावर निर्बंध कायम राहतील.
त्याचबरोबर सर्व प्रकारचे कोविडचे प्रोटोकॉल्स जसे मास्क, सोशल डिस्टंसिंगचा वापर राज्यातील सर्व नागरिकांनी करणं बंधनकारक आहे. जर या नियमांचं उल्लंघन कुणी केलं तर त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
Web Title: Maharashtra Announces New Corona Regulations Consolation To Merchants Hoteliers
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..