Maharashtra Winter Session : विधानसभेचं पहिलं अधिवेशन मुंबई-नागपूर नाही तर चक्क पुण्यात झालं होतं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Winter Session

Maharashtra Winter Session : विधानसभेचं पहिलं अधिवेशन मुंबई-नागपूर नाही तर चक्क पुण्यात झालं होतं

Winter Session : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. तब्बल दोन वर्षानंतर यंदा नागपुरात हिवाळी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात राज्याचे दोन्ही सभागृह, विधानसभा आणि विधान परिषद समाविष्ट आहेत,.नागपूरमध्ये दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर-जानेवारीमध्ये आयोजित केली जातात. मात्र विधानसभेचं पहिलं अधिवेशन पुण्यात झालं होतं याची कल्पना तुम्हाला होती काय?

नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे. हा सत्र विधान भवन, नागपूर येथे आयोजित केला जातो. सध्या तरी मुंबई सोडून फक्त नागपूर मध्येच महाराष्ट्राचे अधिवेशन घडते. पण यापूर्वी काही अधिवेशने इतर गावांमध्ये देखील झाली आहेत. इतकंच नव्हे तर विधानसभेचं पहिलं अधिवेशन चक्क पुण्यात झालं होतं. कधी काय तेच आता पाहू.  

भारताच्या घटनात्मक इतिहासातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे १९३५ चा भारत सरकार कायदा (Govt. of India Act, 1935) अस्तित्त्वात आला, ज्यात संघराज्यात्मक शासन पद्धती (Federal form of Govt.) स्वीकारण्यात आली होती. तसेच, प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली होती. या कायद्यान्वये विधानसभा व विधानपरिषद असे नामाभिधान देऊन दोन सभागृहे मुंबई प्रांतात, १९३७ मध्ये अस्तित्त्वात आली.

विधानसभेचे पहिले अधिवेशन :-

१९३५ च्या कायद्यानुसार जुलै, १९३७ मध्ये १७५ सदस्य असलेली विधानसभा अस्तित्वात आली. पुण्याच्या गणेशखिंडीवर असलेल्या 'गव्हर्नरस् हाऊस' येथे बाळासाहेब खेर व मंत्रीमंडळातील ०६ सदस्यांचा शपथविधी दिनांक १९ जुलै, १९३७ रोजी पार पडला. शपथविधी झाल्यानंतर मंत्रीमंडळाचे सर्व सदस्य कॉंग्रेस कचेरीत आले व तेथे त्यांनी तिरंगी ध्वजाला प्रथम मानवंदना दिली. 

विधानसभेचे पहिले अधिवेशन १९ जुलै, १९३७ रोजी पुणे येथील कौन्सिल हॉलमध्ये भरले होते. गव्हर्नर यांनी रावबहादूर गणेश कृष्ण चितळे यांची हंगामी स्पीकर (Protem Speaker) म्हणून नियुक्ती केली होती. मंत्रीमंडळाच्या सदस्यांना मिरवणुकीने कौन्सिल हॉलवर आणले गेले. त्या दिवशी पुण्यातील कौन्सिल हॉलला जाहीरसभेचे स्वरुप प्राप्त झाले होते.

लोकांच्या उत्साहाला उधाण आले होते. विधिमंडळाच्या कामकाजाची शिस्त व संकेत मोडले जात होते. शेकडो प्रेक्षकांनी सभागृहात प्रवेश मिळविला होता. तर प्रचंड जनसमुदाय सभागृहाबाहेर जमला होता. या ऐतिहासिक व अभूतपूर्व प्रसंगाचे चित्रीकरण " प्रभात फिल्म " या कंपनीने केले होते. दिनांक १९ व २० जुलै, १९३७ रोजी सदस्यांचा शपथविधी पार पाडला. विधानसभेच्या अध्यक्षांची तसेच उपाध्यक्षांची निवड दिनांक २१ जुलै, १९३७ रोजी झाली.

हेही वाचा: Maharashtra Winter session 2022: जेव्हा शिंदे आणि ठाकरे गटाचे आमदार भिडतात..

गणेश वासुदेव मावळंकर आणि नारायण गरुराव जोशी हे अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून अविरोध निवडून आले. सदस्यांनी शपथ घेतल्यानंतरही स्वातंत्र्यप्राप्तीच्या ध्येयाकडे जाण्याचा मार्ग सदस्यांनी स्वीकारला होता. त्या दिवशी सर्व सदस्यांनी " वंदे मातरम्" गंभीर वातावरणातः गायिले. तो क्षण स्वातंत्र्याच्या ऊर्मीचा विलोभनीय असा अविष्कार होता.

या महत्त्वाच्या घटनेचे औचित्य साधून १९८८ साली विधानसभेचा सुवर्ण महोत्सव तर सन २०१२ मध्ये अमृत महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. बाळासाहेब खेर यांनी भारतीयांना स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आणि राज्यघटना तयार करण्यासाठी घटना समिती स्थापन करण्याचा पहिला ऐतिहासिक ठराव २१ सप्टेंबर, १९३७ रोजी मांडला व तो एकमताने संमत करण्यात आला.

हेही वाचा: Maharashtra Winter Session : कायद्यानुसार आपल्याला अनुदानित शाळा देता येणार नाहीत - देवेंद्र फडणवीस

विधानसभेत मंजूर झालेले महत्वाचे ठराव 

विधानसभेत २१ सप्टेंबर, १९३७ रोजी घटना समितीचा ठराव मांडण्यात आला. तसेच २५ ऑक्टोबर, १९३९ रोजी भारतीय जनतेला विश्वासात न घेता ब्रिटीश सरकारने भारताला युद्ध राष्ट्र म्हणून घोषीत केले, याचा निषेध ठराव मांडण्यात आला. नोव्हेंबर, १९३९ मध्ये ब्रिटिश शासनाच्या या धोरणाच्या निषेधार्थ मंत्रीमंडळाने राजीनामा दिल्यामुळे जवळजवळ सहा वर्षे विधानसभा अस्तित्त्वात नव्हती. यामुळे १९३५ च्या कायद्यातील ६३ कलमाखाली राज्यपालांचे अधिराज्य येथे होते. दिनांक १७ ऑगस्ट, १९३७ रोजी अर्थ मंत्री, अण्णासाहेब लठ्ठे यांनी पहिला अर्थसंकल्प सादर केला.