esakal | Maharashtra Bandh : राजस्थानच्या घटनेवर गप्प, पण उत्तर प्रदेशातील प्रकरणासाठी महाराष्ट्र बंद - फडणवीस
sakal

बोलून बातमी शोधा

fadanvis

राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

राजस्थानच्या घटनेवर गप्प, पण उत्तर प्रदेशातील प्रकरणासाठी महाराष्ट्र बंद - फडणवीस

sakal_logo
By
टीम ई सकाळ

राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. लखीमपूर हिंसाचारात ४ शेतकऱ्यांसह ८ जणांचा मृत्यू झाला. या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या या महाराष्ट्र बंदला आमचा विरोध असल्याचं भाजपने म्हटलं आहे.

माध्यमांसमोर बोलणारे नेते, जमिनीवरचं काहीच माहिती नाही - फडणवीस

राजस्थानातील शेतकऱ्यांवर होणाऱ्या लाठी हल्ल्यावर हे गप्प बसलेत. पण उत्तर प्रदेशातील घटनेवर महाराष्ट्र बंद केला जात आहे. हा राज्य सरकार पुरस्कृत दहशतवाद असल्याचा घणाघात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. सरकारला थोडीशी जरी लाज असेल तर त्यांनी पूरग्रस्तांना मदत करावी. हे ढोंगी सरकार असून शेतकऱ्यांसोबत नाही असंही फडणवीस म्हणाले.

महाविकास आघाडीचे नेते फक्त माध्यमांसमोर बोलणारे आहेत. त्यांना वास्तव, जमिनीवरचं काही माहिती नाही. मराठवाड्यात एकही नेता गेला नाही असेही फडणवीस यांनी म्हटलं. तसंच बेस्टच्या बसेस फोडण्यात आल्या. महाराष्ट्र शासन आणि प्रशासनाने ठरवून हे केलं असल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच बंद करण्याला न्यायालयाकडून बंदी असतानाही असं केलं जात असून हा न्यायालयाचा अवमान आहे. यासाठी आधी शिवसेनेला दंडही झाला असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं.

आजचा बंद फसलेला, जो आहे तो भितीने - चंद्रकांत पाटील

केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाने हे कृत्य केल्याचा आरोप. त्याला अटक झालीय, चौकशी होईल आणि सत्य काय ते समोर येईल असं चंद्रकांत पाटील म्हणाले. घटना उत्तर प्रदेशात घडलीय आणि त्यासाठी महाराष्ट्र बंद करतायत. आज जो काही बंद केलाय तो फसलेला आहे. जो आहे तो भितीने आहे असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

राज्यपाल नसले तरी अधिकाऱ्यांकडे निवेदन देणार - काँग्रेस

राजभवनापासून १०० मीटर अंतरावर काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखण्यात आलं आहे. पोलिसांनी या परिसरात बॅरिकेड्स लावली आहेत. काँग्रेस नेते राजभवनाकडे गेले असून यामध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा समावेश आहे. राज्यपाल सध्या राजभवनावर नसले तरी तिथले अधिकारी निवेदन स्वीकारतील. नाना पटोले म्हणाले की, आम्ही शांततेनं आंदोलन करत आहे. आम्ही काँग्रेसी आहे आणि शांतताप्रिय आहे. आंदोलन नाही तर मूक आंदोलन आहे. आम्ही निवेदन देऊ. शेतकऱ्यांना चिरडण्याचं पाप भाजपने केलंय त्यांनी बंदला विरोध करण्याचा अधिकार नाही.

बंद राज्य पुरस्कृत नाही, पोलिस त्यांचे काम करतायत - भाई जगताप

राज्य पुरस्कृत आहे असं म्हटलं गेलं. पण आम्हालाच पोलिस अडवतायत. पोलिस त्यांचं काम करतायत. त्यामुळे आंदोलन हे काही राज्य पुरस्कृत नाही. तर लोकांनीच उत्स्फुर्तपणे बंदमध्ये सहभाग घेतला आहे असं भाई जगताप यांनी म्हटलं.

लखीमपूर प्रकरणी उत्तर प्रदेशात नाही पण महाराष्ट्रात बंद - चंद्रकांत पाटील

नवरात्रीच्या काळात तुम्ही एसटी, बेस्ट बंद केल्यात. भक्त आणि व्यापारी नाराज झालेत. बंदमुळे शेतकऱ्यांना समाधाना नाही पण नाराजी वाढली. येणाऱ्या निवडणुकीत याचे परिणाम दिसतील. बंदचा निषेध करतो असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

लढण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही, आमचाही आवाज दाबला जातो - प्रणिती शिंदे

महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचं काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितलं. तसंच पुढच्या भूमिकेबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, आम्ही लढत राहू, आमच्याकडे दुसरा काही पर्याय नाही. आम्ही विरोधी पक्ष आहे. आमचाही आवाज दाबला जातो. आम्ही लोकांसोबत आहे. निवडणूक हेच सर्वात मोठं यंत्र असतं. आता लोकांना कळून चुकलंय की, भाजप सरकार किती क्रूर आहे असंही त्या म्हणाल्या.

केंद्रीय मंत्र्यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

आशिष मिश्राला अटक केली पण त्यांना न्यायालयीन कोठडीत टाकून वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. ३०२ कलमाअंतर्गत कारवाई व्हावी आणि केंद्रीय मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी. या दुर्दैवी घटनेच्या विरोधात महाराष्ट्र बंद आहे. व्यापारीसुद्धा यामध्ये सहभागी झाले आहेत. मोदींचे सरकार केंद्रात आल्यानंतर जीएसटीच्या माध्यमातून लहान व्यापाऱ्यांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे. या बंदमध्ये सहभागी झालेल्या व्यापाऱ्यांचे धन्यवाद. राज्यात महाविकास आघाडीच्यावतीने बंद होत असून केंद्रातील भाजपला हा धडा आ

सध्याचं केंद्रातलं सरकार मुघलांचं - सुप्रिया सुळे

भारत सरकारनं शेतकऱ्यांना न्याय द्यायला हवा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्रास दिला जात असल्याबाबत विचारलं असता सुप्रिया सुळे यांनी आताचं केंद्रातलं सरकार मुघलांचं असल्याची टीकासुद्धा केली.

केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा - सुप्रिया सुळे

लखीमपूरमध्ये लोकांचा खून त्या मुलाने केला आहे त्याविरोधात आम्ही उभा राहिलो आहे. आजही तो व्हिडिओ पाहिला की तळपायाची आग मस्तकात जाते. क्रूर अशी ही घटना आहे. त्याला अटक करण्यासाठी वेळ लागला. त्याला शिक्षा व्हायला हवी. तसंच केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा.

'बंदसम्राटांचा इतिहास पुन्हा आठवा, गिरणी कामगारांना केलं उद्ध्वस्त'

भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर टीका करताना म्हटलं की, बंद आणि बंद..बंद करा हे बंद..! ज्यांनी मुंबईला बंद करुन आपले दुकान चालवले त्या तथाकथित"बंदसम्राटांचा" पुन्हा आज इतिहास आठवा... मुंबईतील गिरणी बंदला छुपा पाठींबा देऊन कामगारांना उध्वस्त केले. युनियनच्या नावाने कारखाने बंद करुन कष्टकरी,श्रमिकांना देशोधडीला लावले असे आरोप आशिष शेलार यांनी ट्विटरवरून केले आहेत.

महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला भाजपने विरोध केला आहे. दरम्यान, मुंबईथ बेस्ट बसेसची तोडफोड झाली आहे. त्यावरूनही भाजपने राज्य सरकारवर टीका केली आहे. भकास आघाडीच्या 'महाराष्ट्र बंद' दरम्यान आज आतापर्यंत धारावी, शिवाजी नगर, देवनार, मालवणी येथे ८ बेस्ट बसेसची तोडफोड करण्यात आली. बेस्टकडून पोलीस संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. राज्य सरकार पुरस्कृत बंद म्हणजे केवळ जबरदस्ती, गुंडगिरीचा मामला असल्याचं भाजपने म्हटलं आहे.

पुणे - महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदच्या समर्थनार्थ एपीएमसी मार्केट बंग ठेवण्यात आलं आहे. याबाबत शेतकऱ्यांना आधीच माहिती देण्यात आल्याचं मार्केट प्रशासनाने म्हटलं आहे.

व्यापाऱ्यांना दुकानं उघडायची असल्यास मनसे संरक्षण देणार

पोलीस प्रशासन बंदसाठी सरकारच्या कार्यकर्त्यांप्रमाणे काम करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. शेतकऱ्यांवर झालेला अन्याय निषेधार्ह, पण बंद पुकारून जनतेचं नुकसान होत असून गेल्या दीड वर्षात जनता पिचलीय . आता दीड वर्ष नंतर सर्व खुलं होत असताना हा बंद सरकारकडून पुकारणे निषेधार्ह असल्याचं मनसेच म्हणणं आहे.

औरंगाबाद - शहरात बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून बाजारपेठांमध्ये शुकशुकाट आहे.

हेही वाचा: Maharashtra Bandh : उद्योजक व व्यापाऱ्यांचा विरोध

बेस्टच्या ८ बसेसची तोडफोड

बेस्ट च्या ८ बस ची रात्री १२ नंतर तोडफोड झाल्याची माहिती समोर येत आहे. काही तुरळक बस फेऱ्या सुरू आहेत. पोलीस संरक्षण मिळाल्यास इतर फेऱ्या देखील सुरू केल्या जाणार असल्याच प्रशासनाच म्हणणं आहे. बेस्टच्या काही संघटनांनी या बंदला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे काही आगरामधून बस सुरु नाहीत.

महाराष्ट्र बंद - पुणे-बंगळूर हायवेवर शिवसैनिकांचा रास्तारोको

महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर आज कोल्हापुरात शिवसैनिक सकाळीच रस्त्यावर उतरले आहेत. येथील पुणे-बंगळूर महामार्गावर शिवसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. जवळपास दहा ते पंधरा मिनिटं शिवसैनिकांनी हा महामार्ग रोखला होता. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान पोलिसांनी आंदोलक शिवसैनिकांना ताब्यात घेतलं आहे. यानंतर महामार्गावरची वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

ठाणे - महाराष्ट्र बंदमुळे रिक्षासाठी प्रवाशांच्या रांगा लागल्या आहेत.

पुणे - दुकाने हॉटेल्स तसेच रिक्षा आणि पीएमपीची वाहतूक सोमवारी सकाळपासूनच बंद झाली त्यामुळे पुण्यात बंदला सकाळी पहिल्या टप्प्यात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले.

मुंबई - महाराष्ट्र बंदला मुंबईत प्रतिसाद मिळत असून रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे. वाहनांची वर्दळसुद्धा कमी आहे.

loading image
go to top