राज्यात पट्रोल-डिझेल महागणार; मुंबई, पुण्यात घरखरेदी स्वस्त 

टीम ई-सकाळ
Friday, 6 March 2020

राज्य सराकारच्या या निर्णयामुळं पेट्रोल-डिझेल प्रतिलिटर एक रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.

मुंबई : राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या महाआघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज, राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. या पहिल्या अर्थसंकल्पात राज्यातील जनतेला सुखावणारे काही निर्णय जाहीर करण्यात आले तर, काही निर्णयांवरून नाराजीही व्यक्त होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पातील घोषणेनुसार आता राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक रुपयाने वाढ होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार म्हणाले, 'जगभरात ग्लोबल वॉर्मिंगचे संकट गहीरं आहे. त्यासाठी झाडं लावण्याची गरज आहे. राज्यात अवकाळी पावसाचं संकट सातत्यानं डोकं वर काढत आहे. त्यामुळं सरकारनं पावलं उचलण्याचा निर्णय घेतलाय. राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवर अतिरिक्त कर लावून त्यातून निधी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यातून उभा राहणारा निधी फक्त आणि फक्त पर्यावरणाच्या कामासाठीच वापरला जाणार आहे.' राज्य सराकारच्या या निर्णयामुळं पेट्रोल-डिझेल प्रतिलिटर एक रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. बांधकाम व्यवसायाला सध्या मंदीचा फटका बसत आहे. विशेषतः मुंबई आणि पुण्यात मोठ्या प्रमाणावर तयार घरे पडून आहेत. त्यामुळं बांधकाम व्यवसायाला बुस्टर मिळावा, यासाठी स्टॅम्प ड्युटी अर्थात मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत देण्यात आली आहे, अर्थसंकल्पात अजित पवार यांनी ही घोषणा केलीय. त्यामुळं मुंबई, पुण्यात घर खरेदी करणाऱ्यांचे पैसे वाचणार आहेत.

आणखी वाचा - सत्ता महाविकास आघाडीची पालकमंत्री भाजपचाच, वाचा हा घोळ

सामान्य माणूस तरुण-तरुणी कामगार वर्ग या सगळ्यांचा विचार करून हा अर्थसंकल्प तयार केला आहे. दळणवळणाच्या सुविधा वाढवण्यावर आमचा भर आहे. लोकांना घरं घेणं स्वस्त व्हावं, यासाठी सरकारनं काही निर्णय घेतले आहेत. कोरोनाचं संकट असलं तरी जनतेनं घाबरून जाऊ नये. यापूर्वीही अशी संकटं आली आहेत. त्याचा सामना करू.
- अजित पवार, अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra budget 2020 ajit pawar decision petrol diesel hike global warming fund