एसटीवरील जाहिरातीवरुन अजितदादांनी भर सभागृहात मंत्र्यांना झापलं! : Maharashtra Budget Session 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

Maharashtra Budget Session 2023: एसटीवरील जाहिरातीवरुन अजितदादांनी भर सभागृहात मंत्र्यांना झापलं!

मुंबई : शासकीय जाहिरातींवरुन विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सरकारला अधिवेशनात चांगलचं धारेवर धरलं. एसटीवरील जाहिरातीवरुन अजितदादांनी भर सभागृहात मंत्र्यांना झापलं. त्यांनी थेट जाहिराताची फोटोचं सभागृहात दाखवत शासकीय जाहिरातींवर खर्च करता तर तो कसा करावा? याची माहितीही दिली.

पवार म्हणाले, "पन्नास कोटींच्या शासकीय जाहिरातील सरकारनं सहा महिन्यात दिल्या. १७ कोटींहून अधिक रक्कम महापालिकेच्या जाहिरातीसाठी खर्च केली गेली. यामध्ये एसटीवर लावलेली जाहिरात बघा. या जाहिरातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे. 'वर्तमान सरकार भविष्यात आकार, योजना दमदार जनतेचं हे सरकार' असा मजकूर यामध्ये आहे. ही जाहिरात एकदम दळभद्री बसवर लावली आहे. या बसच्या काचा फुटलेल्या आहेत, असं सांगताना कशाला असले धंदे करता! अशा शब्दांत अजित पवार यांनी सरकारवर तोंडसुख घेतलं"

सरकारची असली जाहिरातबाजी करतात का? जाहिरातबाजीसाठी असली दळभद्री बस वापरली किमान डोकी तरी चालवा. चांगल्या नव्या कोऱ्या बसवर ही जाहिरात लावायची. या फोटोमध्ये एकनाथ शिंदे हसत आहेत ते ही बस पाहून हासत आहेत का? बघा कशी बस आम्ही लोकांना दिली, असा अर्थ यातून निघतो, असंही अजितदादा यावेळी म्हणाले.

हे ही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

आणखी एका जाहीरातीवर बोलताना अजितदादा म्हणाले, 'मी होणार लखपती' ही आणखी एक जाहिरात. आता लखपती ज्यांना करायचं आहे, ते राहिले बाजूला आणि यामध्ये उपमुख्यमंत्रीच मोठेच्या मोठे दिसत आहेत. बाकी कोणी दिसतंच नाही. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छोटे दिसतात, पंतप्रधान मोदीही छोटे दिसतात पण उपमुख्यमंत्री फडणवीस हे पाचपट मोठे दिसतात. जाहिरातबाजी करताना किमान ती नजरेखालून तरी घालत जा, अशा शब्दांत अजित पवारांना टोला लगावला.