Maharashtra Budget Session : भाजप आक्रमक, विधानसभेचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Budget Session Live News | Maharashtra Assembly Session News

Maharashtra Budget Session : भाजप आक्रमक, विधानसभेचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब

मुंबई : सध्या राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा पहिला दिवस अत्यंत वादळी ठरला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अभिभाषण न करताच सभागृहातून काढता पाय घेतला होता. त्यामुळे त्यांच्यावर टीका देखील झाली. अधिवेशनाचा दुसरा दिवस देखील वादळी ठरला आहे. आज ओबीसी आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये शाब्दीक चकमक झाली.

आज अधिवेशनात घडलेल्या घडामोडी -

भाजप आमदार आक्रमक, विधानसभेचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब

विधानसभेत भाजप आमदारांची घोषणाबाजी. विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपनं आंदोलन केलं असून विधानसभेचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे.

ओबीसी आरक्षणाबाबत बील सोमवारी विधानसभेत सादर करणार - अजित पवार

डेटा गोळा करण्यासाठी काही नियम असतात. कोणीही डेटा गोळा करू शकत नाही. आम्ही सर्व प्रयत्न केलेत. पण, सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल द्यायचा तो दिला. आज पुन्हा आम्ही मंत्रिमंडळाची बैठक घेत आहोत. मध्य प्रदेश सरकारकडून माहिती मागवली आहे. त्यानुसार एक बिल आणण्याबाबत चर्चा केली जाईल. हे बील सोमवारी सभागृहात मांडणार आहोत. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाला कळवलं नाही. आमच्यावर कोणाचा दबाव नाही. आम्ही कोणाच्या दबावाला भीक घालत नाही, असा टोला अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.

परबांनी अहवाल पटलावर मांडला -

परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी विलनीकरणाचा अहवाल पटलावर मांडला. पण, ओबीसी आरक्षणावरून विधानसभेत विरोधकांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे.

छगन भुजबळ बोलवते धनी, त्यांच्यावर मोठ्या नेत्यांचा दबावा - फडणवीस

ओबीसींना आरक्षण मिळू नये, अशी या सरकारमधील काही नेत्यांची भूमिका आहे. त्यांना ओबीसी आरक्षणासोबत देणं-घेणं नाही. छगन भुजबळ फक्त बोलवते धनी आहेत. त्यांच्यावर दुसऱ्यांचा दबाव आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक ओबीसी आरक्षण मिळत नाही. २ वर्षात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नाहीतर या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार आहे का? निवडणूक ठरवण्याचा अधिकारी सरकारने आपल्याकडे घ्यावा आणि दोन महिन्यात डेटा तयार करावा. त्यानंतर निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी केली.

ओबीसी आरक्षणावरून वातावरण तापलं, २० मिनिटासाठी सभागृह तहकूब

ओबीसी आरक्षणाविरोधात वातावरण तापलं असून सभागृहात भाजप आमदारांची घोषणाबाजी केली. ठाकरे सरकार हाय हाय अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर सभागृह २० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं.

पाच वर्ष तुम्ही काय केलं? भुजबळांचा फडणवीसांना सवाल -

न्यायालयात खटला सुरू असताना तुम्ही मुख्यमंत्री होते. तुम्ही काहीही केलं नाही. आम्हाला १५ दिवसांत करायला सांगताय. तुम्ही फक्त राजकारण करत आहात. युपीए सरकारने तयार केलेला इम्पिरिकल डेटा तुम्ही दिला नाही. पाच वर्ष तुम्ही ओबीसी आरक्षणासाठी काहीही केलं नाही, असे सवाल छगन भुजबळ यांनी फडणवीसांना विचारले.

मंत्री म्हणून तुम्हाला समर्थन आहे का? - फडणवीस

२०१० साली सरकार कोणाचं होतं? तेव्हा तुम्ही का केलं नाही. तुम्ही बोलायला इतके हुशार आहात की, सोबत आहोत म्हणता म्हणता आम्हाला टोमणे मारले. मंत्री म्हणून तुम्हाला समर्थन आहे का? असं फडणवीस म्हणाले.

फडणवीसजी आपण एकत्र बसून काम करूया - छगन भुजबळ

ओबीसीच्या पाठिमागे आपण उभे आहात ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. त्यामुळेच ओबीसींना वाचवा अशी टोपी मी घातली आहे. आमच्याकडे जे काही उपलब्ध होतं ते आम्ही १५ दिवसांत दिल्या. तुम्ही ७ वर्षांत ओबीसी आरक्षण का वाचवलं नाही? विकास गवळी कोणामुळं उभे राहतात? असं म्हणत छगन भुजबळ आक्रमक झाले. एकमेकांची उणी-धुणी काढण्यापेक्षा आपण चर्चा करू. चिखलपेक्षा काढण्यापेक्षा आपण चर्चा करू. फडणवीसजी आपण एकत्र बसून काम करूया, असं छगन भुजबळ म्हणाले.

ओबीसी आरक्षणावरून फडणवीस आक्रमक, सभागृहात चर्चा करण्याची मागणी -

ओबीसी आरक्षणाविरोधात भाजप आक्रमक झाली असून भाजप आमदार ओबीसी बचाव टोपी घालून सभागृहात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयानं राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल नाकारला. त्यावरून देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. अहवाल अभ्यासपूर्ण नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आपण टोपी घातली. पण, हे सरकार आपल्याला टोप्या घालतील, हे विसरू नका, असं फडणवीस म्हणाले. एकही निवडणूक ओबीसी आरक्षणाविना होता कामा नये. आमच्या समाधानासाठी मंत्रिमंडळाचे ठराव घेऊ नका. त्याची अंमलबजावणी करण्याची हिम्मत दाखवा. आता महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या, तर ओबीसींना आरक्षण मिळणार नाही. त्यासाठी कायदा करायचा असेल तर कायदा करा. ओबीसी आरक्षणावर सभागृहात चर्चा झालीच पाहिजे.

नरहरी झिरवळ यांचं मलिकांच्या राजीनाम्याला समर्थन? -

मलिकांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत भाजपने स्वाक्षरी मोहीम राबवली. यावर विधानसभेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवळ यांनी सही केल्याचं कळतंय.

सभागृहाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी -

आज सकाळी विरोधकांनी मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. तसेच मलिकांच्या राजीनाम्याचा एक बोर्ड लावून त्यावर सह्या घेण्यात आल्या. त्यामुळे सभागृहात देखील हा विषय तापण्याची शक्यता आहे.

सभागृहाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी

सभागृहाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी

Web Title: Maharashtra Budget Session Live Updates Devendra Fadnavis Uddhav Thackeray Ajit Pawar Nana Patole Bjp Mahavikas Aghadi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top