राज्यातील नेत्यांनी 'ही' भीती घातल्यामुळे सोनिया गांधी पाठिंब्यास झाल्या तयार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 November 2019

सत्तेत गेलो नाही, तर महाराष्ट्रात काँग्रेस बेचिराख होईल, अशी भीती पक्षाच्या राज्यातील नेत्यांनी हायकमांड सोनिया गांधी यांच्यासमोर व्यक्त केली होती. त्यानंतरच सोनियांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीला पाठिंबा देण्यास तयार झाल्याचं वृत्त आहे.

नवी दिल्ली : सध्या महाराष्ट्रातील राजकीय स्थिती अस्थिर झाली आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना एकत्रित येऊन सरकार बनवू पाहत आहेत. सत्ता स्थापन करायला शिवसेनेला पाठिंबा द्यायला काँग्रेसच्या देशपातळीवरील नेत्यांचा सुरवातीला विरोध होता, हा विरोध राज्यातील नेत्यांच्या भमिकेमुळे वरिष्ठ नेत्यांना बदलावा लागला.  

सत्तेत गेलो नाही, तर महाराष्ट्रात काँग्रेस बेचिराख होईल, अशी भीती पक्षाच्या राज्यातील नेत्यांनी हायकमांड सोनिया गांधी यांच्यासमोर व्यक्त केली होती. त्यानंतरच सोनियांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीला पाठिंबा देण्यास मान हलवल्याचं वृत्त आहे.

भाजपला सत्तेपासून दूर राखण्यासाठी काँग्रेस आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा देत सरकार स्थापन करण्याचा सूर आळवला होता. मात्र परस्परविरोधी विचारधारेच्या पक्षाशी हातमिळवणी करणं इतर राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये अंगलट येईल आणि इभ्रत धुळीला मिळेल, अशी भीती गांधी कुटुंबाला सतावत होती.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे या तिघा माजी मुख्यमंत्र्यांनी सोनिया गांधींची समजूत काढली. सत्तेत सहभागी होण्याची संधी गमावली, तर महाराष्ट्रातून काँग्रेसचं नामोनिशाण नष्ट होईल, ही भीती त्यांनी बोलून दाखवली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या कार्यकारिणीतील नेते एके अँटनी, मुकुल वासनिक, माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांनी शिवसेनेसोबत आघाडी करण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. ठाकरे कुटुंबाचा हिंदुत्वावादाचा मुद्दा काँग्रेसच्या विचारधारेशी मिळताजुळता नसल्याचं त्यांनी सांगितलं. कर्नाटकमध्ये जेडीएससोबत हातमिळवणी केल्यानंतर आलेल्या अपयशाकडे के सी वेणुगोपाल यांनी लक्ष वेधलं. त्यामुळे सोनिया गांधी शिवसेनेला पाठिंबा देण्यास राजी नव्हत्या. महाराष्ट्रातून निवडून आलेल्या 44 आमदारांना राजस्थानात सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. मात्र हा मुक्काम संपवून सर्वजण आता जयपूरहून मुंबईला येणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra congress to sonia gandhi form government else party will be finished in state