Maharashtra Din 2022 : युवकांना आस नवमहाराष्ट्राची..!

आजचा युवक नव्या युगाला कवेत घेणारा ‘नवमहाराष्ट्र’ पाहतोय.
maharashtra din 2022 Hope for New maharashtra to the youth
maharashtra din 2022 Hope for New maharashtra to the youthsakal
Summary

परिवर्तनाची चळवळ आणि सामाजिक सुधारणा हे बलस्थान असलेला महाराष्ट्र आता अधिक समृद्ध होत आहे. हिमालयाच्या मदतीला धावलेल्या महाराष्ट्राने देशासाठी दिशादर्शकाची भूमिका बजावलेली आहे. शेती, समाजकारण, शिक्षण, उद्योग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या युवकांना महाराष्ट्र खुणावतोय. तो महाराष्ट्राच्या विकासाला प्राधान्य देतो, उद्योगधंद्यात वाढीसाठी, महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी, तसेच राज्याचे नाव उंच शिखरावर नेण्यासाठी नवनवीन प्रयोग करतो आहे. आजचा युवक नव्या युगाला कवेत घेणारा ‘नवमहाराष्ट्र’ पाहतोय. असेच काम करणाऱ्या काही युवकांची ही ओळख...

शिक्षणाबरोबरच कौशल्य वाढवा...

हर्षल विभांडिक या शिक्षण आणि कौशल्याधारित क्षेत्रात काम करणाऱ्या युवकाने राज्याच्या कानाकोपऱ्यात शिक्षण पोचले परंतु ज्ञान पोचतेय का, हे पाहावे लागेल असे मत मांडले. राज्याच्या निर्मितीनंतर शिक्षणाचे जाळे राज्यात सर्वदूर पसरले. असे एकही गाव नाही जिथे शाळा नाही, असे निरीक्षणही हर्षल नोंदवतात. न्यूयॉर्कमध्ये ११ वर्षे काम केल्यानंतर त्यांनी धुळ्यात स्टार्टअप सुरू केले होते व सध्या उद्योग प्रबोधिनीमार्फत युवकांना स्टार्टअप सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करतात. स्वयंरोजगारासाठी केंद्र शासनाच्या अनेक योजना आहेत, त्याची माहिती युवकांपर्यंत पोचली पाहिजे, ही हर्षल यांची अपेक्षा. रोजगारासाठी पुणे, मुंबईसारख्या शहरात जायची आता आवश्यकता नाही, असे सांगत विद्यार्थ्यांनी आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आपल्याकडे किती गुण मिळाले यावर गुणवत्ता ठरवली जाते. अशा परिस्थितीत आपण ज्ञान ग्रहण करायचे विसरूनच जातो. शिक्षण घेत असताना कौशल्येही विकसित झाली पाहिजेत, हे आपल्या ध्यानीही नसते. परदेशात पदवी घेत असतानाच तुमच्यामध्ये कौशल्याधारित शिक्षणाची पायाभरणी केली जाते. आता काळाची ही आवश्यकता आहे. राज्यात सद्यःस्थितीत शैक्षणिक संस्थांचे जाळे चांगले पसरले आहे, त्याला कौशल्याची जोड दिली पाहिजे. केंद्र शासनाने नवीन शैक्षणिक धोरण आखले आहे, त्याचे परिणाम कालांतराने दिसतील. मात्र, प्रगत महाराष्ट्राने आता यावर शिक्षणाबरोबरच कौशल्यांवर काम केले पाहिजे. राज्यातील बहुतांश शहरांचे शहरीकरण वेगाने होत आहे, त्यामध्ये विकेंद्रीकरणाचे धोरण अवलंबले पाहिजे. ‘एमआयडीसी’च्या माध्यमातून नवनवीन योजनांची युवकांना माहिती दिली पाहिजे. आता यंत्रणा कार्यरत आहे, मात्र तिला अधिक वेग दिला पाहिजे. धुळ्यासारख्या ठिकाणी झालेले उत्पादन सौदी अरेबियात जाऊ शकते, हे आम्ही दाखवून दिले आहे. त्याचा विचार व्हावा. युवकांच्या भाषेत सांगायचे तर क्वॉलिटी ऑफ लाइफ आपल्या गावातही मिळत आहे, ते शोधले पाहिजे. भविष्यातील महाराष्ट्राला कौशल्याची जोड देणे गरजेचे आहे, असे हर्षल सांगतात.

उद्योजकांचे विकेंद्रीकरण हवे

महाराष्ट्राला सामाजिक, आध्यात्मिक, संतांची परंपरा आहे, तशी कारखानदारीची आहे, असे कोल्हापूर येथील लघुउद्योजक भूषण कांबळे सांगतात. कोल्हापुरी चपलांना लघु उद्योगातून त्यांनी वेगळी ओळख मिळवून दिली आहे. ‘मेक इन इंडिया’च्या मदतीने आता काही प्रमाणात उद्योगात सुटसुटीतपणा आला आहे. अर्थात, कोणत्याही सरकारी धोरणात असतो, तसा किचकटपणा यामध्येही दिसत असल्याची भूषण यांना खंत आहे. योजनांबद्दल तरुणांमध्ये फारशी माहिती नाही आणि सरकारही त्याबाबत जागरूकता आणण्यात कमी पडत आहे, सांगत ही प्रक्रिया सोपी, सुटसुटीत करण्याची अपेक्षाही ते व्यक्त करतात. सरकारी भाषा आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रे यांची पूर्तता करताना युवकांची दमछाक होते. नाइलाजास्तव एजंटकडे जावे लागते. महाराष्ट्रातील तरुणांमध्ये प्रचंड टॅलेंट आहे, त्याचा शोध घेतला पाहिजे. उद्योग व्यवसायासाठी त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यासाठी पूरक असलेल्या गोष्टी म्हणजे निधी, जमीन, ह्यूमन रिसोर्स याची उपलब्धता करून दिली पाहिजे. उद्योग-व्यवसायात रस असलेली सध्याची युवा पिढी आहे. त्यांच्यासाठी कॉमन प्लॅटफॉर्म तयार करावा, अशी भूषण यांची अपेक्षा आहे. तरुणांमध्ये क्षमता खूप आहेत त्याला संधी मिळाली पाहिजे. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मी प्रचंड आशावादी आहे. राज्याची व्यवस्था उद्योगाला पूरक आहे. यंत्रणा सक्षम आहेत, त्यांना अधिक गती दिली पाहिजे. आजचा तरुण कामानिमित्ताने बाहेर पडायचा असल्यास पुणे-मुंबईसारख्या मोठ्या शहरांचा विचार करतो. त्यांव्यतिरिक्त राज्यात अन्य शहरांतून उद्योगपूरक वातावरण निर्माण केल्यास येत्या २५ वर्षांत राज्याचा सर्वांगिण विकास होईल. त्यासाठी निमशहरी भागातील टॅलेंटचा शोध घेण्याची अपेक्षा भूषण यांना आहे.

शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी व्हावी

महाराष्ट्र प्रगतशील म्हणून ओळखला जातो. आपल्या राज्यात या क्षेत्रात आजही सर्वांना शिक्षणाची समान संधी उपलब्ध नाही, असे मत गेल्या वीस वर्षांपासून समुपदेशन करणाऱ्या मेघा नगरे यांनी नोंदविले. अनेक शाळांतून सर्रास मोठ्या प्रमाणावर डोनेशन घेतले जाते. त्यामुळे शिक्षणाची खरी गरज असलेला गट मागे पडताना दिसत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळते का, हा संशोधनाचा विषय असल्याचे त्यांचे निरीक्षण आहे. त्या म्हणतात, ‘‘आज अपेक्षित शिक्षण मिळत नाही. विद्यार्थ्यांना घडविणारे शिक्षकच ताकदीचे नसतील तर पुढची पिढी कशी घडणार. सर्व गोष्टी बाजूला ठेवून शैक्षणिक क्षेत्राकडे सकारात्मक नजरेने पाहावे. महाराष्ट्र हा सुधारणावादी आहे, त्याला अधिक सकसतेने गती दिली पाहिजे. फिनलंडमध्ये कोणतीही खासगी शाळा नाही. तिथे सर्व शाळा सरकारी आहेत, त्या प्रमाणे सर्वांना शिक्षणाचे समान धोरण राबविले पाहिजे. शहरी आणि ग्रामीण भाग असा फरकच नको. शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा होत नाही, तोपर्यंत समाजातील अन्य क्षेत्रातही त्या होणार नाहीत. शिक्षणापासून कोणताही घटक वंचित राहायला नको. गुणांपेक्षा ज्ञानाला महत्त्व दिले पाहिजे. शिक्षण हक्क कायद्याची कसोशीने अंमलबजावणी केली पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये योग्य दृष्टिकोन विकसित केला पाहिजे.’’

शेतकऱ्यांची फसवणूक टाळावी

मागील दोन दशकात आपल्या राज्यातील शेतकऱ्यांनी अहोरात्र मेहनत करून शेतमालाचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवली असल्याचे ग्रामहितचे संस्थापक पंकज महल्ले ठामपणे सांगतात. वैविध्यपूर्ण पिकांसाठी महाराष्ट्र देशात प्रसिद्ध आहे, मात्र, वाढत्या उत्पादकतेच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या निव्वळ उत्पन्नात वाढ होणे अपेक्षित होते, मात्र घडते आहे उलट. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्यांना अधिक गुंतागुंतीच्या समस्यांना सामोरे जावे लागते असल्याची अडचण पंकज यांनी मांडली आहे. ते म्हणतात, उत्पादन खर्च आणि आर्थिक वृद्धी दरवाढीचे आधारावर शेतमालाची आधारभूत किंमत निश्चित केली जावी. शेतमालाला आधारभूत किंमत मिळण्यासाठीचा कायदा व्हावा. शेतमालाच्या अनौपचारिक खरेदी-विक्री व्यवहारात नेहमीच शेतकऱ्यांची फसवणूक होत असते. ती टळण्यासाठी शेतीमाल बाजार व्यवस्था अधिक सक्षम व्हावी. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शास्त्रीय पद्धतीने शेतमालाचे भाव निश्चित करण्यासाठीची व्यवस्था उभी व्हावी व त्याविषयीचे कायदे सर्व स्तरावर राबवणे अपेक्षित आहे. शेतमाल काढणीनंतर शेतमाल साठवणूक सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना उत्पादन निघाल्या बरोबर मिळेल त्या किमतीत तो विकावा लागतो. त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होता. त्यामुळे ‘गाव तिथे गोदाम’ ही योजना राबवून शेतकऱ्यांना गाव पातळीवरच शेतमाल साठवणुकीची व त्यावर सहजपणे तारण कर्ज मिळवण्यासाठीची व्यवस्था निर्माण करण्यात यावी. थेट उत्पादक ते ग्राहक ही संकल्पना राबविण्यात अनेक अडचणी व मर्यादा असल्या, तरी व्यवस्थित साखळी निर्माण केल्यास या योजनेतून सुद्धा आपण शेतकऱ्यांना दिलासा मिळवून देऊ शकतो, असा उपायही पंकज यांनी सुचविला. शेतमालाचे मूल्य वर्धनाबाबत बोलले खूप जाते, मात्र त्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या पदरी प्रत्यक्षात काही पडेल अशा प्रकारचे काम होण्याची गरज आहे. शेती निविष्ठामध्ये होणारी शेतकऱ्यांची फसवणूक कशी टाळता येईल, या दृष्टीने शेवटच्या स्तरापावेतो प्रयत्न व्हावेत.

शाश्वत पर्यायांतून शेतीचा विकास

महाराष्ट्राच्या जडणघडणीकडे तरुणाईच्या नजरेतून पाहताना समाजकारण, अर्थकारण आणि राजकारण याची प्रगल्भता सामाजिक व शेती क्षेत्रात कार्यरत उस्मानाबाद येथील विनायक हेगाणा यांना जाणवली. राज्याची स्थापना झाल्यानंतर राज्याच्या नेतृत्वाकडे दूरदृष्टी होती, हे सांगताना शेतीच्या प्रश्नांवर तांत्रिक सुधारणा झाल्या; मात्र शाश्‍वत पद्धतीने पुढे जाऊ शकलो नसल्याची विनायक यांना उणीव जाणवली. शेतीचे प्रश्न बिकट झाले आहेत, असे सांगताना त्याची कारणमिमांसाही ते स्पष्ट करतात. समाजकारण, अर्थकारण आणि राजकारण हातात घेऊन जाणारी पिढी होती, तिला विकासाची दृष्टी होती. राज्यातील ही दृष्टी देशाला दिशादर्शक होती, आता नेमकी ही फळी कमी पडत आहे. तसा विचार करणारी फळीच तयार झाली नसल्याची विनायक यांना खंत आहे. देशाची आर्थिक राजधानी आपल्या राज्यात आहे, याचा निश्चितच राज्याच्या प्रगतीच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. तरुणांचा राजकारणातील वावर वाढला. परंतु एक प्रकारची पोकळी निश्चितच आहे. राज्याचा पुढील २५ वर्षांत विकासाचा चेहरा स्पष्ट करायचा असल्यास एका विशिष्ट भागाची प्रगती होऊन चालणार नाही. पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ, खानदेश, कोकण, मराठवाडा या सर्व प्रदेशांना समतोल पद्धतीने विकास झाला पाहिजे. सर्व क्षेत्रात पुढाकार घेणारी लीडरशीप तयार झाली पाहिजे. शेतीसाठीचे मूलभूत प्रश्न शाश्‍वत पर्यायातून सुटले पाहिजेत. सध्या विदर्भ, मराठवाडा हे विभाग विकसित दिसत नाहीत. उस्मानाबादचाच विचार केल्यास राज्यात प्रथम क्रमांकाचा आणि देशभरातील तिसऱ्या क्रमांकाचा अविकसित जिल्हा आहे. ही बाब भूषणावह नाही. तरुण आणि शेतकऱ्याचे प्रतिनिधित्व प्रत्येक क्षेत्रात दिसले पाहिजे. शेतकऱ्याचा मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहील अशी कार्यक्षम यंत्रणा निर्माण झाली पाहिजे.

यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातील नवमहाराष्ट्र

महाराष्ट्र म्हणजे फुले, शाहू,आंबेडकर यांच्या विचारांचे राज्य, तसेच उद्योगधंद्यांमध्ये प्रगतशील राज्य. या प्रगतशील राज्यामध्ये युवकांचा नेहमीच मोठा वाटा असलेला आहे, असा मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या युवा विभागाचे प्रमुख संतोष चतुरा बाबूराव मेकाले यांचा विश्वास आहे. महाराष्ट्राबरोबर महाराष्ट्राबाहेरील युवकही आपल्या राज्याकडे आकर्षिले गेले, असे सांगत ते म्हणतात, ज्या अपेक्षा घेऊन युवक आले, त्या क्षेत्रात त्यांना अधिक चांगले काम करण्याची संधी महाराष्ट्रात मिळाली. मग ते कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान-तंत्रज्ञान, शेती किंवा इतर कोणतेही क्षेत्र असो. मी महाराष्ट्र दिनानिमित्त हे राष्ट्र युवकांना अजून सृजनशीलपणे कसे घडवेल, हे एक युवा म्हणून मी पाहतो, तेव्हा राज्यासमोर अनेक प्रश्न उभे राहत असल्याचे दिसते. त्यामध्ये शिक्षणातील वाढत जाणारे शुल्क, त्यानंतरची रोजगारासाठी होणारी चढाओढ, सुशिक्षितांची बेरोजगारी ही काही प्रमुख प्रश्ने आजच्या युवकांसमोर उभी आहेत. संपूर्ण प्रश्नांमधून अजून एक प्रमुख म्हणजे जाती, धर्म, भाषा यांमध्ये आजचा युवक भरकटला जातोय. त्यांच्या विचारांवर सर्व सामाजिक माध्यमांचा अधिकाधिक प्रभाव दिसून येतो. युवकांचे स्वमत बनवण्यासाठी आजचे फेक मीडिया, फेक न्यूज आणि नवनवीन येणारी सामाजिक डिजिटल माध्यमे खूप मोठा प्रभाव पाडत आहेत. बेरोजगार युवक समाज माध्यमांवर अहोरात्र आपल्याला दिसून येतात. आपण इतिहास पाहिल्यास महाराष्ट्रातील युवकांचे रक्त नेहमी सळसळते राहिले आहे, मग ते शिक्षणाद्वारे आपल्या हक्कांसाठी, आपल्या नोकरीसाठी व त्या संबंधित प्रश्नांसाठी असो. भविष्यातील महाराष्ट्र देखील असाच पाहिजे ज्यामध्ये युवक स्वतःच्या प्रश्नासाठी आजही जागा आहे. जो युवा महाराष्ट्राच्या विकासाला प्राधान्य देतो, उद्योगधंद्यात वाढीसाठी, महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी तसेच राज्याचे नाव उंच शिखरावर नेण्यासाठी नवनवीन प्रयोग करतोय असा यशवंतराव चव्हाण यांनी सांगितलेला नवमहाराष्ट्र मी पाहतोय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com