महाराष्ट्राचा वाळवंट होऊ देणार नाही अशी प्रतिज्ञा करणारे मुख्यमंत्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sudhakarrao Naik

महाराष्ट्राचा वाळवंट होऊ देणार नाही अशी प्रतिज्ञा करणारे मुख्यमंत्री

सुधाकरराव नाईक. महाराष्ट्राचे अल्पकाळासाठी राहिलेले मुख्यमंत्री. त्यांचा आज स्मृतीदिन. महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईकांचे ते पुतणे. फक्त दीड पावणेदोन वर्ष मुख्यमंत्री पदावर राहिले पण तेवढ्याच काळात आपल्या कामाच्या जोरावर ते लोकांच्या मनात राहिले. अल्पकाळ मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलेले पण दूरदृष्टी ठेऊन शेतकऱ्यांसाठी आणि महाराष्ट्राचा वाळवंट होऊ देणार नाही ही इच्छाशक्ती घेऊन काम करणारे मुख्यमंत्री म्हणजे सुधाकरराव नाईक.

साल होतं १९९१. जूनमध्ये राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची त्यांनी शपथ घेतली. वसंतराव नाईक यांच्यासारखे चुलते त्यांना राजकारणात लाभले होते. वडील लोकनेते बाबासाहेब नाईक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या तालमीत तयार झालेले हे मल्ल. घरात राजकारणाचा आणि पुढारपणाचा वारसा लाभला असला तरी महाराष्ट्राच्या पाण्याच्या आणि शेतीच्या प्रश्नावर त्यांनी मुख्यमंत्री झाल्यावर कामाला सुरूवात केली. महाराष्ट्रात आणि भारतात शेतीमध्ये क्रांती होणं त्यावेळी जास्त गरजेचं होतं त्या दृष्टीने काम सुरू होतं पण फक्त पिकांच्या उत्पादनात क्रांती होऊन फायदा नव्हता, बागायतीसोबतंच जिरायती जमिनीसुद्धा पाण्याखाली यायला पाहिजेत हे त्यांनी ओळखलं होतं.

Sudhakarrao Naik

Sudhakarrao Naik

मग सुरू झाला जलक्रांतीचा प्रवास. जलसंधारण ही लोक चळवळ व्हावी, असा त्यांनी ध्यास घेतला होता. जलसंधारण चळवळीसाठी त्यांनी महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यांमध्ये दौरे केले. वसंतराव नाईक यांनी आपल्या काळात 'पाणी अडवा पाणी जिरवा' अशा योजना सुरू केल्या होत्या त्या योजनांना सुधाकररावांनी चालना दिली पण त्यांना अवघं दीड पावणेदोनवर्षे मुख्यमंत्रीपद मिळालं. त्यांनी त्याच वेळात राज्यात प्रथमच जलसंधारण खात्याची निर्मिती केली. पण त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यावर नंतरच्या राजकारण्यांनी या खात्याकडे दुर्लक्ष केलं त्याची खंत आजही जनमाणसांच्या मनात आहे. सुधाकरराव पुढे हिमाचलप्रदेशचे राज्यपाल झाले पण त्यांनी महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान आपण विसरू शकत नाही.

त्यांनी जलसंधारण चळवळीसाठी स्वत:ला एवढे झोकून दिले की, कोकणातील दौऱ्यात तब्येतीकडे दुर्लक्ष झाले. दुर्दैवाने त्यांची प्रकृती सावरू शकली नाही आणि १० मे २००१ रोजी त्यांचे प्राणपाखरू उडून गेले. कदाचित सुधाकररावांना अधिक वेळ मिळाला असता तर राज्यातील जलसंधारणाचे चित्र अधिक फलदायी ठरले असते. दुष्काळी स्थितीत महाराष्ट्र आज पाणीटंचाईने होरपळून निघत आहे. अशावेळी सुधाकररावांच्या जलसंधारण कार्याची आठवण तीव्रतेने होते. महाराष्ट्राचे भविष्यात वाळवंट होऊ नये, ही अपेक्षा बाळगताना जलसंधारणाच्या कार्यात प्रत्येकाने सहभागी झाले पाहिजे. सुधाकरराव यांना सकाळ माध्यमाकडून त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

Web Title: Maharashtra Former Cm Sudhakrrao Naik Memorial Day

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top