esakal | Maharashtra: शेळीचे क्लस्टर... दुधापासून मांसापर्यंत
sakal

बोलून बातमी शोधा

अमरावती : शेळीचे क्लस्टर... दुधापासून मांसापर्यंत

अमरावती : शेळीचे क्लस्टर... दुधापासून मांसापर्यंत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शेळी पालन प्रशिक्षणापासून शेळीचे दुध, मांसाच्या विक्रीपर्यंत अनेक पदार्थ एकाच छताखाली तयार केली जाणारी ‘शेळी क्लस्टर’ ही योजना अमरावतीमधील पोहरा येथे आकाराला येते आहे. ५० एकर जागेवर उभे राहणारे अशा प्रकारचे हे पहिलेच क्लस्टर असेल.

पशु व दुग्धविकास विकास मंत्री सुनील केदार या क्लस्टरविषयी म्हणाले, की शेळीच्या दुधापासून मांसापर्यंत खूप मोठी मागणी आहे. शेळीच्या दुधापासून बनवलेले साबण आणि चामडीला देखील मागणी आहे. शेळीच्या दुधात औषधी गुणधर्म असल्याने रुग्णांनी ते घ्यावे, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. मात्र, शेळीचे दूध सहज उपलब्ध होत नाही. शेळीचे क्लस्टर उभे राहिल्यास मार्केटकडून असलेल्या सर्व मागण्या पूर्ण करता येतील. विदर्भासारख्या दुष्काळी भागासाठी पशुपालनाकडे शेतकऱ्यांनी वळण्याची आवश्यकता आहे. त्यामुळेच आम्ही शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यापासून बाजार मिळवून देण्यापर्यंतची व्यवस्था या क्लस्टरमध्ये उभी करत असल्याचे केदार यांनी सांगितले.

हेही वाचा: काश्‍मीरमध्ये मोठी कारवाई; दहशतवाद्यांशी संबंधित 900 जण ताब्यात

५० एकर जागेवर उभ्या राहणाऱ्या या क्लस्टरमध्ये सुविधा केंद्र, प्रशिक्षण केंद्र व शेतकरी निवासस्थान, ५०० शेळ्या व २५ बोकडांचे मॉडेल शेळी फार्म, दीड एकर जागेवर शेळ्यांकरिता शेड, शेळीच्या दुधापासून पदार्थ प्रक्रिया केंद्र, शेळ्यांचे मांस प्रक्रिया केंद्र, विक्री केंद्रासह १५ एकर क्षेत्रावर वैरण लागवड करणारा हा प्रकल्प असणार आहे. समूह शेळी पालन करण्यासाठी शेतकऱ्यांची उत्पादक कंपनी किंवा फेडरेशन स्थापन करुन त्यांना शेळीपालन प्रशिक्षण, शेळीपालन व्यवसायाकरिता लागणाऱ्या सुविधा देणे, अद्ययावत तंत्रज्ञान, निर्यात सुविधा दिल्या जातील.

तीस हजार शेतकऱ्यांचा समावेश

या क्लस्टरमध्ये पहिल्या टप्प्यात अमरावती, यवतमाळ, नागपूर व वर्धा या जिल्ह्यांचा समावेश केला जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात अकोला, वाशिम, हिंगोली, बुलढाणा या चार जिल्ह्यांचा समावेश करण्यात येणार आहे. या जिल्ह्यांमधील किमान ३० हजार शेतकऱ्याना या व्यवसायासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.

loading image
go to top