- पांडुरंग म्हस्केमुंबई - राज्यभरात अवकाळी पावसामुळे सुरू असलेल्या शेतीच्या नुकसानीसंदर्भात राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात विरोधकांकडून सरकारवर दबाव वाढत असला, तरी ‘ओला दुष्काळ’ अशी संकल्पनाच शासनाच्या लेखी नाही..त्या ऐवजी ‘सततचा पाऊस’ ही एक नैसर्गिक आपत्ती अशी संकल्पना असून त्यासाठी असलेल्या कठीण निकषांमुळे सध्या मराठवाड्यात शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती म्हणून मदत देणे तांत्रिकदृष्ट्या अवघड असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.‘सततचा पाऊस’ नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केल्यानंतर पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना विहित दराने मदत देण्यात येते. यासाठी कोरडवाहू शेती प्रति हेक्टरी ६ हजार ८०० रुपये, बागायती शेतीसाठी प्रति हेक्टरी १३ हजार ५०० रुपये, तर फळबागांसाठी प्रति हेक्टरी १८ हजार रुपये मदत देण्यात येते. यात नंतर वाढ होऊन काहीवेळा प्रतिहेक्टर ३४ हजार रुपयांपर्यंत मदत देण्यात आलेली आहे..सततच्या पावसाचे निकष‘सततचा पाऊस’ कधी मानला जाईल, यासाठी खालील दोन निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार १५ जुलै ते १५ ऑक्टोबर या काळात पावसाचे प्रमाणः महसूल मंडळामध्ये सलग पाच दिवसांच्या कालावधीत प्रत्येक दिवशी किमान १० मि.मी. पाऊस होणे गरजेचे आहे. त्याच महसूल मंडळात या कालावधीत मागील १० वर्षांच्या (दुष्काळी वर्ष वगळून) सरासरी पर्जन्याच्या तुलनेत ५०% (दीडपट) किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झालेला असावा. हा पहिला निकष आहे..पहिला निकष लागू झालेल्या महसूल मंडळात १५ व्या दिवसापर्यंत वनस्पती निर्देशांक (एनडीव्हीआय) तपासला जातो. खरीप पिकांचा एनडीव्हीआय ०. ५ किंवा त्यापेक्षा कमी आल्यास, सततच्या पावसाचा दुसरा निकष लागू होऊ शकतो. ज्या दिवशी पाऊस सुरू झाला त्या दिवसाचा एनडीव्हीआय १५ व्या दिवसाच्या निर्देशांकापेक्षा जास्त असायला पाहिजे.दुसऱ्या निकषाची पूर्तता झाल्यानंतर संबंधित महसूल मंडळातील बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करून पंचनामे केले जातात. या मंडळात ३३ टक्केपेक्षा जास्त शेतीपिकांचे नुकसान झालेले असल्यास, शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी शासनाकडून मदत दिली जाते..अतिवृष्टीसाठी २४ तासांत ६५ मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाल्यास ‘अतिवृष्टी’ मानण्याचा निकष झाल्याचे मानण्यात येते. यासोबतच, सततच्या पावसासाठी निश्चित केलेला वनस्पती निर्देशांकाचा दुसरा निकष अतिवृष्टीमुळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी देखील लागू होतो. दुष्काळाव्यतिरिक्त इतर सर्व नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठीही हा निकष लावण्यात येतो..पुढील प्रक्रिया कशी असते?वनस्पती निर्देशांकाची माहिती (एनडीव्हीआय डेटा) स्पेस ॲप्लिकेशन सेंटर, अहमदाबाद येथून गोळा केल्यानंतर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि महाराष्ट्र सुदुर संवेदन प्रणाली केंद्र (एमआरएसएसी), नागपूर यांच्या समन्वयाने या माहितीचे विश्लेषण केले जाते.सर्व निकषांची पूर्तता झाल्यानंतर आणि महसूल मंडळातील बाधित क्षेत्राचे पंचनामे करून ३३% पेक्षा जास्त शेतीपिकांचे नुकसान झाल्याचे सिद्ध झाले, तरच शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या (एसडीआरएफ) सुधारित दराने मदत दिली जाते. मात्र हे सर्व निकष पाहता, त्यांची पूर्तता सर्वच महसुली मंडळांत करणे शक्य होत नसल्याने ‘सततचा पाऊस’ अशी नैसर्गिक आपत्ती घोषित करणे फारच अवघड असल्याचे मदत आणि पुनर्वसन विभागातील काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे..प्रति गुंठा फक्त ८५ रुपयांची मदतअतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनाने मंगळवारी प्राधान्याने मदत म्हणून खरीप हंगाम नुकसानीपोटी आतापर्यंत २,२१५ कोटींची मदत जाहीर केलेली आहे. मात्र या मदतीवरून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून सरकारची ही मदत म्हणजे प्रति गुंठा केवळ ८५ रुपये एवढीच मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. याबाबत अनेक शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून ही मदत अत्यंत तुटपुंजी असल्याबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.