पवारांना मोठा धक्का; बारामतीचे पाणी माढ्याला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जून 2019

पाणी प्रश्‍नावर राजकारण रंगणार 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पाणी प्रश्‍नाबाबत जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची नुकतीच भेट घेतली. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी जलसंपदा अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावरून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पाणी प्रश्‍नावर राजकारण रंगणार असल्याचे दिसून येत आहे. 

पुणे : नीरा देवघर प्रकल्पामधून बारामती परिसराला देण्यात येणारे पाणी थांबविण्याचा राज्य सरकारला दिलेला प्रस्ताव आज (बुधवार) मंजूर करण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का समजला जात आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून राज्य सरकारकडे हा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. 

माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी याबाबतची माहिती देताना सांगितले, की सरकारने बारामती परिसराला देण्यात येणारे पाणी माढ्यातील गावांना देण्यात येण्याचा प्रस्ताव सरकारने मंजूर केला आहे. 

खासदार निंबाळकर यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केल्यानंतर हा प्रस्ताव पाठविला होता. बारामती परिसराला देण्यात येणाऱ्या पाण्याचा करार 2017 मध्ये संपुष्टात आला आहे. नीरा डावा कालव्यातून बारामती परिसराला बेकायदा पाणी दिले जात होते. त्यामुळे हे पाणी माढा मतदारसंघाकडे वळवावे, अशी मागणी जलसंपदा मंत्री डॉ. गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. नीरा डावा कालव्याअंतर्गत लाभक्षेत्र असलेल्या फलटण, खंडाळा, माळशिरस, पंढरपूर आणि सांगोला या तालुक्‍यांना कमी पाणी मिळत होते. मात्र, आता हे पाणी या भागात वळविण्यात येणार आहे.

पाणी प्रश्‍नावर राजकारण रंगणार 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पाणी प्रश्‍नाबाबत जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची नुकतीच भेट घेतली. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी जलसंपदा अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावरून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पाणी प्रश्‍नावर राजकारण रंगणार असल्याचे दिसून येत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra government orders to release the water from Nira dam to Madha constituency