बच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्ली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra guardian minister

बच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्ली

महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावरूनही विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला होता. त्यानंतर शनिवारी अखेर शिंदे सरकारने पालमंत्र्यांची नावे जाहीर करून हा तिढा सोडवला आहे.

असं असले तरी शिंदे गटाने आमदार संजय शिरसाट आणि प्रहार पक्षाचे माजी मंत्री बच्चू कडू यांना मंत्रीमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे यांनी वेळोवेळी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. आणि आता तर शिंदे गटातील मंत्र्यांना २-२ जिल्ह्यांचे पालकमंत्री केले तरीही शिरसाट आणि बच्चू कडू यांचा विचार केला नसल्याचं दिसून येत आहे.

यावर राष्ट्रवादीने जोरदार टिका केली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी ट्विट करत संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांना म्हणाले आहेत की "संजय शिरसाट यांची गुवाहाटी जिल्ह्याच्या,तर बच्चू कडू यांची सुरत जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल खुप खुप अभिनंदन...५० खोके! एकदम ओके!!" यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. यावर अजून शिंदे गटाकडून कोणतीही प्रतिक्रीया आली नाही.

दरम्यान शिंदे सरकारमध्ये गृहमंत्री आणि अर्थमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस पालकमंत्रीपदाच्या बाबतीत सरकारमध्ये किंग असल्याचं दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तब्बल सहा जिल्ह्यांचं पाकसमंत्रीपद देण्यात आलं असून यामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी मिळाली आहे.