

लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा लातूर विभागीय मंडळाचा निकाल ९५.२५ टक्के लागला आहे. विभागातील लातूर, उस्मानाबाद व नांदेड या तीन जिल्ह्यातील ८८ हजार ८३० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. या पैकी ८४ हजार ६१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.५९ टक्के तर मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.२१ टक्के आहे. या परीक्षेत ३८ विद्यार्थ्यांकडून गैरप्रकार घडले होते. त्यांची एक विषयाची संपादणूक पातळी रद्द करण्यात आल्याची माहिती विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी येथे दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मार्च एप्रिलमध्ये ऑफलाईनही परीक्षा झाली होती. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी प्रमुख विषयांच्या लेखी परीक्षेच्या दरम्यान एक दिवसाचा खंडही देण्यात आला होता. लातूर विभागात ९० हजार २२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या पैकी ८८ हजार ८३० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात ८४ हजार ६१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात १८ हजार १७२ विद्यार्थ्यांना ७५ टक्के पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. ६० टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ४१ हजार ५१० आहे. ४५ टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेले विद्यार्थी २३ हजार २२२ इतके आहेत. तर ३५ टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ हजार ७११ आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
लातूर विभागाचा विज्ञान शाखेचा निकाल ९८.३० टक्के लागला आहे. यात ४१ हजार २२९ विद्यार्थ्यापैकी ४० हजार ५२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेचा निकाल ९१.८९ टक्के लागला आहे. यात ३३ हजार ४४५ पैकी ३० हजार ७३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेत १० हजार २४५ पैकी ९ हजार ६६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून याची टक्केवारी ९५.३४ इतकी आहे. आयटीआय शाखेतून दोन विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. दोघेही उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती श्री. तेलंग यांनी दिली.
दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी मुलींनी बाजी मारली आहे. लातूर विभागात ३८ हजार ९२५ मुलींनी परीक्षा दिली होती. या पैकी ३७ हजार ५९९ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. याची टक्केवारी ९६.५९ इतकी आहे. मुलांच्या निकालाची टक्केवारी ९४.२१ इतकी आहे. ४९ हजार ९०५ मुलांनी परीक्षा दिली होती. या पैकी ४७ हजार १६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागात परीक्षा केंद्रावर २५ व परिक्षकांकडून उघडकीस आलेले १३ असे गैरप्रकार घडले होते. या सर्वांची एक विषयाची संपादणूक पातळी रद्द करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
विभागात लातूरची आघाडी
लातूर विभागात असलेल्या तीन जिल्ह्या पैकी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लातूर जिल्ह्याची निकालात आघाडी आहे. लातूर जिल्ह्याचा निकाल ९६.२२ टक्के लागला आहे. या जिल्ह्यातून ३४ हजार ९६७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या पैकी ३३ हजार ६४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नांदेड जिल्ह्याचा निकाल ९४.९० टक्के लागला आहे. यात ३७ हजार ८२९ पैकी ३५ हजार ९०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उस्मानाबाद जिल्हयाचा निकाल ९३.९८ टक्के लागला आहे. यात १६ हजार ३४ पैकी १५ हजार ६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती श्री. तेलंग यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.