'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेवरील चर्चेवरुन खेळाला जातीय रंग देऊ नका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit pawar

'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टांग कोणी कोणाला मारली, यावरुन चर्चेचा धुराळा उडविणाऱ्यांमध्ये बिनालंगोट पहिलवानच आघाडीवर आहेत.

Ajit Pawar : 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेवरील चर्चेवरुन खेळाला जातीय रंग देऊ नका

पुणे - 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टांग कोणी कोणाला मारली, यावरुन चर्चेचा धुराळा उडविणाऱ्यांमध्ये बिनालंगोट पहिलवानच आघाडीवर आहेत. ज्यांना कुस्तीचा खेळ कळतो, त्यांनीच त्याविषयी बोलावे. खेळाचे राजकारण करु नका, कुस्ती हा खेळ प्रत्येक मल्लाचा धर्म असतो, त्यावर चर्चेचा धुराळा उडवून अशा खेळाला जातीय रंग देऊ नका' अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कुस्ती स्पर्धेतील निकालावरुन रान पेटविणाऱ्यांना फटकारले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने 'हिंदकेसरी' स्पर्धेचे विजेते पहिलवान अभिजित कटके व "महाराष्ट्र केसरी" स्पर्धेचे विजेते शिवराज राक्षे यांचा अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी सत्कार करण्यात आला. यावेळी कटके व राक्षे यांना पवार यांच्या हस्ते बुलेट दुचाकी भेट देण्यात आली. तसेच 'उपमहाराष्ट्र केसरी' पहिलवान महेंद्र गायकवाड यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. याबरोबरच सिंहगड रस्ता परिसरात कोयता घेऊन दहशत पसविणाऱ्यांना पकडणाऱ्या पोलिस कर्मचारी अक्षय इंगवले व धनंजय पाटील यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार सुनील टिंगरे, चेतन तुपे, दिलीप मोहिते, अशोक पवार आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, "कुस्ती स्पर्धेवरील चर्चेमुळे चांगली कामगिरी करणाऱ्या मल्लांची कामगिरी झाकोळली जाता कामा नये. यावेळच्या स्पर्धेमध्ये नव्या मल्लांची कामगिरी उल्लेखनीय होती. त्यांना योग्य मार्गदर्शन केले, तर हे खेळाडू चांगले घडतील. सिकरंद शेख हा देखील लढवय्या मल्ल आहे. त्याचबरोबर महेंद्र गायकवाड याच्या कष्टालाहू दुर्लक्षून चालणार नाही. सगळेच मल्ल एकमेकांच्या तोलामोलाचे आहेत. अभिजीत कटके, शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड या खेळाडुंनी आपले घर, तालीम, वस्तादांचे नाव मोठे केले आहे. खेळामध्ये राजकारण करु नका. त्याला जातीय स्वरुप देण्याचा प्रयत्न करु नका.''

"खेळाडुंनी अपयश आल्यावर खचून जाऊ नये आणि यश मिळाल्यावर हुरळून जावू नये. महाराष्ट्राच्या कुस्तीला परंपरा आहे. कुस्तीत ऑलिम्पीकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या खाशाबा जाधव यांचा आदर्श समोर ठेवा. शिवराज, अभिजीत, महेंद्र यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून आणावे, ऑलिम्पिकमध्ये आपल्या राष्ट्रगीताची धून त्यांनी ऐकण्याची संधी देत अंगावर तिरंगा घ्यावी, अशी आमची इच्छा आहे. सरकार बदलत असतात, मात्र खेळामध्ये राजकारण आणणार नाही. मल्लांनीही पुढे जाण्याचा प्रयत्न करावा.'' असेही पवार यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविक प्रशांत जगताप यांनी केले.

पहिलवान भलतेच ताकदवान आहेत

"शिवराज व अभिजीत या दोघांनाही बुलेट मोटारसायकल भेट देण्यात आली आहे. मी त्यांना विचारले, तुम्हाला बुलेट चालविता येते का? तेव्हा त्यांनी आम्हाला बुलेट चालविता येत नसल्याचे सांगितले, मग बुलेट नेणार कशी? असा प्रश्‍न मी त्यांना विचाला.तेव्हा बुलेट उचलून घेऊन जाऊ, असे दोघांनी सांगितले. त्यामुळे आपले पहिलवान किती ताकदवान आहेत, हे तुम्हाला कळलचं असेल, असे अजित पवार यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षावर

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून अभिजीत कटके यांना 6 लाख रुपये, बुलेट मोटारसायकल, शिवराज राक्षे यांना 2 लाख रुपये व बुलेट मोटारसायकल, महेंद्र गायकवाड यांना एक लाख रुपये तसेच पहिलवान किरण भगत यांना एक लाख रुपये यावेळी बक्षिस स्वरुपात देण्यात आले.