आज दिवसभरात घडलेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sakal breaking notifiction

आज दिवसभरात घडलेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

ओंटारियो प्रांतातील वॉन शहरात झालेल्या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू

कॅनडाच्या ओंटारियो प्रांतातील वॉन शहरात रविवारी रात्री एका निवासी इमारतीत झालेल्या गोळीबारात ७३ वर्षीय संशयितासह सहा जणांचा मृत्यू झाला आणि एक जण गंभीर जखमी झाला, असे स्थानिक पोलिसांनी सांगितले: रॉयटर्स

उद्धव ठाकरे आमदारांना देणार कानमंत्र, नागपूरच्या रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये बैठक

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित पक्षातील आमदारांची नागपूरच्या रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये बैठक थोड्याच वेळात घेणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा चालू झाल्या आहेत.

उद्धव ठाकरे अधिवेशनात सहभागी होण्यासाठी दाखल

उद्धव ठाकरे अधिवेशनात सहभागी होण्यासाठी दाखल झाले आहेत. ते काही वेळातच विधान भवनात पोहचणार आहेत. आणि आल्यानंतर ते शिवसेनेच्या आमदारांची एक बैठक घेणार आहेत, तर मविआ आघाडीची देखील बैठक होण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे अधिवेशनात सहभागी होण्यासाठी दाखल

उद्धव ठाकरे अधिवेशनात सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत. ते काही वेळातच नागपूरमध्ये पोहचणार आहेत. आणि आल्यानंतर ते शिवसेनेच्या आमदारांची एक बैठक घेणार आहेत, तर मविआ आघाडीची देखील बैठक होण्याची शक्यता आहे.

पहिल्याच दिवशी अजित पवारांनी अख्ख्या मंत्रिमंडळालाच झापलं

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकार मधील मंत्रिमंडळालाच झापलं. अधिवेशनात काही मंत्री शर्टाच्या खिशाला पक्षाचं चिन्हं असलेले बिल्ले लावून विधानसभेत आले होते. त्यामुळे अजित पवार चांगलेच संतापले. ते म्हणाले मंत्र्यांनी असे पायंडे पाडू नका. नाही तर सभागृहात बेशिस्त वाढेल.

पुण्यातील पी एम पी एल बसेस चे होणार फायर ऑडिट

पुण्यातील पी एम पी एल बसेस चे होणार फायर ऑडिट काढण्यात येणार आहे. आगीच्या घटना रोखण्यासाठी पी एम पी एल ने हा निर्णय घेतला आहे. या फायर ऑडिटमध्ये बस मधील अग्निशामक सिलिंडर बदलण्याचे काम असेल तसेच ऑईल लिकेज होत असेल तर त्यासाठी दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. तसेच चालक-वाहकांना यासंदर्भातील प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पुण्यात एकूण 2121 पी एम पी एल बसेस चे होणार ऑडिट होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बस मध्ये आगीच्या घटना वाढत आहे आहेत. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ताफ्यातील सर्व बसगाड्यांचे फायर ऑडिट काढण्यात येणार आहे.

रिक्षा चालकांवर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी

चक्काजाम रिक्षा आंदोलन दरम्यान रिक्षा चालकांवर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घ्या अशी मागणी बाबा आढाव यांच्या रिक्षा पंचायत समितीने केली आहे. ज्येष्ठ कामगार नेते रिक्षा पंचायत समितीचे अध्यक्ष बाबा आढाव हे देखील उपस्थितीत होते. बाबा आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर आंदोलन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकाऱ्यांना भेटून यावेळी त्यांनी निवेदन दिले आहे. त्याचबरोबर खोटे गुन्हे मागे घ्यावेत आणि जे बेकायदेशीर आहेत त्याची परवानगी रद्द करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काळया फिती लावून आंदोलन करण्यात आलं आहे. 12 तारखेला रिक्षा चालकांनी आरटीओ समोर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर पोलिसांच्या व प्रशासनाच्या वतीने ते आंदोलन मोडीत काढण्यासाठी कार्यवाही करण्यात आली होती

LIVE Update: शिवसेनेचं पक्ष कार्यालयही शिंदे गटाच्या ताब्यात

अधिवेशनात शिवसेना पक्ष कार्यालय शिंदे गटाला मिळाला असून बाळासाहेबांची शिवसेना असा बोर्डही लागला असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा फोटो काढून फक्त स्व. बाळासाहेब ठाकरे यांचाच फोटा लावण्यात आला आहे. या कार्यालय दोन्ही पक्षाकडून दावा करण्यात आला होता. दरम्यान विधिमंडळ सचिवालयाने हे कार्यालय प्रथम ठाकरे गटाला दिले होते. कार्यालयात उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यासह बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोही लावण्यात आला होता. परंतु आज कार्यालयातील चित्र बदलले होते. कार्यालयात उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचा फोटो ऐवजी फक्त बाळासाहेब ठाकरे यांचाच फोटो होतो. शिवाय प्रतोद म्हणून शिंदे गटातील नेत्याचे नाव होते. तर एका कक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी लागली होती.

विधिमंडळाचे अधिवेशनाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित

विधिमंडळाचे अधिवेशनाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं आहे. कामकाज सुरू झालं तेव्हा महाराष्ट्र कर्नाटक सीमावदावरून सभागृहात चांगलीच खडाजंगी झाल्याचं दिसून आलं आहे.

बाळाला घेऊन सरोज अहिरे विधान भवनात दाखल

बाळाला घेऊन सरोज अहिरे विधान भवनात दाखल झाल्या आहेत. यावेळी बोलताना सरोज अहिरे म्हणाल्या की, मी माझ्या भागातील, मतदार संघातील प्रश्न मांडण्यासाठी आली आहे. बाळाला पहिल्यांदाच घराच्या बाहेर आणलं आहे आणि तेही या अधिवेशनासाठी आम्ही बाहेर पडलो आहोत.

हिवाळी अधिवेशन सुरू, विरोधकांच्या पायऱ्यांवरून सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणा

महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिंदे-फडणवीस सरकारला विरोधकांनी घेरायला सुरवात केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं आहे.

पुण्यात MPSC करणारे विद्यार्थी रस्त्यावर; काय आहेत मागण्या?

विविध मागण्यांसाठी आज पुण्यामध्ये एमपीएससी करणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. पुण्याती नवी पेठेत हे आंदोलन सुरु असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे.

काय आहेत मागण्या?

राज्यसेवा पूर्व 2023 ही 4 जून रोजी आहे. त्यात लाखो विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असल्याने पूर्व परीक्षा पास होणे आव्हानात्मक असते. म्हणून पूर्वचा किमान 5-6 महिने अभ्यास गरजेचा असल्याने वेळ मिळावा.

Syllabus जसाच्या तसा UPSC चा Copy Paste आहे. MPSC च्या मुलांना अजून संदर्भसाहित्यच उपलब्ध नाही. त्यात सुधारणा व्हावी.

जुन्या 5000 मुलाखती रखडल्या आहेत. राज्यसेवा 2022 ची तर मुख्यही झालेली नाही, त्यांच्या मुलाखती व्हायला April- May महिना यायचा मग त्यांनी अभ्यास कधी आणि कशातून करायचा असाही प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे.


महाविकास आघाडीकडून आज दोन बैठकांचं आयोजन 

महाविकास आघाडीकडून आज दोन बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

पुण्यातील फुरसुंगी मधील नागरिकांनी रास्ता रोको

पुण्यातील फुरसुंगी मधील नागरिकांनी रास्ता रोको केला आहे. या परिसराला होणारा दूषित पाणीपुरवठा याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय व स्थानिक नागरिकांनी पुणे सासवड रोडवर आंदोलन केले जात आहे. या परिसराला दूषित पाणीपुरवठा होत आहे. गढूळ पाणी पुरवठा होत असल्यामुळे संतप्त नागरिकांनी भेकराईनगर चौकात ठाण मांडून पुणे सासवड रोड अडवून धरला आहे. या आंदोलनामुळे दुतर्फा वाहतूक कोंडी झालेली होती. कालव्याला खडकवासला धरणातून केला जाणारा पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे, लगत असलेल्या विहिरींना पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाई जाणवत आहे. कालव्यातील दूषित पाणी विहिरीमध्ये उतरते, पुढे तेच दूषित पाणी काही प्रमाणात प्रक्रिया करून नागरिकांना वापरण्यासाठी दिले जाते.

LIVE Update: हिवाळी अधिवेशनाला सुरवात; अधिवेशनाचा पहिलाच दिवस सीमावदामुळे ठरणार वादळी

हिवाळी अधिवेशनाला सुरवात; अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद या मुद्द्यावर अधिवेशन धुमसत असताना दिसून येत आहे.

पोलिसी बळाचा वापर करत महाराष्ट्र एकीकरण समितीचा मेळावा पाडला बंद

पोलिसी बळाचा वापर करीत पोलिसांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित करण्यात आलेला मेळावा बंद पाडला आहे. तसेच मेळावास्थळी येणाऱ्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात येत आहे. आतापर्यंत मध्यवर्ती समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, माजी नगरसेवक नेताजी जाधव, नगरसेवक नेताजी जाधव, आर आय पाटील यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अनेक नेत्यांना अटक

माजी आमदार मनोहर किनेकर, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्यासह पदाधिकारी आर आर पाटील, राष्ट्रवादीचे अमोल देसाई मुकेश बारदेशकर यांना ताब्यात घेतले आहे.

बेळगावात कलम 144 लागू, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याला परवानगी नाकारली

कर्नाटक सरकारचे अधिवेशन सुरु असतानाच बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीकडून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र कर्नाटक पोलिसांनी ही परवानगी नाकारली असून कर्नाटक सरकारने बेळगावात कलम १४४ लागू केले आहे.

पुण्यात आज एमपीएससी विद्यार्थ्यांच आंदोलन

पुण्यात आज एमपीएससी विद्यार्थ्यांच आंदोलन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना पोलिसांनी नोटीसा पाठवल्या आहेत. अहिल्या शिक्षण संस्थेच्या बाहेर हे आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळपासूनच पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं, पण त्यांनी स्वीकारलं नाही: आदित्य ठाकरे

हे सरकार घाबरट सरकार आहे. घटनाबाह्य सरकारला आम्ही आव्हान दिलं परंतु त्यांनी ते स्वीकारल नाही. हे सरकार घटनाबाह्य आहे. हे घटनाबाह्य सरकार सीमाप्रश्नावर बोलत नाही. या सरकारकडून शेतकऱ्यांना मदतही मिळाली नाही असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.

कोश्यारींचा अश्वारूढ पुतळा उभारून महाराष्ट्रगीत रचतील; शिवसेनेचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे सध्याच्या राज्य सरकारचे श्रद्धास्थान असून त्यांचा अश्वारुढ पुतळा उभा करतील असे लोकांना वाटत असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाने केली आहे. 'सामना'च्या अग्रलेखात आज मोर्चावर टीका करणाऱ्या भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. शिवरायांचा अपमान करणाऱ्या भाजपचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे फडणवीस-शिंदे सरकारचे श्रद्धास्थान असल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे. फडणवींसासह इतर मंडळी या अपमानकर्त्याच्या इतक्या प्रेमात पडली आहे की, भगतसिंह कोश्यारींचा अश्वारूढ पुतळा उभारून हे लोक समृद्धी महामार्गाच्या प्रवेशद्वारावर उभारून त्यांच्या नावाने एखादे महाराष्ट्रगीत रचतात की काय असे आता जनतेला वाटू लागले, असा खोचक टोला लगावला आहे.

वारंवार होणाऱ्या महापुरूषांच्या अपमानाच्या निषेधार्थ आज पंढरपूर बंद

राज्यपाल आणि भाजप नेत्यांकडून वारंवार महापुरुषांबाबत होत असलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ आज सर्वपक्षीय पंढरपूर बंदची हाक देण्यात आली आहे . या बंदमध्ये भाजप , शिंदेसेना आणि मनसे सामील झालेली नाही. या बंदमध्ये प्रमुख पक्षांसह सर्व सामाजिक संघटना सहभागी असल्याने हा बंद कडकडीत पाळला जाणार आहे. सध्या सुट्ट्या सुरू असल्याने हजारोंच्या संख्येने भाविक विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला येतात त्यांना आज या बंदचा फटका बसण्याची शक्यता आहे

राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होणार

राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. लोकायुक्त कायद्याचं बील अधिवेशनामध्ये मांडण्यात येणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या आमदारांची आज बैठक होणार आहे. नागपूर विधान भवनामध्ये सकाळी 10 वाजता आणि दुपारी चार वाजता ही बैठक होणार आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांना यावेळी कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर