चिखलातला संसार सावरताना...!

नागरिकांचे चिखलाने माखलेले कपडे, चिखल उजालेल्या भकास चेहऱ्याने प्रत्येकजण घरातील, दुकानातील चिखल काढण्याचे काम करीत होते. महाड बसस्थानकातील गाड्या एकमेकांवर येऊन पडल्या होत्या, यावरुन पाण्याची उंची किती होती याची कल्पना केल्यावर आमच्या अंगावर काटा उभा राहिला.
mahad flood
mahad floodsakal

दरडी आणि पुरामुळे सर्वांचे लक्ष महाडकडे लागलेले असताना महाडमधील नागरिकांकडून कोणताच प्रतिसाद मिळत नव्हता, सर्वांचे फोन स्वीच ऑफ, इंटरनेट सुविधा बंद, प्रशासनाचा शुन्य प्रतिसाद. अशा परिस्थितीच रस्ते मार्गानेच महाड गाठणे हाच एकमेव मार्ग माझ्याकडे होता. अलिबाग येथून सकाळी महाडकडे जाण्यास निघाल्यावर पडणारा मुसळधार पाऊस आणि रस्त्यात ठीकठिकाणी पडलेल्या खड्ड्यातून मार्ग काढणे महाकठिण काम होते. सावित्री नदी पुलाच्या अलिकडे 60 टक्के रस्ता वाहुन गेल्याने आमची गाडी पुढे जाईल की नाही, हा मोठा प्रश्नचिन्ह होता. तरीही दरमजल करीत सायंकाळी महाड शहर गाठले. यावेळी जे नजरेसमोर आले ते अगदी भयानक चित्र होते.

नागरिकांचे चिखलाने माखलेले कपडे, चिखल उजालेल्या भकास चेहऱ्याने प्रत्येकजण घरातील, दुकानातील चिखल काढण्याचे काम करीत होते. महाड बसस्थानकातील गाड्या एकमेकांवर येऊन पडल्या होत्या, यावरुन पाण्याची उंची किती होती याची कल्पना केल्यावर आमच्या अंगावर काटा उभा राहिला. कोणते फोटो घेऊ आणि कोणते सोडू अशी परिस्थिती आमचे छायाचित्रकार समिर मालोदे यांची झाली होती. आम्हीही मोबाईलमधून फोटो काढत होतो. सर्वजण आशाळभुताप्रमाणे आमच्याकडे आशेने आणि मदतीची प्रतिक्षा करीत होते. आम्ही आमचे काम करीत होतो आणि त्यांना आमच्याशी बोलायलाही वेळ नव्हता. चेहरे निर्विकार, सरुन गेल्या संकटातून जीवंत वाचल्याचे समाधान आणि गेलेले संसार पाहुन दु:खी चेहरे, महाडकरांच्या अंतकरणात विचारांचे नक्की कोणते गोंधळ सुरु आहे, याची कोणतीच कल्पना करणे शक्य नव्हते.

तेवढ्यात एक मदत घेऊन टेंम्पो आला. टेंम्पोत फक्त पाण्याच्या बाटल्या होत्या, परंतु खुप काहीतरी मौल्यवान वस्तू मिळत आहे, अशा प्रकारे त्या टेम्पोवर स्थानिकांनी अक्षरशः झडप घातली. त्याला कारणही तितकेच होते. दोन दिवस पुराच्या पाण्यात वावरत असताना घरातील पिण्याचे पाणी सर्वांचेच संपलेले आहे. पाण्याचा एक घोट कोणी देईल का? अशी आशा या सर्वांना वाटत आहे. त्याचमुळे पिण्याचे पाणी हे महाडकरांसाठी सर्वात मौल्यवान वस्तू असावी. आधी पुराचे पाणी आणि आता पिण्याच्या पाण्यासाठीही महाडकरांना संघर्ष करावा लगत असल्याचे दिसून आले. पाणी प्याल्यानंतर पुन्हा चिखल उपसायला सुरुवात झाली. आम्ही विचारले "चवदार तळ्याकडे कसे जायचे" तिथल्या एका तरुणाने सांगितले, "साहेब गाडी इथेच थांबवा आणि पायी चालत जा. सगळीकडे चिखल आहे. रस्तावरच कचऱ्याचे ढिगारे आहेत"

नळाला पाणी नाही, वीज नाही, घरातील धान्य, कपडे भिजलेले, अंगावर काय घ्यायचे आणि घरातील स्वच्छता करण्यासाठी उर्जा येण्यासाठी काय खायचे हा मोठा प्रश्न लहान बालकांपासून वयोवृद्धांना पडलेला आहे. शनिवारी पूर आणि पावसाचा जोर ओसरल्यानंतर घरातील सर्वांचीच लगबग सुरु झालेय. कोणालाही सवडीने एकमेकांशीही बोलण्यास वेळ मिळत नाही. प्रत्येकजण आपल्या धंद्याची आणि शिल्लक असलेल्या संसाराची बेरीज करण्यात गुंतलाय. नगरपालिका, सामाजिक संस्थां यांचे माणस मदत करीत आहे; मात्र ही मदत आलेल्या संकटासमोर खूपच तोकडी पडतेय. संपुर्ण महाड शहर दोन दिवसांपेक्षा जास्तकाळ पाण्याखाली होते. तळमजला आणि पहिल्या मजल्यावरील कुटुंबांचे संसार उद्ध्वस्थ झालेत. चिखल, पाण्याने भिजलेले धान्य, कपड्यांचे ढिगारे रस्त्यावर रचले जात आहेत. ते बाजूला करण्यासाठी नगरपालिकेच्या माणसांना वेळ मिळत नाही. शंकर चालके यांचे कुटुंब भिजलेल्या धान्याच्या ढिगाऱ्यासमोर उभे राहून डोळ्यातून आश्रू गाळीत होते.

ज्या सावित्री नदीमुळे महाड शहर येथे वसले, तीच सावित्री आज कोपली होती. सावित्रीचे एवढे रौद्र रुप कधीही त्यांनी पाहिले नव्हते. पुरानंतर येथे रोगराई येण्याची शक्यता आहे, त्यामुळे वयोवृद्धांसह गरोदर महिला, लाहान बालके, कोरोना बाधीत महाड शहर सोडून चालले आहेत. वाहने नादुरुस्त होण्याची गंभीर समस्या येथे निर्माण झालेली आहे. काही हुशार नागरिकांनी आपली वाहने महामार्गावर आणून ठेवली आहेत; परंतु या ठिकाणी काहींनी आधीच गायी, म्हशी, बकऱ्या पुराच्या पाण्यापासून वाचवण्यासाठी आणून ठेवल्या होत्या. अनेकांना आपली वाहने महामार्गवर आणता आली नाहीत, त्यांच्या दुचाकी, चारचाकी वाहून गेली. दारात उभी केलेली गाडी आता कुठे जाऊन अडकलेय याचा शोध करावा लागतोय.

काहींना आपला व्यवसाय नव्याने सुरु करणे खुपच कठीण आहे. रायगड मोबाईलचे अकबर इसाने यांचे पाच लाखाहून अधिक नुकसान झालेले आहे. आपल्या दुकानातील खराब झालेल्या साहित्याकडे ते हताशपणे पहात उभे होते. काही न बोलता ते पुन्हा कामाला लागले. योगेश चणामार्टचे मालक योगेश मोरे आपल्या कुटुंबासह दुकानातील चिखल आणि पाण्याने भिजलेले साहित्य बाहेर काढत होते. थोडेसे बोलल्यानंतर तेही हातात भांड घेऊन चिखलातला संसार सावरु लागले. आम्ही मात्र कोणतीही मदत न करता हताशपणे त्यांची धडपड पहात होतो. वेळ खुप कमी होता. कारण पुन्हा दरमजल करीत घर गाठायचे होते.

आम्ही ज्यावेळी महाडमध्ये प्रवेश केला त्यावेळी पुराचे सर्व पाणी ओसरुन पाच तास झाले होते. तरीही पुराच्या पाऊलखूणा पदोपदी दिसत होत्या. बुधवारी रात्री पासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने सावित्रीचे पाणी वाढू लागले होते. मात्र, याची कोणतीही माहिती येथील नागरिकांना नव्हती. नेहमीप्रमाणे पाणी वाढेल आणि कमी होईल अशी अटकळ बांधून राहलेल्या महाडकरांना तब्बल 48 तास पुराच्या पाण्यात अडकून रहावे लागले. गुरुवारची रात्र महाडकरांसाठी धोक्याची ठरली. सावित्रीचे पाणी कधी दरवाजापर्यंत पोहचले हे शिवाजी चौकातील नागरिकांना समजलेच नाही. अगदी दुसऱ्या मजल्यापर्यंत हे पाणी पोहचले होते. त्यामुळे सामानाची आवराआवर करण्याची संधीच मिळाली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com