
मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार
पुणे : मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) महाराष्ट्राचा निरोप घेतला आहे. गुरुवारी (ता. १४) उर्वरित मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणासह महाराष्ट्रातून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर तब्बल ४ महिने ९ दिवस मुक्काम करून मॉन्सून परतला आहे.
यंदा दोन दिवस आधीच राज्यात दाखल झालेल्या मॉन्सूनने एक दिवस आधीच महाराष्ट्रातून काढता पाय घेतला आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार ७ जून ही महाराष्ट्रातील आगमनाची व १५ ऑक्टोबर ही मॉन्सूनच्या महाराष्ट्रातून माघारीची दीर्घकालीन सर्वसाधारण तारीख आहे. यंदा मॉन्सूनने ५ जून रोजी महाराष्ट्रात हजेरी लावली. त्यानंतर १० जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला.
हेही वाचा: प्रा. राजन शिंदे खून प्रकरण : ‘एसआयटी’चे पथक देऊळगाव राजाला रवाना
गुरुवारी (ता. १४) मॉन्सूनच्या परतीची सीमा कोहिमा, सिलचर, कृष्णनगर, बारीपाडा, मालकांगिरी, नालगोंडा, बागलकोट, वेंगुर्ला अशी होती. ईशान्य भारताचा काही भाग, पूर्व किनारपट्टी, गोवा आणि दक्षिण भारताचा काही भाग वगळता देशाच्या बहुतांशी भागातून मॉन्सून परतला असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
हवामान विभागाने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार १७ सप्टेंबर ही मॉन्सूनच्या माघारीची दीर्घकालीन सर्वसाधारण तारीख आहे. यंदा तब्बल १९ दिवस उशिराने ६ ऑक्टोबर रोजी परतीचा प्रवास सुरू केला होता. ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील विदर्भाच्या काही भागातून, तर १२ ऑक्टोबर रोजी संपूर्ण विदर्भासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागातून मॉन्सून परतला होता.
विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता
पुणे : मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) संपूर्ण महाराष्ट्रातून माघार घेत राज्याचा निरोप घेतला आहे. उद्यापासून (ता. १६) विदर्भासह मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात तयार झालेली कमी दाबाची क्षेत्र त्यांना लागूनच आकाशात चक्राकार वारे वाहत आहे. या कमी दाब क्षेत्रांच्या प्रणाली दरम्यान पूर्व पश्चिम हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा: आव्हाडांऐवजी दुसऱ्या कुणाला त्वरित जामीन मिळाला असता का? - राम कदम
गेल्या काही वर्षांतील मॉन्सूनची महाराष्ट्रातील परतीची वाटचाल
वर्ष तारीख
२०१६ १६ ऑक्टोबर
२०१७ २४ ऑक्टोबर
२०१८ २० ऑक्टोबर
२०१९ १६ ऑक्टोबर
२०२० २८ ऑक्टोबर
Web Title: Maharashtra Mansoon Return Rain
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..