नागपूर महापालिका निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांत मोठ्या प्रमाणावर बंडखोरी उफाळून आली असून, तिकीट नाकारल्याने भाजपचे ५० हून अधिक तर काँग्रेसचे १५ पेक्षा जास्त माजी नगरसेवक नाराज झाले आहेत. या नाराज नेत्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अधिकृत उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. बंडखोर उमेदवार पक्षाच्या मतांमध्ये फूट पाडू शकतात, त्यामुळे निकालावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून भाजप आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिवसभर बंडखोरांची मनधरणी करण्यात गुंतले असून, नातेवाईक, मित्र आणि स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून अर्ज मागे घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असल्याने बंडखोर उमेदवार माघार घेतात की मैदानातच टिकून राहतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.