Chhatrapati Sambhajinagar मधील कॅनॉट प्लेस परिसरात एका चहाच्या हॉटेलवर किरकोळ कारणातून दोन गट आमनेसामने आले आणि वादाचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले. या गोंधळात धारदार शस्त्राचा वापर करून हत्येचा प्रयत्न झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात येत आहे. घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले असून त्याच परिसरात त्यांची सर्वांसमोर धिंड काढण्यात आली. या टोळक्यामुळे परिसरात वारंवार धिंगाणा घालून दहशत निर्माण होत असल्याच्या तक्रारी होत्या. मागील काही काळापासून ज्या ठिकाणी हा मस्तवालपणा सुरू होता, त्याच ठिकाणी पोलिसांनी कारवाई करून कायद्याचा धाक दाखवला आहे. खरेदी आणि खाद्यसंस्कृतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या कॅनॉट प्लेसमध्ये रात्री उशिरापर्यंत सर्व वयोगटांची वर्दळ असते. मात्र अलीकडे टवाळखोरांच्या वाढत्या उपद्रवामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, पोलिसांच्या या कारवाईतून अशा प्रवृत्तींना थारा दिला जाणार नाही असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.