कोणत्या महापालिकेत कोणाचा महापौर? पाहा...

maharashtra mayor election whose mayor is in which municipal corporation
maharashtra mayor election whose mayor is in which municipal corporation

मुंबई : राज्यात गेल्या महिनाभरापासून राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची महाविकास आघाडी यांचे सरकार येणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमिवर राज्यातील महापौर व उपमहापौर या पदांसाठी आज (शुक्रवार) निवडी झाल्या. कोणत्या महापालिकेत कोणाचा महापौर आहे, याबद्दल जाणून घेऊयात.

मुंबई महानगरपालिकेवर फडकला भगवा...
महापौर पदाच्या निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकला असून, महापौरपदी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर तर उपमहापौरपदी सुहास वाडकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. मुंबई महानगर पालिकेवर 25 वर्षांपासून वर्चस्व टिकवून ठेवण्यात शिवसेना यशस्वी झाली आहे.

पुणे महानगरपालिकेत भाजपचा महापौर...
पुण्याच्या महापौरपदी मुरलीधर मोहोळ यांची बहुमताने निवड झाली आहे. या निवडणुकीत मोहोळ यांना 99 मते मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेनेचे प्रकाश कदम यांना 60 मते मिळाली आहेत. या निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी हातमिळवणी केली होती. तर मनसे तटस्थ होती.

नाशिक महानगरपालिकेतील भाजपने सत्ता राखली...
नाशिक महानगरपालिका महापौर पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली असून, भाजपचे सतीश कुलकर्णी महापौरपदी विराजमान झाले आहेत. दरम्यान, महापौरपदाच्या निवडणूकीआधी भाजप सत्ता राखू शकेल की नाही? अशा चर्चांना उधाण आले होतं. भाजपने निवडणूक बिनविरोध जिंकून आपली सत्ता राखली आहे.

परभणीत काँग्रेसने राखला गड...
परभणी महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक भाजपच्या मंगल मुदगलकर विरुद्ध काँग्रेसच्या अनिता सोनकांबळे यांच्यात झाली. परंतु, निवडणूकीत भाजप एकाकी पडल्याचे दिसून आले. भाजपच्या मंगला मुदगलकर यांना केवळ 8 मते पडली. काँग्रेसच्या अनिता सोनकांबळे महापौर तर कॉंग्रेस चे भगवान वाघमारे उपमहापौरपदी विराजमान झाले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपची सत्ता...
पिंपरी-चिंचवड महापौर पदी उषा उर्फ माई ढोरे यांची 81 मतांनी निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाती उर्फ माई काटे यांचा 40 मतांनी पराभव करत त्या महापौरपदी विराजमान झाल्या. शिवसेनेनं राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने राज्यातील सत्तेआधीच महाविकासआघाडी पहायला मिळाली. भाजपने महापौरपदाचा मान पटकावला.

चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर...
चंद्रपूरमध्ये भाजपच्या उमेदवार राखी कंचर्लावार यांची महापौरपदी निवड झाली आहे. कचर्लावार यांना 42 मतं तर काँग्रेस उमेदवार कल्पना लहामगे यांना 22 मतं पडली. त्यामुळे महापौरपदी विराजमान होण्याचा मान भाजपला मिळाला.

अमरावतीत भाजपचा महापौर...
अमरावती महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणूकीत भाजपचे चेतन गावंडे विजयी झाले आहेत. त्यांना 49 मतं मिळाली असून, त्यांच्या विरोधात एमआयएमचे उमेदवार अफजल हुसेन मुबारक हुसेन हे उभे होते. त्यांना 21 मतं मिळाली आहेत.

लातूर महापौर निवडणूक...
लातूर महानगरपालिकेत बहुमत असतानाही भाजपला मोठा धक्का बसला आहे. अडीच वर्षानंतर पुन्हा सत्ता काँग्रेसच्या ताब्यात गेली असून काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे हे लातूरचे नवे महापौर असणार आहेत. काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे यांनी भाजपच्या शैलेश गोजमगुंडे यांचा पराभव करत लातूर महापालिकेचे महापौरपद काबीज केले आहे. ते लातूरचे नवे महापौर असणार आहेत. भाजपचे 35 नगरसेवक, काँग्रेसचे 32 नगरसेवक आणि 1 वंचित बहुजन आघाडीचे असताना काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे यांना नगरसेवकांनी हात उंचावून मतदान केले आहे. यातील 68 मतांपैकी 35 मते काँग्रेसच्या विक्रांत गोजमगुंडे यांना मिळाली आहेत.

अकोला महानगलपालिका...
अकोल्याच्या महापौरपदी भाजपच्या अर्चना मसनेंची निवड झाली आहे. त्यांनी काँग्रेसच्या अजरा नसरीन यांचा केला 48 विरूद्ध 13 मतांनी पराभव केला. तर उपमहापौरपदी भाजपचे राजेंद्र गिरी हे विराजमान होणार आहेत. त्यांनी काँग्रेसच्या पराग कांबळेंचा 48 विरूद्ध 13 मतांनी केला पराभव केला. या निवडणुकीत शिवसेना तटस्थ असल्याचे पाहायला मिळाले, तर राष्ट्रवादी, वंचित, एमआयएमचे 10 नगरसेवक मतदानाला अनुपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com