Monsoon : राज्यात सर्वदूर पाऊस; ११ जिल्ह्यांत ‘रेड अलर्ट’

राज्यातील बहुतांश भागात मॉन्सून सक्रिय होत आहे. सोमवारपासून कोकण आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे.
Chandrapur Rain water
Chandrapur Rain watersakal

पुणे - राज्यातील बहुतांश भागात मॉन्सून सक्रिय होत आहे. सोमवारपासून कोकण आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाड्यात सर्वदूर हलका पाऊस पडत आहे.

हवामान विभागाकडून बुधवारी (ता. १९) पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून अनेक ठिकाणी मुसळधार पडण्याची शक्यता आहे. यामुळे खरिपात रखडलेल्या पेरण्यांना वेग येणार असून उगवून आलेल्या पिकांना पावसामुळे दिलासा मिळणार आहे.

कोकणातील ठाणे, रत्नागिरी, सिंदुधुर्ग जिल्ह्यांतील अनेक भागांत दोन दिवसांपासून हलका ते मध्यम पाऊस पडला. तर पालघर, रायगड जिल्ह्यांतील सर्वदूर जोरदात ते मुसळधार पाऊस कोसळला आहे. मंगळवारी (ता. १८) सकाळी आठ वाजेपर्यंत कोकणातील रायगडमधील माणगाव येथे सर्वाधिक २५०, तर पेण येथे २२१.३ मिलिमीटर पाऊस पडला.

पनवेलमध्ये ९९.८ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे धरणातील पाण्यामध्ये वाढ होऊ लागली आहे. पावसाचा जोर वाढल्याने पुन्हा एकदा भात रोपे पुनर्लागवडीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. मागील काही दिवस या भागात भात लागवडी रखडलेल्या होत्या.

खानदेशातील नाशिक, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांत पावसाच्या कमीअधिक पाऊस होता. तर धुळे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांत ढगाळ वातावरणाची स्थिती कायम असली तरी तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला.

मराठवाड्यातील बहुतांश भागात पावसाचा शिडकावा झाला आहे. परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील काही ठिकाणी हलका पाऊस पडला.यामुळे कापूस, सोयाबीन, मूग, उडीद या पिकांना आधार मिळाला. मात्र, अनेक काही भागात अजूनही पाऊस नसल्याने पिके संकटात आली आहेत. त्यामुळे खरीप हंगाम वाया जातो की काय अशी स्थिती तयार झाली आहे.

घाटमाथ्यावरही मुसळधार

गेल्या दोन दिवसापासून घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला आहे. खोपोलीच्या घाटमाथ्यमावर सर्वाधिक २१५ मिलिमीटर पाऊस पडला. ताम्हिणी २१५, लोणावळा २०८ मिलिमीटर पाऊस पडला.

तर दावडी १८४, डुंगरवाडी १८०, शिरगाव १६८, शिरोटा १२२, वळवण १३८, आंबोणे १६०, भिवपुरी ११५, कोयना १३३, भिरा १३४, धारावी ११८ मिलिमीटर पाऊस पडला. ठाकूरवाडी, खांड या घाटमाथ्यावरही जोरदार पाऊस पडला. त्यामुळे नद्या, नाल्यातील कमी झालेला प्रवाह पुन्हा वाढल्याने पश्चिम महाराष्ट्रातील काही धरणांतील पाणी पातळीत वाढ झाली आहे.

अनेक ठिकाणी हजेरी

  • जळगाव, धुळे जिल्ह्यांत तुरळक पाऊस.

  • नांदेड जिल्ह्यात सर्वत्र पाऊस.

  • नागपूर परिसरात जोरदार पाऊस.

  • जालना जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी.

  • सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस.

  • सांगली जिल्ह्यात रिपरिप पाऊस.

  • परभणी, हिंगोली जिल्ह्यांत अधूनमधून रिमझिम पाऊस.

  • अकोला परिसरात रिमझिम पाऊस.

  • पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात तुरळक सरी, पूर्व भागात उघडिप.

  • सोलापूर जिल्ह्यात हलका पाऊस.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com