Maharashtra: दहावीच्या प्रज्ञाशोध परीक्षेची घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहावीच्या प्रज्ञाशोध परीक्षेची घोषणा

दहावीच्या प्रज्ञाशोध परीक्षेची घोषणा

पुणे : दहावीपासून ते पीएच.डी. पर्यंत देशभरातील दोन हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करणाऱ्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेची (एनटीएस) घोषणा करण्यात आली आहे. दहावीसाठीची राज्यस्तरीय परीक्षा १६ जानेवारीला आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरू शकतील अशा प्रज्ञावान विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी ही परीक्षा राबविण्यात येणार आहे. नवी दिल्लीतील राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने (एनसीईआरटी) देशभरात हे आयोजन करण्यात येत आहे. राज्यस्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर निवड चाचणी घेण्यात येते. राज्यस्तरीय परीक्षेसाठी शुल्क आकारण्यात येते. मात्र राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेसाठी कोणतेच शुल्क आकारण्यात येत नाही.

- परीक्षेसाठी पात्रता : इयत्ता दहावीचे विद्यार्थी, ओपन डिस्टन्स लर्निंगमधील १८ पेक्षा कमी वयोगटाचे विद्यार्थी

- शिष्यवृत्ती : देशभरातील दोन हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती. १२ वी पर्यंत दरमहा एक हजार २५०, तर पदव्युत्तर शिक्षणापर्यंत दरमहा दोन हजार शिष्यवृत्ती देण्यात येते. पीएच.डी.साठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार शिष्यवृत्ती.

- शुल्क : १५० रूपये (विलंब झाल्यास शुल्क वाढते) शाळा संलग्नता शुल्क प्रत्येकी २०० रुपये

महत्त्वाच्या तारखा :

- ऑनलाइन आवेदनपत्र भरणे : १६ ते ३० नोव्हेंबर

- विलंब शुल्कासह ऑनलाइन आवेदनपत्र : १३ डिसेंबर पर्यंत

- राज्यस्तरीय परीक्षा : १६ जानेवारी २०२२

- राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा : १२ जून २०२२

अधिक माहितीसाठी : https://www.mscepune.in/