विठूराया... शेतकरी कर्जमुक्त झाल्याशिवाय सुखी होणार नाही: मुख्यमंत्री फडणवीस

 Mahapooja of Shri Vitthal Rukmini at the hands of Chief Minister Devdendra Fadnavis
Mahapooja of Shri Vitthal Rukmini at the hands of Chief Minister Devdendra Fadnavis

पंढरपूर - विठूराया... राज्यातील शेतकरी कर्जमाफी नंतर कर्जमुक्ती झाल्याशिवाय सुखी होणार नाही. विठूराया तू वंचितांचा देव आहेस. राज्यातील शेतकरी आणि वंचितांना न्याय देण्यासाठी सामर्थ्य दे असे साकडे आपण आज (मंगळवार) श्री विठ्ठलाच्या चरणी घातले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्‍मिणीची महापूजा करताना मंदिराच्या बाहेर रांगेत उभा असलेल्या एका दांम्पत्यास वारकरी प्रतिनिधी म्हणून महापूजेमध्ये सहभागी होण्याचा मान दरवर्षी दिला जातो. यंदा हा मान बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्‍यातील बाळसमुद्र येथील परसराव मेरत व त्यांच्या पत्नी अनुसया मेरत यांना मिळाला. मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने पाद्यपूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिर समितीचे सभापती तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या हस्ते नित्यपूजा करण्यात आली. 

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पहाटे दोन वाजून पंधरा मिनिटांनी मंदिरात आगमन झाले. दोन वाजून वीस मिनिटांनी श्री विठ्ठलाकडील महापूजेला सुरुवात झाली. विठूरायाच्या मूर्तीवर दूध आणि दही स्नान घातल्यानंतर विठूरायाची स्वयंभू मूर्ती विलक्षण दिसत होती. त्यानंतर सावळ्या विठूरायाला पितांबर आणि पिवळ्या रंगाचा रेशमी काठ असलेली सुंदर नक्षीकाम केलेला अंगरखा घालण्यात आला. सोन्याचा टोप घालून नंतर तुळशीचे व लाल-पांढऱ्या फुलांचे आकर्षक हार घालण्यात आले. कपाळी गंध लावून त्यावर तुळशीचे पान लावण्यात आल्यावर राजस सुकुमाराचे रुप अधिकच खूलून दिसू लागले. उपस्थित अनेकांना मोबाईल मध्ये विठूरायाचे छायाचित्र काढण्याचा मोह अनावर झाला. आरती झाल्यानंतर सर्वांनी "पुंडलिक वरदे हरि विठ्ठल" असा जयघोष केला. श्री रुक्‍मिणीमातेची देखील परंपरेप्रमाणे पूजा करण्यात आली. 

शासकीय महापूजे नंतर मंदिरातील सभामंडपामध्ये मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले. तिथे मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने सत्कार समारंभ झाला. यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस व सौ.फडणवीस यांच्या हस्ते वारकरी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याचा मान मिळालेला मेरत दांम्पत्याचा श्री विठ्ठल रुक्‍मिणीची प्रतिमा व एस.टी चा एक वर्ष मोफत प्रवासाचा पास देऊन सत्कार करण्यात आला. 

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, मागील वर्षीच्या आषाढीच्या पूजेच्या वेळी दुष्काळाचे सावट दूर कर, भरभरुन पाऊस पडू दे, उत्तम पीक येऊ दे असे साकडे घातले होते. विठूरायाची कृपा झाली, राज्यात चांगला पाऊस झाला. उणे विकास दर असलेला आपला महाराष्ट्र अनेक वर्षानंतर पॉझिटिव्ह ग्रोथ मध्ये आला. तथापी अडचणीतील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आमच्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून कर्जमाफीचा निर्णय घेतला. आता शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचे बळ द्यावे अशी प्रार्थना विठ्ठलाच्या चरणी आज केली आहे. 

फडणवीस म्हणाले, काल कॅनडा शासनाचे ट्रेड कमीशनर आले होते. कॅनडाच्या फेडरेशनला दिडशे वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने कॅनडा भारत सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला पंढरपूर विकासासाठी निधीसह सर्वती मदत करु अशी मनिषा त्यांनी बोलून दाखवली आहे. विठूरायाचा महिमा मोठा असल्यामुळेच त्यांच्याकडून हा प्रस्ताव आला आहे. त्यांच्या माध्यमातून चंद्रभागा शुध्दीकरणासह येथील इनफ्रास्टक्‍टसह सह विकास कामे करण्याचा प्रयत्न केला जाईल असे त्यांनी यावेळी बोलताना नमूद केले. 

फडणवीस पुढे म्हणाले, मंदिर समितीच्या कायद्यानुसार मंदिर समितीवर अतुल बडवे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे. त्या संदर्भात वारकऱ्यांचे आक्षेप आहेत. परंतु या समितीच्या सर्व सदस्यांची अजून नियुक्ती झालेली नाही. वारकरी मंडळींशी चर्चा करुन मंदिर समितीमधील उर्वरीत सदस्यांची नियुक्ती केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. 

मंदिर समितीच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ.भोसले व सौ.भोसले यांच्या हस्ते फडणवीस आणि मेरत दांम्पत्याचे तसेच उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. विठूरायापुढे अभंगवाणी कार्यक्रम सादर करण्यासाठी आलेल्या अनुराधा पौंडवाल व पंडीत आनंद भाटे यांचेही सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. 

पंढरपूर अर्बन बॅंकेचे संचालक एस.पी.कुलकर्णी यांनी सूत्रसंचलन केले तर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.विजय देशमुख यांनी आभार मानले. 

यावेळी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, गृहराज्य मंत्री दिपक केसरकर, जलसंधारण मंत्री राम शिंदे, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे नूतन अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांच्यासह सर्व नूतन सदस्य, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे सभापती डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा पोलिस अधिक्षक विरेश प्रभू, सहायक पोलिस अधिक्षक निखील पिंगळे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, प्रांताधिकारी तथा कार्यकारी अधिकारी डॉ.विजय देशमुख उपस्थित होते. 

दरवर्षी पेक्षा शासकीय महापूजेच्यावेळी मंदिरात राजकीय कार्यकर्त्यांची गर्दी अधिक झाली होती. या गर्दीमुळे उपस्थित अनेक मंत्र्यांना देखील प्रवेशव्दारावरुन मंदिरात लवकर प्रवेश मिळाला नाही. 

बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्याला मान
यंदा पूजेचा मान बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्‍यातील बाळसमुद्र येथील परतराव मेरत व त्यांच्या पत्नी अनुसया यांना मिळाला. गरीब शेतकरी कुटुंबातील हे वारकरी दांम्पत्य गेल्या दहा वर्षांपासून पंढरीच्या वारीला येत आहे. गेल्या तीन वर्षापासून संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्या सोबत चालत ते पंढरपूरच्या वारीला येत आहेत.आज महापूजेला उपस्थित राहण्याचा मान मिळाल्याने अत्यानंद झाला. राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे अशी प्रार्थना केल्याचे मेरत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com