Maharashtra Politics LIVE: शिवसेनेत उभी फूट; शिंदे ठाकरे वाद शिगेला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde and Uddhav Thackeray

Maharashtra Politics : शिवसेनेत उभी फूट; शिंदे ठाकरे वाद शिगेला

शिवसेना नगरसेवक प्रसाद सावंत यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केला आहे. दुपारच्या दरम्यान १५ ते २० अज्ञात गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला असून या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. ते माथेरानचे शिवसेनेचे नगरसेवक होते.

ठाणे शिवसेना जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांचा राजीनामा, ते ठाण्याचे माजी महापौर आहेत.

 • शिवसैनिकांनी केली श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाची केली तोडफोड

 • मंगेश कुडाळकर याच्या कार्यालायची तोडफोड शिवसैनिकांकडून करण्यात आली आहे.

शिवसेनेत फूट- शिंदे समर्थकांचे शक्तिप्रदर्शनतर शिवसैनिकांची तोडफोड

 • काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा मुख्यमंत्र्यांना फोन

 • एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर राजकीय परिस्थितीबाबत केली चर्चा

 • काँग्रेस शिवसेनेच्या पाठीशी असल्याची भूमिका

प्रिय शिवसैनिकांनो, नीट समजून घ्या, म.वि.आ. चा खेळ ओळखा..! MVA च्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिता करीता समर्पित...असं ट्वीट एकनाथ शिंदे यांंनी केलं आहे.

शिवसेनेतून घाण निघून गेली - आदित्य ठाकरे

एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडानंतर आदित्य ठाकरे यांनी गेलेल्या आमदारांवर निशाणा साधला आहे. शिवसेनेतून घाण निघून गेली असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मेळाव्यात ते बोलत होते.

गिवाहटीमधील असलेल्या रेडिसन्स ब्लू हॉटेलमधील बुकिंग वाढवण्यात आलं आहे. ३० जून पर्यंत आमदारांचा मुक्काम त्याच हॉटेलमध्ये असणार असल्याची माहिती आहे. कायदेशीर विचारविनियम होईपर्यंत आमदार त्याच हॉटेलमध्ये राहणार आहेत.

एकनाथ शिंदे यांनी जळगाव जिल्ह्यातील पारोळा मतदारसंघाचे आमदार श्री.चिमणराव आबासाहेब पाटील यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

पोस्टर फाडणाऱ्याला सोडणार नाही असा इशारा कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला आहे. आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आम्ही बेईमानी केली नाही अजून शिवसेना सोडली नाही आणि मी कमजोरपण नाही, तुला सोडणार नाही असा इशारा क्षीरसागर यांनी दिला आहे.

येत्या २४ तासांत बंडखोरांचे मंत्रीपद जाणार असल्याचा इशारा शिवसेनेचे संजय राऊत यांनी दिला आहे.

काल विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाल्याची माहिती समोर येत आहे.

एकनाथ शिंदे यांनाही भाजपने ईडीची धमकी दाखवली आहे. त्याचबरोबर यातील अनेक आमदारांच्या ईडी फाईल दोन दिवसांत क्लिअर केल्या गेल्या आहेत. ज्यावेळी उद्धव ठाकरे आजारी होते त्यावेळचा यांनी फायदा उचलला आहे असं राऊत म्हणाले आहेत.

सर्व बंडखोर आमदारांनी परत यावे; दिपाली सय्यद यांची मागणी

संदिपान भुमरे यांनी फक्त हिंदुत्व असं लिहून दाखवावं- राऊत

राऊत म्हणाले...

 • संदिपान भुमरे हे साखर कारखान्यावर वॉचमन म्हणून काम करत होते. त्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी फक्त हिंदुत्व असं लिहून दाखवावं.

 • एकनाथ शिंदे यांनाही भाजपने ईडीची धमकी दाखवली आहे. त्याचबरोबर यातील अनेक आमदारांच्या ईडी फाईल दोन दिवसांत क्लिअर केल्या गेल्या आहेत. ज्यावेळी उद्धव ठाकरे आजारी होते त्यावेळचा यांनी फायदा उचलला आहे.

 • ईडीच्या नोटीसा आम्हालापण येतात पण आम्ही हललो नाही, त्यासाठी आम्ही तुरूंगात जायला तयार आहोत. त्यांचं शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं आहे. आत्ता रस्त्यावर जे उतरतात ते खरे शिवसैनिक.

 • उद्धव ठाकरे हे आजारी असल्यामुळे ते आमदारांना भेटू शकले नाही.

 • मी मंत्रालयात फक्त तीन वेळा गेलो आणि विधानभवनातही फक्त तीन वेळा गेलो.

 • संजय शिरसाठ यांना लिहिता येत नाही, ते पत्र त्यांना परत समोर बसून लिहायला लावा.

 • अडीच वर्षे तुम्हा मलिदा खाल्ला, तुम्ही ते भोगलं आम्ही तुम्हाला मंत्रीपदं दिली आणि आता बंड करताय, बेईमानी कोणीही करू शकतं, कुत्रा सोडला तर सगळे बेईमानी करू शकतात.

 • एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे. त्यावेळी भाजपने शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ दिला नाही. शिंदेंनी रामलीली बंद करून सांगावं की मला मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून.

 • शिवसेनेतून ज्याने बंड केलंय ते निवडून आले नाही, आणि त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. त्यांनी सरळ सांगावं की आम्ही भाजपात सामील होतोय म्हणून.

 • शिंदे यांच्यासोबतही आमचा संपर्क आहे, त्यांना आज मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली तर ते टनाटना उड्या मारत येतील, पण ते गेल्याचं दु:ख झालं. ज्यांचा जन्म शिवसेनेत झाला ते गेल्याचं दु:ख झालं. ते आमचे सहकारी होते, मित्र होते.

 • यावर आपण बसून विचार करू तुम्ही या, तुमचं आम्ही ऐकतो पण तुम्ही या असं मी शिंदेंना बोललो पण त्यांनी ऐकलं नाही. आणि आमदारांना बळजबरी बसवून नेलं.

 • शिवसेनेकडून २०१९ मध्ये शिंदे मुख्यमंत्री झाले असते पण ते मुख्यमंत्री न होण्यास भाजप जबाबदार आहेत.

 • या लोकांनी आत्ता गुवाहटी पाहिलंय पण मी खूप दिवसांपासून जातोय, त्या हॉटेलच्या बाजूला झाडं, डोंगरं नाहीतंच, तिथे सिमेंटचं जंगल आहे.

 • तेथील अनेक आमदारांचं शरीर तिथे आणि मन आमच्याकडे आहे. ते वेळ आल्यावर आमच्याकडेच येणार आहेत, तुम्ही कितीही भिंती आडव्या घाला ते उड्या मारून आमच्याकडे येतील.

 • शरद पवार हे अनुभवी नेते आहेत ते थकलेले नाहीत, राजकारण हे त्यांची उर्जा आहे. तिनही पक्षांना हे सरकार टिकवायचं आहे. मग शरद पवारांनी सूत्र हाती घेतलं तर काय हरकत आहे.

 • सरकार टिकवण्यासाठी कायदेशीर लढाई आहे. त्यासाठी सगळी टीम काम करत आहे. नवीन सरकार स्थापन होणार नाही. कारण महाविकास आघाडी अजून एकत्र आहे.

 • बंडखोरांच्या चहातून आणि जेवनातून त्यांना गांजा दिला जातोय, त्यांनी काय बोलायचं ते ते ठरवत नाहीत त्यांना भाजपकडून स्क्रिप्ट दिलं जातंय.

 • मी कधी शिवराळ भाषा वापरत नाहीत.

 • यांनी सत्तेचा फायदा घेतला आणि आता बंड केले.

 • दीड दोन वर्षे महाराष्ट्र कोरोनाशी झुंजत होता, त्यावेळीही मुख्यमंत्र्यांचं सगळ्या कामावर लक्ष होतं. महाराष्ट्रातल्या सगळ्या शेती, पर्यटन आणि सर्व क्षेत्रातील काम आपण पाहू शकतात.

 • समृद्धीचं सगळं काम, आणि नगरविकास खातं शिंदे यांच्याकडे होतं हे कुणी विचारत नाहीत.

 • सगळे गेले तरी आम्ही पाचच राहू पण या पाचमधून पुढं कसं जायचं कसं ते आम्हाला माहितीये.

 • १२ आमदारांच्या निलंबनावर कारवाई सुरू झाली आहे. त्यांच्या निलंबनावरही आमचं बहुमत सिद्ध होणार आहे.

 • ज्यांना जायचंय ते जाऊ शकतात, त्यांना काय डांबून ठेवायचंय, त्यांना स्वातंत्र्य आहे.

 • गेल्या चार दिवसापासून उद्धव ठाकरे कोरोनाने बेजार आहेत, हे सरकार टिकवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत.

 • आमदार गेले म्हणजे पक्ष संपत नसतो.

 • सगळी पद काही लोकांनी आपल्या हातात ठेवली आणि पळून गेले.

 • भाजपने बंडखोरी करून ३७ आमदार पाडले, त्यांनी त्यांचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून आमच्या खूप जागा पाडल्या.

 • राज्यसभेत मला पाडण्याचा यांचा प्रयत्न होता, काही लोकांनी मला आतापण सांगितलं की आम्हाला तुम्हाला पाडायचं होतं म्हणून, आमचे संजय पवार यांच्यामुळे पडले. त्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे प्रयत्न केले आहेत. ही भाजपाची खेळी होती, त्यांनी सुहास कांदे यांचं ठरवून एक मत बाद केलं. नाहीतर संजय पवार निवडून आले असते.

 • बंडखोरांना आता कारवाईला सुरूवात झाली आहे, त्यांनी यायला हवं होतं त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले पण त्यांच्यासाठी परतीचे दार बंद झाले आहे.

 • पळून गेलेले आमदार हे आयाराम गयाराम, ही शिवसेना ठाकरेंचीच आहे.

 • गुवाहटीतील २१ आमदारांशी संपर्क आहे, त्यांना पण माहितीये.

 • निर्णय घेणे आता शिंदे यांच्याही हातात राहीलं नाहीये.

 • अशी बंडखोरी होणार अशी कुणकुण होती. पण राजकारणात गमवाचं काय असतं सत्ताच ना?

 • तुम्ही या पक्षाच्या चिन्हावर निवडून आला आहात तर राजीनामे द्या आणि परत निवडून या.

 • हे राजकीय नाट्य मागच्या सत्तानाट्याचं रेकॉर्ड मोडेल.

रश्मी ठाकरे मैदानात

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे मैदानात उतरल्या आहेत. तर बंडखोर आमदारांच्या पत्नींना भावनिक आवाहन करत आहेत.

एकनाथ शिंदे यांचा काल रात्री गुजरात दौरा?

एकनाथ शिंदे यांनी काल रात्री गुजरातचा दौरा केला असल्याचं सांगितलं जातंय पण याविषयी अधिकृत माहिती समोर आली नाही.

एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचं ठाण्यात शक्तीप्रदर्शन 

एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या समर्थनार्थ त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यात शक्तीप्रदर्शन केलं आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

बंडखोर आमदार दीपक केसरकर म्हणाले...

आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो नाहीत, आम्ही शिवसेनेचाच भाग आहोत पण आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे नेत आहोत असं शिवसेनेचे गुवाहटीतील बंडखोर आमदार दीपक केसरकर म्हणाले आहेत. ते शिंदे गटाकडून आयोजित केलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली आहे.

स्वतःच्या बापाच्या नावाने मतं मागा - उद्धव ठाकरे

राज्यात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून बंडखोर आमदारांच्या कार्यालयावर हल्ले देखील केले जात आहेत. दरम्यान आज शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक शिवसेना भवन येथे पार पडली या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोरांवर जोरदार हल्ला चढवला. स्वत: च्या बापाच्या नावानं मतं मागा, सेनेच्या बापाच्या नावे मागू नका, आधी नाथ होते आता दास झाले, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांचा बापच काढला.

हेही वाचा: Maharashtra Politics : सेना भवनात उद्धव ठाकरेंनी थेट बापच काढला

गुवाहाटीला जाणाऱ्या मंत्र्यांचे मंत्रीपद धोक्यात; संजय राऊतांचे संकेत

गुवाहाटीला जाणाऱ्या मंत्र्यांचं मंत्रीपद आता धोक्यात आलं असून ते जाण्याचीही शक्यता आहे. संजय राऊत यांनी याबद्दलचे संकेत दिले आहेत. याबद्दल आज संध्याकाळपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे. शिवसेनेत पदावर कोण राहतं, मंत्रीपदावर कोण राहील हे आज संध्याकाळपर्यंत कळेल. याबाबत कारवाई करण्याचे अधिकार उद्धव ठाकरेंना आहेत, असं सूचक विधान संजय राऊतांनी केलं आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात अधिक आक्रमक झाली असून शिवसेनेचं निवडणूक आयोगाला पत्र दिलं आहे. शिवसेना किंवा बाळासाहेब ठाकरेंचं नाव कुणालाही वापरू देऊ नये, अशी ताकीद यातून देण्यात आली आहे. शिंदे गट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना नाव घेण्याच्या विचारात होती.

पुणे, ठाणे, औरंगाबाद, मुंबई अशा सर्वच ठिकाणी आता शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहेत. यामुळे आता पोलीस हाय अलर्टवर आहेत. मुंबईमध्ये कलम १४४ अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तर विविध ठिकाणी बंडखोर आमदारांचे पुतळे जाळले जात आहेत, त्यांच्या फोटोला काळं फासलं जात आहे.

विधानसभा उपाध्यक्ष यांच्या विरोधात शिंदे गटाने जो अविश्वास ठरव दाखल केला होता. त्या ठरावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तो प्रस्ताव वैध की अवैध हा प्रश्न तसेच प्रस्ताव पाठवताना योग्य प्रक्रिया पार पाडली की नाही हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शिवसेनेच्या कार्यकारिणीत पहिला ठराव पारीत करण्या आला आहे. शिवसेना कार्यकारिणीची बैठक सुरु असून निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेना प्रमुख हे उद्धव ठाकरे राहणार आहेत. बाळासाहेब ठाकेर आणि शिवसेना हे नाव कोणालाही वापरता येणार नाही. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या गटाला धक्का बसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंना हे नाव वापरता येणार नाही, असं स्पष्ट झालं आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार गुवाहटी येथे आहेत. दरम्यान, आता यातील बंडोखोर 16 आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. झिरवाळ यांना विधानसभा उपाध्यक्षावरून दूर करण्याचा प्रयत्न होत आहे.

10 जुलैपर्यंत मुंबईत जमावबंदीचे आदेश

10 जुलैपर्यंत मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जमावबंदीचे कलम 144 लागू करण्याचे आदेश आले आहेत. त्यामुळं जमाव किंवा गर्दी करता येणार नाही. 10 जुलैपर्यंत मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

शिवसैनिक सध्या बंडखोर आमदारांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. ही सगळी परिस्थिती पाहता आता मुंबई पोलिसांनी खबरदारीची पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. मुंबईत आता कलम १४४ लागू करण्यात आलं असून जमावबंदी लावण्यात आली आहे.

Letter Mumbai

Letter Mumbai

माझ्या पक्षाचे कार्यकर्ते एकनाथ शिंदेंच्या पाठिशी- रामदास आठवले

शिवसैनिकांची दादागिरी खपवून घेणारी नाही. शिंदेंना काही झालं तर माझ्या पक्षाचे कार्यकर्ते एकनाथ शिंदेच्या पाठिशी आहेत, असं वक्तव्य करत बंडखोर एकनाथ शिंदेंच्या भूमिकेला रामदास आठवले यांनी समर्थन दर्शवलं आहे. त्यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर ही माहिती दिली आहे.

हेही वाचा: माझ्या पक्षाचे कार्यकर्ते एकनाथ शिंदेच्या पाठिशी- रामदास आठवले

आसाम शिवसेना प्रमुख राम नारायण सिंग यांनी हॅाटेल रेडिसन बाहेर येऊन येताना एकनाथ शिंदे यांनी परत येण्याची मागणी केली. शिवसेना तुटू नये म्हणून राम नारायण सिंग इथे आलेत, असंही सांगण्यात येत आहे. त्यांना आता आसाम पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

बाळासाहेब थोरात, अस्लम शेख, वर्षा गायकडवाड, अशोक चव्हाण, नसिम खान यांच्यात बैठक सुरू आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या गटात सातत्याने बैठका सुरू आहेत.

बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना मारण्याची धमकी देताय?; राणा राऊतांवर बरसल्या

संजय राऊत म्हणाले होते की, सुरक्षा महाराष्ट्रातच सोडून ढुंगणाला पाय लावून पळालेल्यांना आम्ही संरक्षण देणार नाही. आमदारांना संरक्षण असतं, त्यांच्या कुटुंबियांना नसतं. यावरुनच आता टीकेची राळ उठली आहे. आज संजय राऊत खासदार असताना, जबाबदार व्यक्ती असताना म्हणतायत की आमदारांना संरक्षण आहे, त्यांच्या कुटुंबियांना नाही. म्हणजे तुमच्या म्हणण्याचा अर्थ काय आहे संजय राऊतजी? की आपण त्यांच्या परिवारांना मारताय , परत नाही आला त्यांच्या परिवाराला मारण्याची सरळसरळ धमकी तुम्ही देताय", अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार नवनीत राणांनी दिली आहे.

हेही वाचा: बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना मारण्याची धमकी देताय?; राणा राऊतांवर बरसल्या

शिंदे गटाचं नाव ठरलं, अस्तित्वाची लढाई कायम

एकनाथ शिंदे यांचा गट वारंवार खरी शिवसेना आमची असल्याचं म्हणत आहे. उद्धव ठाकरे सरकारमध्ये गेल्यानंतर त्यांनी हिंदुत्वाच्या विचारांशी तडजोड केली. यानंतर खरी शिवसेना कोणाची, असा प्रश्न उपस्थित होतो. आज संध्याकाळी 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे', असं या नव्या गटाचं नाव असणार आहे. पक्ष कोणाचा ही लढाई यामुळे होणार असं स्पष्ट झालं आहे.

बंडखोर आमदारांच्या कुटुंबांना संरक्षण देण्याचे आदेश गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिले आहेत. राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री वा गृहविभागाने दिलेले नाहीत. या संदर्भात ट्विटरद्वारे केले जाणारे आरोप पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहेत, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काही वेळापूर्वीच स्पष्ट केलं आहे.

शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. आज संध्याकाळी त्यांची पत्रकार परिषद होणार आहे.

एकनाथ शिंदेंनी आमदार महेश शिंदे यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये आक्रमक भूमिका घेण्यामागचं कारण सांगण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातल्या आमदारांसाठी आसामच्या मंत्र्यांचा जागता पहारा

- गुवाहाटी येथील हॅाटेल रेडीसन ब्लू हॅाटेलमध्ये आसामच्या दोन मंत्र्यांचा जागता पाहारा

- हॅाटेल रेडीसन ब्लूमध्ये दिवसा आसाम सरकारचे मंत्री अशोक सिंगल यांचा पहारा

- रात्री आसामचे मंत्री पयुश हजारीका हॅाटेल रेडीसन ब्लू राहतात

- याच हॅाटेलमध्ये शिवसेनेचे बंडखोर आमदार राहतात

- आसाम सरकारचे दोन्ही मंत्री गुवाहाटी येथे शिवसेनेच्या आमदारांच्या देखरेखीसाठी तैना

राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री वा गृहविभागाने दिलेले नाहीत. या संदर्भात ट्विटरद्वारे केले जाणारे आरोप पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहेत, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

पुण्यात शिवसैनिकांचा राडा

एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिदे यांच्या तर्फे उभारण्यात आलेल्या वैद्यकीय मदत कक्षाच्या बोर्डाला काळे फासले

एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या फोटोला काळे फासले

पुण्यातील सदाशिव पेठेत असणारे हे कार्यालय शिवसैनिकांनी फोडले.

तसंच बंडखोर आमदार तानाजी सावंत यांचं पुण्यातलं कार्यालयही त्यांनी फोडलं आहे.

फडणवीस... या झमेल्यात फसू नका!

देवेंद्र फडणवीस राज्यातील धुरंधर राजकीय नेते आहेत. मात्र त्यांना एक मोलाचा सल्ला देतो. या झमेल्यात फसू नका. नाहीत पुन्हा पहाटेच्या शपथविधीसारखी परिस्थिती होईल. सुबह का भूला, शाम को घर आ जाएगा! असं झाल्यास फडणवीसांची उरली सुरली प्रतिष्ठाही मातीस मिळेल, असा टोला राऊतांनी लगावला आहे.

राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. यासंदर्भात त्यांनी लिस्ट शेअर करत ट्वीट केलं आहे.

शिंदे गट मविआचा पाठिंबा काढणार? राज्यपालांना देणार पत्र

आज शिंदे गटाकडून महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढण्याची शक्यता आहे. तसं पत्र राज्यपालांना देणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिंदे गटाकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.

बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात सेनेकडून सुरुंग

एकनाथ शिंदेंच्या बंडाला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. आता आवाहन नाही. तर आव्हान, देण्याचं सेनेने ठरवलंय. १६ आमदारांच्या निलंबनावर पक्षप्रमुख ठाम आहेत. जिल्हाप्रमुख आणि अन्य नेत्यांसोबत बैठकी सुरू आहेत. नव्याने जबाबदाऱ्यांचं वाटप होणार आहे. तसेच बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात सेनेचे मेळावे होणार असल्याचं समजतंय. आदित्य ठाकरेंकडे या सगळ्याची कमान सोपवण्यात आलीय.

१० तास मुंबईबाहेर असलेले फडणवीस परतले!

देवेंद्र फडणवीस मुंबईबाहेरच होते. भाजपाच्या गोटात आता हालचालींना वेग आला आहे. आज भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडणार आहे. त्यामध्ये महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: देवेंद्र फडणवीस 10 तास मुंबईबाहेर; तर शिंदे गटात सत्ता स्थापनेसाठी हालचाली

बंडखोर आमदारांची बैठक; प्रवक्त्यांची नियुक्ती करणार

आज पुन्हा होणार बंडखोर आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील रणनितीवर होणार चर्चा. अजय चौधरी यांना गटनेता म्हणून सऱ्ह्या देणाऱ्या सात आमदारांनी माघार घेतली, ते शिंदे गटात सहभागी झाले आहेत. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा गट प्रवक्त्यांची नियुक्त करणार असून लवकरंच प्रवक्त्यांची नावं जाहीर करणार आहेत. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या गटाकडून प्रवक्तेच माध्यमांसमोर भूमिका मांडणार आहेत.

एकनाथ शिंदेंसह शिवसेना आमदारांच्या बंडाचा आजचा पाचवा दिवस आहे. आता शिवसेना सावध झाली असून मित्रपक्षांच्या गाठीभेटींना उधाण आलं आहे. शरद पवार यांची संज राऊतांनी भेट घेतली. त्यानंतर शरद पवारांचीही या प्रकरणात एन्ट्री झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, शिवसेना आता आमदारांविरोधात आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. या आमदारांवर कारवाई करण्याची सेनेची मागणी जोर धरु लागली आहे. १६ आमदारांच्या निलंबनाची मागणी केली जात आहे. (Maharashtra Politics Live Updates)

Web Title: Maharashtra Political Crisis Live Updates Eknath Shinde Uddhav Thackeray Sharad Pawar Shivsena

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..