राणेंनी सरकार पाडण्यासाठी काँग्रेसला फोडलं, बाळासाहेब म्हणाले... | Maharashtra Political Crisis Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

balasaheb thakre narayan rane

राणेंनी सरकार पाडण्यासाठी काँग्रेसला फोडलं, बाळासाहेब म्हणाले...

सध्या राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. त्यांच्यासोबत गुवाहाटी येथे जवळपास ५० आमदार हे बंडात सामील झालेले आहेत. शिवसेनेने गोड बोलून प्रसंगी सज्जड दम देऊन या आमदारांना परत आणण्याचा प्रयत्न केला तरी तो यशस्वी झालेला नाही. या बंडाला भारतीय जनता पक्षाची फूस असल्याचं देखील सांगितलं जात आहे. उद्या होणाऱ्या अविश्वास ठरावात उद्धव ठाकरे सरकारचं भविष्य ठरणार आहे.(maharashtra political crisis update)

अविश्वास ठरावाच्या अग्निपरीक्षेला सामोरे जाणारे उद्धव ठाकरे हे पहिले मुख्यमंत्री नाहीत. असाच प्रसंग विलासराव देशमुखांवर देखील ओढवला होता. साल होतं २००२. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं आघाडी सरकार सत्तेमध्ये होतं. शिवसेना भाजप युतीच्या नारायण राणे सरकारला धूळ चारून विलासराव देशमुख मुख्यमंत्री बनले होते. मात्र त्यांच्या कडे काठावरचं बहुमत होतं. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधल्या अनेक गटांना सांभाळून घेत त्यांनी सरकार चालवलं होतं. विरोधी पक्षनेते असलेले नारायण राणे मात्र त्यांच्या विरोधात प्रचंड आक्रमक होते. काहीही करून हे सरकार पाडायचं यासाठी साम दाम दंड भेद वापरून त्यांनी प्रयत्न चालवले होते.

अशातच आघाडीमध्ये असलेल्या शेकापच्या आमदारांनी विलासराव देशमुख सरकारचा पाठिंबा काढून घेतला. नारायण राणेंना हि सुवर्णसंधी दिसली.त्यांनी शालीनीताई यांच्यासह राष्ट्रवादीचे आठ ते दहा आमदार फोडले. एवढंच नाही तर काँग्रेसचे आमदार असणाऱ्या पद्माकर वळवी यांना देखील फोडण्यात आलं होतं. अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादी व कॉंग्रेसमधून फुटलेल्या आमदारांनी विलासराव देशमुख सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचं पत्र राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर यांना दिलं.

राज्यात घडामोडीना वेग आला. विधानसभेत जेव्हा अविश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला तेव्हा काँग्रेसच्या फुटलेल्या आमदाराने पुन्हा विलासरावांनाच मत दिलं, शेकापचे आमदार देखील गैरहजर राहिले. राणेंना काँग्रेसचे आणखी आमदार फोडता आले नाहीत. विलासरावांचं सरकार चक्क १ मताने वाचलं. नारायण राणेंची योजना पूर्णपणे फसली.

दुसऱ्याच दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते स्पष्टपणे म्हणाले, 'सत्तेशिवाय आपली घुसमट होते, असं काही नाही. या सरकार पाडण्याच्या मोहिमेला आपला पाठिंबा नाही. आपल्याच पक्षाचे विरोधी पक्षनेते असणाऱ्या नारायण राणे यांच्या पक्षफोडीच्या मोहिमेवर त्यांनी टीका केल्याचं दिसून आलं. शिवसेना सत्तेसाठी तत्वांशी तडजोड करणार नाही हे त्यांनी त्या दिवशी स्पष्ट केलं होतं.

Web Title: Maharashtra Political Crisis Update Balasaheb Thackeray Was Against Narayan Ranes Mission For Removing Vilasraa Deshmukh Government

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..