सत्तांतरानंतर ‘समृद्धी’चे काम सुस्साट, जमीन मोजणीचे विषय लागणार मार्गी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Samruddhi Mahamarg

सत्तांतरानंतर ‘समृद्धी’चे काम सुस्साट, जमीन मोजणीचे विषय लागणार मार्गी

नाशिक : राज्यातील सत्तांतरानंतर नागपूर- मुंबई समृध्दी द्रुतगती महामार्गाच्या कामाला वेग आला आहे. सिन्नर व इगतपुरी अशा दोन तालुक्यातून जाणाऱ्या या महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी यंत्रणा पुन्हा जोमाने कामाला लागली आहे. राज्यात सत्तांतरानंतर नागपूर- मुंबई समृध्दी महामार्गाच्या कामाला पुन्हा गती आली. सिन्नर व इगतपुरी अशा दोन तालुक्यातून जाणाऱ्या या महामार्गाचे काम सिन्नर तालुक्यात गतीने सुरू आहे. इगतपुरी तालुक्यात भुयारी बोगद्यासह महत्त्वाची कामे झाली आहे. मात्र त्यानंतरही तालुक्यातील काही गावात भूसंपादनाच्या अनुषंगाने काही विषय मार्गी लागलेले नसल्याने सत्तर टक्केच्या आसपास काम पूर्णत्वास आले आहे. राहिलेले काम पूर्णत्वास नेण्यासाठी सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पुन्हा एकदा राहिलेल्या कामाला गती दिली जात आहे.

जिल्ह्यात पाथरे (ता.सिन्नर) ते सोनारी (पॅकेज एक), सोनारी ते तारांगण पाडा (पॅकेज दोन), तसेच तारांगण पाडा ते बोरली (पॅकेज तीन) अशा तीन पॅकेजमध्ये कामकाज चालते. पहिल्या टप्प्यातील पॅकेजचे पाथरे ते सोनारी दरम्यान बहुतांश काम पूर्णत्वास आले आहे. तर उर्वरित दोन्ही पॅकेजमध्ये तुलनेने कामाची गती कमी असल्याने त्यातील ठेकेदार, प्रशासन आणि इतर यंत्रणांना येणाऱ्या अडचणीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी गंगाथरण डी., महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (नवनगरे)चे प्रशासक विठ्ठल सोनवणे, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, अर्चना पठारे यांच्यासह तहसीलदार, पोलिस आधिकारी, भुमी अभिलेख तसेच ॲपकॉन, व्हीव्हीपीआर, बीएफसीपीआयएल या कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले. त्यात ठेकेदारांनी त्यांना येणाऱ्या अडचणी मांडल्या.

१६-१ भुयारात रोषणाई स्प्रिंकल

घाट परिसरात सुमारे पावणेआठ किलोमीटरचा भुयारी मार्ग आहे. या मार्गाचे खोदकाम पूर्ण झाले असले तरी, त्यातील स्प्रिंकल, आग प्रतिबंधक यंत्रणा, रस्त्यांची कामे तसेच भुयारी मार्गातील वीज व्यवस्था आणि रोषणाईची काम अद्याप बाकी आहे. कामाची गती संथ असलेल्या सिन्नर तालुक्यात अनेक गावात ठेकेदारांनी काम करू दिली जात नसल्याच्या तक्रारी मांडल्या. इगतपुरी तालुक्यात संततधार पावसामुळे अनेक भागात काम करण्यात अडचणी आल्याचे सांगण्यात आले.

- पाथरे ते सोनारी दरम्यान ९६ टक्के काम

- सोनारी ते तारांगण पाडा ६६ टक्के काम

- तारांगण पाडा ते बोरली ६३ टक्के काम

- पावने आठ कि.मी. भुयारात रोषणाई बाकी

- काही भागात संरक्षक भिंतीवरून मतभेद

पॅकेज तेरा मध्ये कामाचा वेग जरा संथ वाटला. तर काही भागात शेतकऱ्यांच्या भूसंपादनाच्या मोजणीचे विषय आहे. त्यात लक्ष घालून कुणाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल. तर काही विषय संबधित ठेकेदारांच्या प्रशासकीय स्वरुपाचे आहे. तेही मार्गी लावण्याचे निर्देश दिले.

- गंगाथरण डी (जिल्हाधिकारी नाशिक)