Rain Update : राज्यात दिवसभरात काय होती पावसाची स्थिती, जाणून घ्या

Rain
RainSakal
  • मुंबई, ठाणे तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेत, पूरग्रस्त नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवावे तसेच त्यांच्या राहण्याची, जेवण्याची सोय करण्याचे निर्देश यासमयी संबंधित यंत्रणांना दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत दिली आहे.

  • यासोबतच विविध प्रशासकीय यंत्रणांसोबत समन्वय राखण्यासाठी एक विशेष अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचे निर्देश दिले. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी जागोजागी टीम तैनात करण्याचे निर्देश या बैठकीत दिले असल्याचे सांगण्यात आले.

राज्यात येत्या ४, ५ दिवस मॉन्सून सर्वाधिक सक्रिय राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भ, मराठवाड्यातही काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पाचव्या दिवशी कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात जोरदार पाऊस होईल असे देखील हवामान विभागाने सांगितले आहे.

विदर्भात जोरदार पावसाची शक्यता, बगाजी सागर धरणाचे ७ दरवाजे उघडले. अमरावती आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या लोवर वर्धा प्रकल्पाच्या बगाजी सागर धरणात सद्या ७१.९६ टक्के जलसाठा आहे. या धरणाचे ७ दरवाजे उघडण्यात आले आहेत.

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर , महाड, माणगाव, पनवेल , पेण , मुरुड तालुक्यातील रहिवाशांचे स्थलांतरण केले आहे. रायगड जिल्ह्यातील 26 गावातील रहिवाशांचे स्थलांतरण केले आहे. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

संतताधर पावसामुळे खडकवासला प्रकल्पातील धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली. तीन महिने पुरेल इतका पाणीसाठा झालाच्याचे सांगण्यात आलं आहे.

मुंबईत चुनाभट्टी भागात दरड कोसळली, घरांचं नुकसान, 3 जखमी

मुंबई | मुसळधार पावसात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी वाढली, कला नगर परिसरातील दृश्य

हवामान विभागाने वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात राज्यातील समुद्री किनारी असलेल्या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता. एक टीम पालघर, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज ते रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. याच पार्श्वभूमीवर एन डी आर एफ च्या १७ तुकड्या तैनात केल्या गेल्या आहेत.

यातील ५ टीम मुंबईत, २ टीम प्रत्येकी कोल्हापूर, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड मध्ये दाखल झाले आहेत. अशी माहिती श्रीवास्तव यांनी दिली आहे.

मुंबईच्या समुद्रात दुपारी ४ वाजून ४९ मिनिटांनी मोठी भरती येणार आहे. यात ३.२७ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबईत सकाळपासून पावसानं दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे दुपारपर्यंत पाऊस कायम राहिल्यास सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे सरकलेला मॉन्सूनचा आस, अरबी समुद्रावरून वाहणारे जोरदार प्रवाह यामुळे पुण्यासह राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. पुणे शहरात मंगळवारी रात्रभरात सरासरी २० मिलीमीटर पाऊस पडला, तर चिंचवड परीसरात तब्बल ५४.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मॉन्सून दाखल झाल्यानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे. बुधवारी (ता.६) पहाटे तीन वाजता हवामान खात्याने घेतलेल्या नोंदीवरून हे स्पष्ट झाले आहे.

बुधवारी दिवसभरही शहर व परिसरात पावसाचा जोर कायम राहील, तर निवडक ठिकाणी संततधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मॉन्सूनने आता संपुर्ण देश व्यापला असून, महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर तो सक्रिय झाला आहे. कोल्हापूर, सांगली भागात अतिवृष्टी झाली असून, उर्वरित राज्यातही माध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे. पुणे आणि नाशिक शहरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

सातारा प्रतापगड रस्त्यावर दरड कोसळली, प्रतापगडाकडे जाणारी वाहतूक बंद.

राज्याच्या पश्चिम किनारपट्टीभागात पावसाची दमदार बॅटिंग सुरू असून सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे.

पुणे शहरात बुधवारी सकाळपासूनच हलक्या ते मध्यम सरीच्या पावसाने हजेरी लावली आहे. शहरात मंगळवारी रात्री पर्यंत २.८ मिमी इतका पाऊस झाला. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धारण क्षेत्रात देखील चांगला पाऊस झाला आहे.

मंगळवारी रात्री पर्यंत टेमघर ३० मिमी, पानशेत २१ मिमी, वरसगाव २० तर खडकवासला धरण क्षेत्रात १० मिमी इतका पाऊस झाला. येत्या ३ दिवसात पुण्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दुसऱ्या बाजूला पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. पंचगंगा नदीचे पाणी पात्रा बाहेर पडले असून नदीची पाणी पातळी 30 फुटांच्या वर पोहोचली आहे. तसेच जिल्ह्यातील एकूण 23 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळं प्रशासनानं तेथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.\

या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर NDRF च्या दोन टीम देखील कोल्हापुरात दाखल झाल्या आहेत. एक टीम कोल्हापूर शहर तर दुसरी टीम शिरोळ तालुक्यामध्ये तैनात केली आहे. राधानगरी धरणाच्या कृत्रिम दरवाजातून 1100 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात सोडला आहे.

मुंबईच्या वांद्रे येथील पावसाची दृश्य

मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस होणार आहे. ठाणे जिल्ह्याला ९ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबई : राज्यातील अनेक भागात कालपासून संततधार सुरू असून, मुंबई कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला पावसाने चांगलेच झोडपूर काढले आहे. दरम्यान, हवामान विभागातर्फे मुंबईमध्ये आगामी चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच 7 आणि 8 जुलै रोजी अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वाढत्या पावसाचा अंदाज बघता प्रशासनातर्फे नागरिकांना सावध राहण्याचा तसेच अत्यावश्यक असल्यासच घराबाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com