Maharashtra Rain : हाती आलेल्या पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांना आर्थिक फटका

crop-damage-due-to-rain
crop-damage-due-to-rain

पुणे - पावसाने कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला सलग तीन दिवस झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर कमी झाला आहे.  मात्र, अद्यापही शिवारात पिके पाण्याखालीच आहेत. शेतांमध्ये साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी आणि पीक वाचविण्यासाठी जिवाचे रान करताना शेतकरी दिसत आहेत. फळबागा आणि भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले असून राज्यात पावसामुळे तीन दिवसांत ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. हजारो हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान करणाऱ्या या पावसामुळे शेतकरी हतबल झाला आहे.    

पावसाचा सर्वाधिक फटका कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. गेले तीन चार दिवस या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे. हजारो हेक्टर भातपिकाचे नुकसान झाले आहे. कापणी केलेले भातपीक देखील पुराच्या पाण्यातून वाहून गेले आहे. सिंधुदुर्गमधील खारेपाटण (ता.कणकवली) परिसराला सर्वाधिक फटका बसला असून या भागातील मोठ्या प्रमाणात भातपीक पाण्याखाली आहे. कोकणातील सर्वच नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले. 

शेतकऱ्याची आत्महत्या
अतिवृष्टीमुळे हाती आलेली पिके वाया गेल्याच्या नैराश्यातून हिंगोली जिल्ह्यातील लिंबाळा (ता. सेनवाग) येथील शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केली. बन्सी आडे (वय ३०) असे त्यांचे नाव आहे.  

मध्य महाराष्ट्रात जोर ओसरला
पुणे जिल्ह्यात बारामती, इंदापूर, दौंड, सासवड, हवेली या तालुक्यांना पावसाचा जास्त फटका बसला. सातारा जिल्ह्यात शेतात पाणी साचलेले आहे. नगर जिल्ह्यातील मुळा धरणातून अकरा दरवाजातून तीन हजार क्युसेकने विसर्ग सुरू होता. सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांतही पावसाने उघडीप दिली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मराठवाडा, विदर्भात हलक्या सरी 
गेल्या दोन दिवसांपासून मराठवाडा व विदर्भात पावसाच्या तुरळक सरी पडत आहे. पाऊस नसल्याने काही भागात शेतकऱ्यांनी शेतीकामास सुरवात केली आहे. मात्र, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, बीड भागात शेतात अजूनही वाफसा नसल्याने शेतीकामे रखडली आहेत. 

पंढरपूर तालुक्यात ४६ गावांना फटका
पुणे: तीन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे पंढरपूर तहसीलतंर्गत ४६ गावांना पुराचा फटका बसला आहे. तेथील सुमारे १० हजार ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. यादरम्यान चौदा जणांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठची गावे अजूनही पाण्याने वेढलेली आहेत. भीमा नदीकाठच्या ४६ गावातील ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी नेल्याचे पंढरपूर तहसीलचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले. पंढरपूर तालुक्यातील असंख्य पूल अद्याप पाण्याखाली आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प पडली आहे. पंढरपूर तालुक्यातील ५ हजार नागरिकांना मोहोळ तहसीलमध्ये हलविण्यात आले आहे. अन्य दोन हजार नागरिकांना जिल्ह्यातील अन्य भागात स्थलांतरित केले आहे. एकूण ४८६५ कुटुंबांना पावसाचा पुराचा फटका बसला आहे. या भागात १८ बचाव पथके कार्यरत असून ते पंढरपूर, माळशिरस, दक्षिण सोलापूर आणि मोहोळ येथे कार्यरत आहेत.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ही पिके पाण्यात
भात, सोयाबिन, बाजरी, कापूस, केळी, सूर्यफूल, ज्वारी, डाळी, भाजीपाला, फळबागा

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मनाला चटका लागेल अशी परिस्थिती आज शेतकऱ्याची या परतीच्या पावसाने केली. झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्याला मिळणे गरजेचे आहे, त्यासाठी राज्य सरकार प्रत्येक प्रयत्न करून शेतकऱ्याला मदत करणार.  
-विजय वडेट्टीवार, पुनर्वसन मंत्री

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पिकांचे पंचनामे करून केंद्र सरकारलाही अहवाल देणार आहोत. केंद्र सरकारनेही त्यांना पथक पाठवायचे असेल तर पाठवावे. परंतु नेहमीच्या निकषानुसार मदत करून चालणार नाही. कोरोनानंतर आता अतिवृष्टीचे संकट ओढवले आहे. त्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे.  
-अजित पवार, उपमुख्यमंत्री

परतीच्या पावसाचा मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे. मुख्यमंत्र्यांनी आता नुकसानभरपाई देण्याच्या नुसत्या घोषणा न करता शेतकऱ्यांना थेट तातडीने मदत करावी. सध्या राज्यामध्ये अन्नदात्याला वाऱ्यावर सोडून दिल्यासारखी अवस्था निर्माण झाली आहे. 
- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते

पावसाचे नुकसान (१२ ते १५ ऑक्टोबर) 
बळी (एकूण ४७) 
१४ - सोलापूर 
९- सांगली 
४ - पुणे 
१६- औरंगाबाद 
१ - सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग (प्रत्येकी) 

पीक नुकसान (हेक्टर जमिनीवरील) 
१,३६,१७६ : उस्मानाबाद 
१,१०,६८५ : नांदेड 
५७ हजार : पुणे, सोलापूर, सातारा, सांगली 

इतर नुकसान 
सिंधुदुर्ग व रत्नागिरी 
३२६ घरांची पडझड, ५ जनावरे दगावली 

पुणे, सोलापूर, सातारा, सांगली 
२३१९ घरांची पडझड 
५१३ जनावरे दगावली 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com