महाराष्ट्र स्वयंपूर्ण! रक्तदान करा सामाजिक बांधिलकीतून, कोणीतरी परतेल मृत्यूच्या दारातून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

blood collection
महाराष्ट्र स्वयंपूर्ण! रक्तदान करा सामाजिक बांधिलकीतून, कोणीतरी परतेल मृत्यूच्या दारातून

महाराष्ट्र स्वयंपूर्ण! रक्तदान करा सामाजिक बांधिलकीतून, कोणीतरी परतेल मृत्यूच्या दारातून

सोलापूर : अपघात झाल्यावर किंवा प्रसूतीवेळी गर्भवती मातांना, विजेचा शॉक किंवा जळालेल्या रुग्णाला रक्ताची मोठी गरज भासते. सात-आठ वर्षांपूर्वी रक्त व रक्तघटक वेळेत न मिळाल्याने मृत्यूचे प्रमाण लक्षणीय होते. पण, आता ते प्रमाण अत्यल्प तथा नाहीसे झाले असून, महाराष्ट्र रक्ताच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. ३६३ रक्तपेढ्या दरवर्षी १६.७३ लाख युनिट (पिशवी) रक्त संकलन करतात. १६ लाख ४३ हजार व्यक्ती सामाजिक बांधिलकीतून दरवर्षी रक्तदान करीत आहेत.

मानवी शरीरात अंदाजे ५.५ लिटर रक्त असते. रक्तात तांबड्या, पांढऱ्या पेशी, रक्‍तबिंबिका, प्‍लाझ्मा असे घटक असतात. संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्‍याचे काम रक्त करते. हिमोग्‍लोबिन हा रक्तातील महत्त्वाचा घटक कमी झाल्‍यास अॅनिमिया (पंडूरोग) होतो. अॅनिमिया, थॅलेसेमिया, हिमोफिलिया, सिकलसेल, ल्‍युकेमिया, प्‍लेटलेटचे आजार, कॅन्‍सर असे रक्ताशी निगडित आजारांमध्‍ये वारंवार रक्तसंक्रमण करावे लागते. रक्ताला अद्याप कृत्रिम पर्याय तयार झाला नसल्याने रक्तदानाची चळवळ वाढावी, यासाठी दरवर्षी १ ऑक्टोबर हा राष्‍ट्रीय स्‍वैच्छिक रक्‍तदान दिन म्हणून साजरा केला जातो. १८ ते ६५ वर्षे वयोगटातील सर्व निरोगी व ४५ किलोपेक्षा जास्त वजनाचे लोक, शरीराचे तापमान, नाडी सामान्य असणारे लोक, बाळाला अंगावर पाजणे बंद केलेल्या महिला रक्तदान करू शकतात. सामान्य रक्तदाब (बीपी) असलेले लोक, ज्यांचे हिमोग्लोबिन १२.५ ग्रॅमपेक्षा जास्त असलेलेही रक्तदान करतात. तीन महिन्यांतून एकदा रक्तदान करणे सुरक्षित आहे. राज्यात दरवर्षी सण-उत्सव, महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीला मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरांचे आयोजन होते. त्यामुळे महाराष्ट्र रक्ताच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे.

हेचि दान देगा देवा...

दानासंदर्भात संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ।।’ दान हे सामाजिक ऋण फेडण्याची नामी संधी आहे. त्यातून त्या व्यक्तीच्या कुटुंबाला मनःशांती, आनंद, समाधान मिळते, असे अध्यात्मात म्हटले आहे. भूमीदान, सुवर्णदान, धनदान, वस्त्रदान, पाणीदान, देहदान, अवयवदान, नेत्रदान, रक्‍तदान, अन्नदान, कन्यादान व मतदान असे दानाचे प्रकार आहेत. भुकेल्याला अन्नदान व गरजूंना रक्तदान केल्यास संबंधिताचा प्राण वाचतो. त्यामुळे सर्वांनी रक्तदान करावे.

रक्तदानाचे फायदे...

 • रक्त तपासणीतून (एचआयव्ही, गुप्तरोग, कावीळ, मलेरिया समजतो) शारीरिक व्याधी समजतात.

 • रक्तगट व हिमोग्लोबिनच्या प्रमाणाची माहिती मिळते आणि उपचाराची दिशा ठरवता येते.

 • बोन मॅरोमध्ये नवीन रक्त तयार करण्याची कार्यक्षमता वाढते.

 • रक्तदानानंतर तयार झालेल्या रक्तपेशी, रक्तरसामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढून चैतन्य निर्माण होते.

 • नियमित रक्तदानाने लोहाचे प्रमाण नियंत्रणात राहते. त्यामुळे हृदय-यकृतासारखे अवयव निरोगी राहतात.

रक्तदानाची सद्यःस्थिती

 • एकूण रक्त संकलन केंद्रे

 • ३६३

 • दरवर्षी रक्तदान शिबिरे

 • २८,९८०

 • राज्यातील रक्तदाते

 • १६.४७ लाख

 • दरवर्षी रक्त संकलन

 • १६.७३ लाख युनिट

अपघातग्रस्त अन्‌ गर्भवतींनाच सर्वाधिक रक्त

राज्यात दरवर्षी रस्ते अपघातात १३ ते १६ हजार जणांचा मृत्यू होतो, तर २८ हजारांहून अधिकजण जखमी होतात. त्यांना सर्वाधिक रक्त लागते. तसेच राज्यातील दोन ते अडीच लाख गर्भवतींना प्रसूतीवेळी रक्ताची गरज भासते. एकूण लोकसंख्येच्या एक टक्का लोकांना दरवर्षी रक्त लागते. महाराष्ट्रात लोकसंख्येच्या प्रमाणात दरवर्षी पावणेदोन टक्क्यांपर्यंत रक्त संकलन होते, हे विशेष.