भाजपने गमावले अजून एक राज्य, आता हातात राहिले एवढेच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्रातील सत्ता गेल्याने देशभरातील एकूण भूप्रदेशापैकी केवळ ४० टक्के भूभागावर भाजपाची सत्ता उरली आहे. २०१८ साली भाजपाची सत्ता ७१ टक्के भूभागावर होती.

मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी बाजी मारली असून, या ७९ वर्षीय नेत्याने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारची अवघ्या ७९ तासांत घरवापसी केली. राजकीय डावपेचात अजुनही तेच बाजीगर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याने देशाच्या राजकारणातही पवारांच्या भूमिकेला महत्व प्राप्त झाले आहे.

आता राज्यातील सत्तापेच सुटला आहे. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षांसह इतर घटक पक्षांची महाविकास आघाडी स्थापन करण्यात येत असून, आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात येत असल्याचे या पक्षांच्या संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आले. यामुळे भाजपाच्या हातून आणखीन एक राज्य निसटले आहे. महाराष्ट्रातील सत्ता गेल्याने देशभरातील एकूण भूप्रदेशापैकी केवळ ४० टक्के भूभागावर भाजपाची सत्ता उरली आहे. २०१८ साली भाजपाची सत्ता ७१ टक्के भूभागावर होती.

दरम्यान, २०१४ साली भाजपा केंद्रामध्ये सत्तेत आल्यानंतर त्यांची विजयी घौडदौड सुरु झाली होती. २०१४ साली केवळ सात राज्यांमध्ये सत्ता असणाऱ्या भाजपाने २०१८ च्या शेवटपर्यंत देशातील २२ राज्यांमध्ये सत्ता स्थापन केली. मोदी लाट आणि अमित शाह यांच्या चाणक्यनितीच्या जोरावर भाजपाने हे यश मिळवले. मात्र २०१८ च्या मध्यनंतर ही विजयी घौडदौड मंदावली.

२०१४ साली भाजपा गुजरात, मध्यप्रेधेस, राजस्थान, छत्तीसगड, गोवा आणि अरुणाचल प्रदेशमध्ये थेट किंवा सहकारी पक्षांच्या सोबतीने सत्तेत होते. २०१८ साली सप्टेंबर महिन्यात केवळ मोजकी राज्ये वगळल्यास देशभरात भाजपाचीच सत्ता होती. तामिळनाडू (एआयएडीएमके), केरळ (एलडीएफ), कर्नाटक (काँग्रेस), मिझोरम (काँग्रेस), पंजाब (काँग्रेस), ओदिशा (बीजेडी), पश्चिम बंगाल (तृणमूल काँग्रेस) आणि तेलंगण (टीआरएस) या आठ राज्यांमध्ये भाजपा सरकार नव्हते.

एकदंर भाजपाची देशातील विजयी घौडदौड मंदावली असली तरी त्यांनी मिझोरमसारख्या राज्यातही विजय मिळवत सत्ता स्थापन केली. असं असलं तरी दुसरीकडे बालेकिल्ला मानली जाणारी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड सारख्या राज्यांमधील सत्ता भाजपाने गमावली. आंध्रप्रदेशमध्येही तेलगू देसम पार्टीने भाजपापासून फारकत घेत एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. जम्मू काश्मीरमध्येही डिसेंबरपासून राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने तेथेही भाजपा आणि पीडीपीचे सरकार बरखास्त झाले.

दरम्यान, कर्नाटकमध्ये जुलै महिन्यामध्ये कर्नाटकात मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला. अशाचप्रकारे महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळवण्याचा भाजपाचा डाव होता मात्र तो फसला आणि महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra slips out of bjps hand saffron hues shrink from indias map