राज्यातील धरणे निम्मी भरली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

राज्यात सध्या सर्व धरणांमध्ये आजअखेर एकूण ५१.३६ टक्‍के पाणीसाठा आहे. गतवर्षी याच तारखेस हा साठा ५१.४१ टक्‍के होता.

पुणे - राज्यात पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण आणि नाशिक विभागात धरणे भरली. परंतु, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश धरणांमध्ये पाणीसाठा अत्यल्प आहे. राज्यात सध्या सर्व धरणांमध्ये आजअखेर एकूण ५१.३६ टक्‍के पाणीसाठा आहे. गतवर्षी याच तारखेस हा साठा ५१.४१ टक्‍के होता.

राज्यात मराठवाड्यासह विदर्भात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे मराठवाडा, विदर्भातील धरणांमध्ये पाणीसाठा अत्यल्प असून, त्या भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न दूर होण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे.

राज्यातील अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक आणि नागपूर या विभागात एकूण १४१ मोठे प्रकल्प आहेत. तर, २५८ मध्यम आणि दोन हजार ८६८ लघू पाटबंधारे प्रकल्प आहेत. या सर्व धरणांची एकूण प्रकल्पीय उपयुक्‍त पाणीसाठा क्षमता ४०८९७.९५ दशलक्ष घनमीटर म्हणजेच एक हजार ४४४ अब्ज घनफूट (टीएमसी) आहे. त्यापैकी सध्या २१ हजार दशलक्ष घनमीटर म्हणजेच ७४१.९० टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. ३१ जुलै रोजी एकूण उपयुक्‍त पाणीसाठा ५२६ टीएमसी होता.

आठवडाभरात २१५ टीएमसीची वाढ  
राज्यात कोकण, नाशिक आणि पुणे विभागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे गेल्या सात दिवसांत राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात २१५ अब्ज घनफुटांनी (टीएमसी) वाढ झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra state dam water stock