वाहतुकीचे नियम मोडण्यात महाराष्ट्र देशात अव्वल

तात्या लांडगे
रविवार, 21 एप्रिल 2019

राज्यात जानेवारी ते 17 एप्रिल या कालावधीत तब्बल 30 लाख 16 हजार 209 वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम मोडले असून, त्यांच्याकडून 69 कोटी 66 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

सोलापूर : राज्यात जानेवारी ते 17 एप्रिल या कालावधीत तब्बल 30 लाख 16 हजार 209 वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम मोडले असून, त्यांच्याकडून 69 कोटी 66 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. राज्यात दरवर्षी सरासरी सव्वा कोटी वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. त्यामुळे रस्ते अपघात व मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. वाहतूक नियमांच्या उल्लंघनात महाराष्ट्र देशात अव्वल असल्याचे राष्ट्रीय महामार्ग पोलिस दलातील सूत्रांनी सांगितले.

वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, मद्य प्राशन करून अतिवेगाने वाहन चालविणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी अथवा मालाची वाहतूक करणे, पीयूसी - विमा नाही, हेल्मेट न वापरणे, सीटबेल्टचा वापर न करणे, असे प्रकार नाशिक, पुणे, मुंबई, सोलापूर, औरंगाबाद, नगर, नागपूर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक असल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले. 

दरम्यान, अपघातप्रवण ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) दुरुस्त करून ठोस उपाययोजना करण्याची गरज असतानाही संबंधित शासकीय यंत्रणांकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, त्यामुळेही अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, ब्लॅक स्पॉटही कमी झाल्याचे दिसत नाही.

तसेच, वाहतूक पोलिस असो की आरटीओची यंत्रणा असो, यांच्या कारवाईत सातत्य पाहायला मिळत नाही, त्यामुळे मागील साडेतीन महिन्यांतील साडेनऊ हजार अपघातांत तीन हजार 464 जणांचा मृत्यू, तर आठ हजार जण जखमी झाल्याचे महामार्ग पोलिसांकडून सांगण्यात आले. 

रस्ते अपघात व मृत्यू आणि वाहतूक नियम उल्लंघनात सोलापूर राज्यात "टॉप-टेन'मध्ये आहे. वाहतूक नियम हे कारवाईसाठी नसून अपघात टाळणे व वाहतूक सुरळीत होण्यासाठी असल्याचे वारंवार सांगूनही वाहनचालकांकडून नियमांचे पालन केले जात नाही. या पार्श्‍वभूमीवर दंडात्मक कारवाईद्वारे दरमहा 35 ते 40 लाखांचा दंड वसूल होतो. 

- संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर 
 

राज्याची 2019 ची स्थिती 

अपघात 
9,216 

मृत्यू 
3,464 

जखमी 
7,913 

नियम उल्लंघन कारवाई 
30.16 लाख रुपये 

दंड वसूल 
69.66 कोटी रुपये 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra tops in Breaking Traffic Rules