‘स्टार्टअप’मध्ये महाराष्ट्र अव्वल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

महाराष्ट्रात आजघडीला सुमारे आठ हजार ‘स्टार्टअप’ची नोंदणी झाली आहे. यामध्ये पुणे शहराचा वाटा खूप मोठा आहे. सध्या महाराष्ट्र हे ‘स्टार्टअप’मध्ये देशात क्रमांक एकवर असल्याचे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पुणे - महाराष्ट्रात आजघडीला सुमारे आठ हजार ‘स्टार्टअप’ची नोंदणी झाली आहे. यामध्ये पुणे शहराचा वाटा खूप मोठा आहे. सध्या महाराष्ट्र हे ‘स्टार्टअप’मध्ये देशात क्रमांक एकवर असल्याचे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आजघडीला पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात केवळ माहिती तंत्रज्ञान, ई-कॉमर्ससारख्या क्षेत्रातील ‘स्टार्टअप’ मर्यादित ठेवता येणार नाहीत. कारण, ‘स्टार्टअप’च्या वाढीसाठी जैवतंत्रज्ञान, कृषितंत्रज्ञान, ऑटोटेक, मॅन्युफॅक्‍चरिंग आणि सोशल एंटरप्रायजेस आदी क्षेत्रात वाव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘स्टार्टअप’ला चालना देण्यासाठी वेळेत आणि कमी प्रयत्नात निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा पुण्यातील विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी या वेळी व्यक्त केली.

पत्रकार परिषदेला व्हेंचर सेंटरचे संचालक डॉ. व्ही. प्रेमनाथ, ‘पीआयसी’चे हितेंद्र सिंग, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक विश्‍वास महाजन, आयटी कमिटीचे चेअरमन अमित परांजपे, भाऊ इन्स्टिट्यूटचे गिरीश देगावकर, टीआयईचे अध्यक्ष किरण देशपांडे, ऑटोक्‍लस्टरचे व्यवस्थापकीय संचालक किरण वैद्य, आयडियाज टू इम्पॅक्‍टचे संस्थापक संचालक गिरिंद्र कसमळकर आदी उपस्थित होते.

नोकऱ्यांच्या निर्मितीला वाव
‘स्टार्टअप’ इंडिया उपक्रमांतर्गत आजअखेर देशात २१ हजार ५४८ ‘स्टार्टअप’ जाहीर करण्यात आले आहेत. भारत सरकारने या उपक्रमासाठी १०० अब्ज रुपयांचा निधी उभारला आहे. त्यामुळे या क्षेत्रात नोकऱ्यांचीही निर्मिती होण्यास मोठा वाव मिळणार असल्याचे मत विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी या वेळी व्यक्त केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra tops in Startup