युतीला निसटता जनादेश | Election Results 2019

Maharashtra Vidha Sabha election result Bharatiya Janata Party and Shiv Sena alliance
Maharashtra Vidha Sabha election result Bharatiya Janata Party and Shiv Sena alliance

मुंबई - ‘अब की बार, २२० पार’, अशी गर्जना करत निवडणुकीच्या रणांगणात महाजनादेशासाठी उतरलेल्या भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीला प्रत्यक्षात मात्र निसटत्या जनादेशावरच समाधान मानावे लागले. विरोधी पक्षाला जेमतेम २५ ते ३० जागा मिळतील, हा सरकारचा दावा जनतेने फेटाळून लावत काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या पदरात ९९ जागांचे दान टाकले.

मुंबई व कोकणाने मात्र महायुतीला भरघोस प्रतिसाद दिला; पण भारतीय जनता पक्षाचे स्वबळावर सत्तास्थापनेचे स्वप्न भंगले. आता शिवसेना सत्तेत वाढीव वाटा मागणार असल्याने भाजपची डोकेदुखी वाढेल. महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांची मतमोजणी आज पार पडली. सुरवातीला महायुती २०० जागांचा टप्पा पार करेल, असे मानले जात होते; पण पश्‍चिम महाराष्ट्राने भाजपच्या यशाची घोडदौड रोखली. विदर्भात काँग्रेसने अनपेक्षित बाजी मारत भाजपच्या बालेकिल्ल्यात आव्हान उभे केले, तर उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसने युतीच्या एकहाती विजयाला खीळ घातली. मुंबई, कोकणात मात्र युतीची घोडदौड कायम राहिल्याने त्यांना बहुमताचा आकडा पार करण्यात यश आले.   

या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने १६२, तर शिवसेनेने १२४ जागा लढवल्या होत्या; पण तब्बल ५४ जागांवर युतीमध्ये बंडखोरी झाली होती. बहुतांश बंडखोर मुंबई व कोकणात असल्याने युतीच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष उमेदवारांमध्येच सामना झाला, तर काँग्रेस राष्ट्रवादीने एकदिलाने काम करूनही शहरी मतदारांनी महाआघाडीला साथ दिली नाही.

पवार फॅक्‍टर प्रभावी
शरद पवार यांच्या फॅक्‍टरने प. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली व पुणे ग्रामीणमध्ये मुसंडी मारली, तर नगरमध्ये युतीचे पानिपत झाले. बीड, लातूर व नांदेडमध्ये महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला असून, विदर्भात काँग्रेसला सुयश मिळाले.

विद्यमान मंत्र्यांना फटका
युती सरकारच्या  दिग्गज मंत्र्यांना पराभवाचा फटका बसला. आताही महायुतीचे सरकार स्थापन होणार असले तरी, शिवसेनेचा सत्तेतील सहभाग हा अटी व शर्थीवरच होईल, असे संकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com