
विजयासाठी तीन आमदार फोडा!
मुंबई : फोडाफोडीचे राजकारण, आघाडीतील घटक पक्षांमधील अस्वस्थता, त्यातूनच दगाफटका आणि आमदारांमधील नाराजीमुळे विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाआधीच हैराण झालेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने भलतीच खबरदारी घेतली आहे. पक्षाच्या आमदारांशिवाय विरोधी पक्ष, अपक्ष, छोटे पक्ष यांचे तीन-तीन आमदार फोडण्याचा आदेश आघाडीने आपापल्या उमेदवारांना दिला आहे. त्यामुळे या पक्षाच्या सहा उमेदवारांपुढे स्वतःच्या ताकदीवर १८ मते खेचून आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
या मोहिमेत उमेदवारांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ मिळण्याची आशा आहे. विधान परिषदेच्या रिंगणातील प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी २६ मतांचा जादुई आकडा गाठावा लागेल. त्यातच माजी मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक यांना मतदान करता येणार नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडे आजघडीला हक्काची ५१ मते उरली मते आहेत.
मात्र, या पक्षाचे उमेदवार विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांच्या विजयासाठी एक मत कमी आहे. त्यातच भाजपने छुपी रणनीती आखून खडसे यांची वाट रोखण्याचा बंदोबस्त केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नाईक-निंबाळकर, खडसे यांना काही करून प्रत्येकी तीन मते फोडण्याचा सूचना केल्या आहेत.
शिवसेनेकडे ५४ मते असल्याने त्यांचे सचिन अहीर आणि आमशा पाडवी आमदार होऊ शकतात, परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठरविलेले उमेदवार पाडण्याचा प्रयोग आता विधान परिषदेतही यशस्वी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्याचा फटका पाडवी यांना बसू शकतो. त्यामुळे कोटा पूर्ण होण्याइतपत मते असली तरी; जादा मतांची जुळवाजुळव शिवसेनेसाठीही दिलासा देणारी असेल. काँग्रेसलाही चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप यांना निवडून आणायचेच आहे. त्यात जगताप यांना शक्य तेवढे फिरून मते गोळा करण्यास सांगण्यात आले आहे.
Web Title: Maharashtra Vidhan Parishad Election Ncp Congress Shivsena Mahavikas Aaghadi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..