भाजप- शिवसेना युती दोनशेचा टप्पा गाठणार का याचीच उत्सुकता | Election Results 2019

Maharashtra Vidhan Sabha 2019 election result trends early morning
Maharashtra Vidhan Sabha 2019 election result trends early morning

पुणे : विधानसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीस प्रारंभ झाला असून, भाजप-शिवसेना युती ही दोनशेचा टप्पा पार करणार का, याची मोठी उत्सुकता मतदारांमध्ये लागली आहे. त्यातही शिवसेना आणि विरोधी पक्षांना किती जागा मिळतील, भाजप अपक्षांच्या मदतीने स्वबळावर सत्तेजवळ पोहोचणार का, यासंदर्भात कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहेत, येत्या तीन-चार तासांत हे चित्र स्पष्ट होणार आहे.

मतदानानंतर झालेल्या एक्‍झिट पोलमध्ये अनेक वाहिन्यांनी युतीच्या दोनशेच्या आसपास जागा दिल्या आहेत. मात्र, युतीच्या बंडखोरामुळे अनेक मतदारसंघांत चुरशीच्या ठरलेल्या लढतीत अनपेक्षित निकालांची नोंद होईल, अशी अपेक्षा विरोधी पक्षांचे नेते करीत आहेत. विशेषतः पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विरोधी कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला गेल्या वेळेपेक्षा चांगल्या जागा मिळण्याची अपेक्षा आहे. उत्तर महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांत भाजप व शिवसेनेच्या बंडखोरांनी युतीतील मित्रपक्षाच्या उमेदवारांना थेट आव्हान दिल्याने, तेथे धक्कादायक निकाल लागण्याची शक्‍यता आहे.

भाजपची सेफ गेम
भाजपने गेल्या निवडणुकीत त्यांचे आमदार, तसेच पक्ष प्रवेश केलेले आमदार अशा 138 मतदारसंघांत उमेदवार दिले आहेत. त्यांनी मित्रपक्षांच्या साह्याने 164 उमेदवार उभे केले असून, उर्वरीत 24 मतदारसंघांपैकी अनेक ठिकाणी आघाडीच्या तुल्यबळ नेत्याला भाजपची उमेदवारी बहाल केली आहे. भाजपने खेळलेल्या या सेफ गेममुळे त्यांचे सर्वाधिक आमदार निवडून येणार आहेत.

शिवसेनेला चिंता भाजपच्या बंडखोरांची
मुंबई व कोकणातील जास्तीत जास्त मतदारसंघ युतीच्या जागा वाटपात स्वतःकडे घेत शिवसेनेने आपला बालेकिल्ला बळकट केला आहे. मात्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केल्यामुळे, शिवसेनेच्या उमेदवारांची चिंता वाढली आहे. त्याचा परिणाम शिवसेनेच्या आमदारांच्या संख्येवर होण्याची शक्‍यता आहे. शिवसेनेचे गेल्या वेळी 63 आमदार निवडून आले होते. अन्य पक्षांतील आठ आमदारांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना 124 जागा लढत असून, आघाडीच्या आमदारांच्या मतदारसंघांत शिवसेनेला लढा द्यावा लागत असल्याने, त्यांच्यापुढील आव्हान मोठे आहे.

राष्ट्रवादीसमोर शिवसेनेचेच आव्हान
राष्ट्रवादीने पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात त्यांची ताकद पणाला लावली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये 70 पैकी 45 मतदारसंघात राष्ट्रवादी लढत असून, त्यांच्यापुढे मुख्य आव्हान शिवसेनेचेच आहे. मराठवाड्यातही युतीतील वादामुळे काही मतदारसंघांत राष्ट्रवादीला अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.

विदर्भात कॉंग्रेस किती जागा जिंकणार
भाजपने विदर्भातील 62 पैकी 44 जागा जिंकत गेल्या वेळी राज्याची सत्ता मिळविली. कॉंग्रेसला केवळ दहा जागांवर समाधान मानावे लागले होते. यावेळीही विदर्भात या दोन पक्षांतच मुख्य लढत आहे. भाजपने येथील 50 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या मतविभागणीला फटका कोणत्या पक्षाला बसणार, तेही दिसून येणार आहे. कॉंग्रेस विदर्भात भाजपच्या घोडदौडीला किती लगाम घालतो, यावरच राज्यातील निवडणुकीच्या निकालाचे चित्र अवलंबून असेल.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com