Vidhan Sabha 2019 : आदित्य यांच्यासह निम्मे उमेदवार बाहेरचे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 October 2019

राज्यासह देशातील राजकारणात चर्चेचा विषय ठरलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघातील निम्मे उमेदवार ‘बाहेरचे’ आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १३ उमेदवार रिंगणात राहिले असून, शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांच्यासह सात जण अन्यत्र राहणारे आहेत.

विधानसभा 2019 : मुंबई - राज्यासह देशातील राजकारणात चर्चेचा विषय ठरलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघातील निम्मे उमेदवार ‘बाहेरचे’ आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १३ उमेदवार रिंगणात राहिले असून, शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांच्यासह सात जण अन्यत्र राहणारे आहेत. 

आदित्य यांच्याविरोधात १९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. शेवटच्या टप्प्यानंतर सोमवारी १३ उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेच्या ठाकरे कुटुंबातून पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे आदित्य यांनी आपले निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व ऐवजी वरळी विधानसभा मतदारसंघ निवडला. दोन दशकांहून अधिक काळ शिवसेनेच्या ताब्यात असलेली ही जागा शिवसेनेसाठी मुंबईतील सर्वांत सुरक्षित मानली जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश माने यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर शिवडीचा निवासी पत्ता नमूद केला आहे. 

‘बिग बॉस’ कार्यक्रमामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले सातारा जिल्ह्यातील अभिजित बिचुकले वरळीतून निवडणूक लढवत आहेत, तर नितीन गायकवाड हे अपक्ष उमेदवारही मूळचे साताऱ्यातील आहेत. वंचित बहुजन आघाडीचे गौतम गायकवाड ठाण्यात, तर बसपचे भीमराव विद्यासागर मानखुर्दला राहतात. संभाजी ब्रिगेडचे दिनेश महाडिक ठाण्यातील, प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रताप हवालदार भांडुपमधील, विजय शिकतोडे भायखळ्यातील; तर नॅशनल पीपल्स पार्टीचे मिलिंद कांबळे उल्हासनगर येथील रहिवासी आहेत.

स्थानिकांची माघार 
पुण्याचे सचिन खरात यांच्यासह अमोल निकाळजे आणि अंकुश कुऱ्हाडे यांनी निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. कुऱ्हाडे आणि निकाळजे वरळीचे स्थानिक रहिवासी आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhansabha 2019 Aaditya Thackeray Politics