esakal | Vidhan Sabha 2019 : आघाडी बालेकिल्ले राखणार - अशोक चव्हाण
sakal

बोलून बातमी शोधा

Ashok-Chavan

युतीपेक्षा आमचे जागावाटप सुलभरीतीने झाले. युती आणि मित्रपक्षांमध्ये ताळमेळ नव्हता. उमेदवारीवाटपात घोळ झाले. युती असली तरी आपापली ताकद वाढविणे, या एकमेव अजेंड्याच्या नादात दोन्ही पक्षांत बंडखोरी झाली. आघाडीतल्या समन्वयामुळे आम्ही आमचे बालेकिल्ले राखणार आहोत. आमची परिस्थिती सुधारत आहे, अशा आत्मविश्‍वासाने काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आघाडीची बाजू मांडली. ‘सकाळ’चे प्रतिनिधी दयानंद माने यांना दिलेल्या मुलाखतीचा हा अंश...

Vidhan Sabha 2019 : आघाडी बालेकिल्ले राखणार - अशोक चव्हाण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

युतीपेक्षा आमचे जागावाटप सुलभरीतीने झाले. युती आणि मित्रपक्षांमध्ये ताळमेळ नव्हता. उमेदवारीवाटपात घोळ झाले. युती असली तरी आपापली ताकद वाढविणे, या एकमेव अजेंड्याच्या नादात दोन्ही पक्षांत बंडखोरी झाली. आघाडीतल्या समन्वयामुळे आम्ही आमचे बालेकिल्ले राखणार आहोत. आमची परिस्थिती सुधारत आहे, अशा आत्मविश्‍वासाने काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आघाडीची बाजू मांडली. ‘सकाळ’चे प्रतिनिधी दयानंद माने यांना दिलेल्या मुलाखतीचा हा अंश...

प्रश्न - काश्‍मीर ते थेट गल्लीतील प्रश्न, असा मुद्द्यांचा मोठा परीघ कवेत घेणाऱ्या या निवडणुकीत आघाडीची स्थिती काय असेल?
उत्तर -
 सत्ताधारी पक्षांकडे मोठ्या प्रमाणात संसाधने आहेत. त्यांच्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या सभा सर्वत्र होताहेत. ते विजयाचे, बहुमताचे मोठमोठे दावे करताहेत. मात्र, काश्‍मीर आणि ३७०वे कलम यापलीकडे त्यांचा प्रचार नाही. सर्वसामान्यांच्या जगण्याचे प्रश्न तीव्र होताहेत. ७० वर्षांत काय झाले, असे ही मंडळी विचारते. पण, पाच वर्षांत काय केले? ते सांगत नाहीत. आम्ही लोकांचे मुद्दे मांडतोय. ते त्यांना पटतेय. त्यामुळे आमची परिस्थिती दिवसेंदिवस सुधारते आहे. किती जागा मिळतील, यापेक्षा आमची कामगिरी सुधारेल, हे निश्‍चित.

मराठवाडा, नांदेडमध्ये  काय स्थिती राहील?
राहुल गांधींची सभा लातूर जिल्ह्यात झाली. तिथे काँग्रेसची स्थिती चांगली आहे. भाजप-शिवसेनेत बंडखोरी आहे. दोन्ही देशमुख बंधू आणि औशाची स्थिती चांगली आहे. नांदेड जिल्ह्यात विरोधक मला लक्ष्य करताहेत. मुख्यमंत्री दोन-दोन दिवस सभा घेताहेत. माझ्यावर टीका करण्याच्या नादात स्थानिक प्रश्‍नांना बगल देताहेत. ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे नांदेडच्या हक्काचे पाणी पळवून नेले जातेय. त्याविषयी अवाक्षरही काढत नाहीत. सरकारवर कर्जमाफी, पीकविम्याबाबत नाराजी आहे. औरंगाबादेतील ऑटोमोबाईल उद्योग बंद पडताहेत. मंदीचा फटका बसतोय. त्याकडे सरकारचे लक्षच नाही.

काँग्रेस आघाडीकडे राज्यस्तरीय नेता नाही. मोदी, शहा आणि फडणवीसांनी शरद पवारांना टार्गेट केलेय. काँग्रेसचे नेते कुठेही दिसत नाहीत?
भाजपने केवळ शरद पवारांना टार्गेट केलेय, असे नाही. ज्या जिल्ह्यात आघाडीचा जो नेता प्रबळ, तिथे त्याला टार्गेट करताहेत. खरे म्हणजे हीच आमची ताकद आहे. पवार हे सेलिब्रिटी असणारे आघाडीचे नेते आहेत. आमच्याकडे राज्यपातळीवरचे नेते नाहीत, असे नाही. मी, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण सर्वच रिंगणात आहोत. राहुल गांधींनी राज्याचा दौरा केलाय. आम्ही कधीच एक नेता प्रोजेक्‍ट करीत नाही. निवडणुकीनंतर आम्ही आमचा नेता ठरवतो. आपआपले गड राखायचे, हेच धोरण आहे.

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस आघाडीची वाट लावली?
आम्ही त्यांच्यासोबत आघाडीस दोन्ही वेळी इच्छुक होतो. पण, ते कधीच नव्हते. आता त्यांची ‘एमआयएम’शी युती तुटली आहे. लोकसभेवेळी ‘वंचित’ला मते दिल्याने धर्मनिरपेक्ष मतांत फूट पडून जातीयवादींना फायदा झाल्याचे दलित मतदारांच्या लक्षात आलेय. आता दलित, मुस्लिम दोन्ही मतदार पुन्हा काँग्रेसकडे वळत आहेत.

‘पीएमसी’ प्रकरण अजेंड्यावर का नाही?
पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बॅंकेमधील गैरव्यवहार गंभीर आहे. संचालक मंडळात भाजपचेच नेते आहेत. आम्ही ते मुंबईतील सभांत चर्चेत आणू. खरे म्हणजे केवळ ‘पीएमसी’च नव्हे, आमच्या नांदेड जिल्हा बॅंकेतही खूप मोठा गैरव्यवहार विद्यमान भाजप खासदारांच्या पाठिंब्याने सुरू आहे. बॅंकेच्या मौल्यवान मालमत्ता टेंडरपेक्षा कमी दरात विकल्या जाताहेत. ही लूट आहे. व्यावसायिकांना खंडणीखोर धमकावत आहेत. नागपूर क्राइम कॅपिटल बनले आहे. आमचे नांदेडही त्याच मार्गाने निघालेय.